**बावनकशी नाट्यकलाकृती ‘ संगीत संत तुकाराम ‘
मराठी साहित्यसृष्टीत संगीत नाटकाची सुरुवात अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्या ‘ संगीत सौभद्र ‘, ‘ सं . शाकुंतल ‘ पासून सुरू झाली ;आणि संगीत नाटकाचे एक पर्व मराठी नाट्यक्षेत्राला अनुभवायला मिळाले . संगीत नाटक हे मराठी रंगभूमीला पडलेले एक पहाटेचे सुखद स्वप्न आहे . असे म्हटले जाते ते यथार्थच आहे . मराठी नाट्यसृष्टीचा हा उत्कर्षाचा काळ होता . सं . शाकुंतल, सं .सौभद्र , सं . शारदा , मृच्छकटिक, सं . स्वयंवर , सं .मानपमान , सं . संशयकल्लोळ , सं .विद्याहरण , सं . ययाति आणि देवयानी , सं . देवबाभळी , सं . चंद्रप्रिया, सं . संत तुकाराम आदी नाटकामुळे मराठी रंगभूमीला ‘ सुवर्णयुग ‘ प्राप्त झाले . संगीत नाटकाच्या याच परंपरेतील संगीत संत तुकाराम ह्या अक्षर नाट्यकलाकृतीचा प्रयोग छ . शिवाजी महाराज जयंतीनिमित्त ‘ नाथ प्रतिष्ठान ‘ , परळीच्या वतीने आयोजित करण्यात आला होता .परळीकर रसिक प्रेक्षकांसाठी ही एक अप्रतिम मेजवानी होती . ‘कसदार अभिनय दमदार अभंग , नाट्यगीतांचा देखणा नजराणा ‘, त्याचबरोबर भक्ती -शक्तीचा अनुपम आनंद सोहळा या कलाकृतीच्या माध्यमातून अनुभवता आला. त्यामुळे आयोजकांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे . ...