सुधारणा ' प्रथम पुरुषी ' बनावी

माणसाच्या जीवनात सुखाचे क्षण येतात तसे दुःखाचेही येतात.किंबहुना सुखापेक्षा दुःखाचीच अनुभूती जास्त प्रमाणात येते.अगदी गदिमांच्याच शब्दात सांगावयाचे झाले तर - " एक धागा सुखाचा शंभर धागे दुःखाचे जरतारी हे वस्त्र मानवा तुझिया आयुष्याचे . " असा प्रत्यय सदैव येत असतो ;पण आपल्या या आयुष्यावर निराशावादाची काजळी न चढू देता ती घासून पुसून आयुष्य प्रकाशमान करता येते.त्यासाठी गरज असते प्रयत्नांची,जिद्दीची,सकारात्मक दृष्टिकोनाची,स्वतःपासून बदल घडविण्याच्या वृत्तीची .... तर नक्कीच सर्वत्र - 'आनंदी आनंद गडे ,जिकडे तिकडे चोहीकडे ' हा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही .... पण आमचं बदलाचं घोडं आडतं ते स्वतःजवळच !बदल सर्वांना हवा असतो अर्थातच सुधारणा सर्वांना हवी असते ;पण ती नेमकी करायची कोणी ? इथे प्रत्येकजण या सुधारणेची अपेक्षा दुसऱ्याकडून करतो.व्याकरणाच्याच भाषेत सांगावयाचे झाले तर सुधारणा ही नेहमी ' द्वितीय पुरुषी ' असते . छ.शिवाजी महाराज जन्मावेत ;पण ते आपल्या घरात नव्हे तर दुसऱ्याच्या घरात या मनोभूमिकेमुळे आमचा विकास म्हणावा तसा होत नाही . समाजजीवनात अशा कितीतरी समस्या आहेत . त्यामुळे समाजजीवन धोक्यात येत आहे.अंधश्रद्धा,रुढी,परंपरा,अनिष्ठ प्रथा याबरोबरच प्लॅस्टिकचा अतिरिक्त वापर,पाण्याचा होणारा अपव्यय,वीजेची चोरी,भ्रष्टाचार, वृक्षतोड,प्रदूषण या व यासारख्या अशा काही बाबी आहेत ज्या समाजजीवनाला बाधक आहेत ;धोकादायक आहेत .नव्हे , तर मानवी आयुष्यातील त्या सुख हिरावून घेत आहेत . आज आम्ही सातत्याने दुर्भिक्ष्याला सामोरे जात आहोत. निसर्गाचा समतोल बिघडला आहे ;पण तो बिघडण्यास माणुसही तितकाच जबाबदार आहे . 'वृक्षवल्ली आम्हा सोयरी ' हा संत तुकारामांनी दिलेला मूलमंत्र आम्ही सांभाळला असता तर यदाकदाचित दुष्काळाची तीव्रता निश्चितच कमी जाणवली असती .विकासाच्या नावाखाली आम्ही वसुंधरेला भकास करत आहोत. तिचं मूळ सौंदर्य नाहीसं करून तिला विरूप बनवत आहोत . तिचं सौंदर्य वाढविण्यासाठी काही पर्यावरणप्रेमी पुढाकार घेत आहेत ;पण हे प्रमाण अत्यल्प स्वरुपाचे आहे.बहुतांशी लोक पर्यावरण जागृती करण्याचा संदेश दिल्याचा आभास निर्माण करतात ;पण कृतीमात्र शून्य असते. आमच्या व्यवस्थेमध्ये भ्रष्टाचाराने तर थैमान घातलेले आहे ही कीडच प्रकृतीमध्ये विकृती निर्माण करते.भ्रष्टाचार समूळ नष्ट झाला पाहिजे अशी मनोभूमिका प्रत्येकजण मांडत असतो.संत तुकारामांनी सांगितलेल्या - "जोडोनिया धन उत्तम व्यवहारे। उदास विचारे वेच करू ॥ " या अभंगाची आठवण बरेचसे सुधारणावादी विचाराचे लोक उक्तीच्या पातळीवर करून देतात;परंतु उक्ती आणि कृती यामध्ये बराचसा फरक जाणवतो.काही मोजक्या लोकांचा अपवाद वगळता बाकीच्या व्यक्ती भ्रष्टाचारामध्ये बरबटलेले असतात.त्यांचे बोलणे बेगडी असते.केवळ ते मुखवट्याच्या जगामध्ये वावरतात.आर्थिक भ्रष्टाचाराबरोबरच कर्तव्यामध्ये प्रतारणा करूनही भ्रष्टाचार करणारे महाभाग या व्यवस्थेत मोठ्या प्रमाणात आढळतात ;आणि तेच लोक व्यासपीठावरून नीतिमत्तेचे धडे देतात.अशा लोकांनी विचारांची पेरणी जरूर करावी ;परंतु ते विचार प्रत्यक्ष आचरणात कसे येतील याकडे विशेष लक्ष द्यावे. छ. शिवरायांनी शून्यातून हिंदवी स्वराज्याची निर्मिती केली त्यापाठीमागे त्यांचे नियोजन महत्त्वपूर्ण होते; पण त्याचबरोबर त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील गुण हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे होते.रयतेच्या देठाला धक्काही लागणार नाही याची विशेष काळजी छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतली होती.त्यांच्या या कार्याचा गौरव करत असताना रामचंद्रपंत अमात्य आज्ञापत्रामध्ये म्हणतात - "या प्रजेचे करूणेस्तव ईश्वरी संपूर्ण कृपानुग्रहे हे आपणास राज्य दिले आहे ,या ईश्वराज्ञेस अन्यथा केल्याने ईश्वराचा क्षोभ होईल ; हे पूर्ण भय चित्तात आणून राज्यमदारुढ न होता सर्वकाल अप्रमत्त होऊन प्रजेच्या हितकार्यी सादर असावे ."अर्थातच छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच 'मी ' त्वाचा आविष्कार आणला नाही तर हे राज्य प्रजेचे आहे हा भाव त्यांचा होता.कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेचीही साडीचोळी करून पाठवले याचे उदाहरण सर्वश्रुतच आहे.म्हणूनच ते एक लोककल्याणकारी राजे होते.आजच्या स्थितीतील लोककल्याणकारी संकल्पनेच्या वल्गना करणाऱ्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वातील हे गुण स्वीकारून सुधारणा केली तरच खऱ्या अर्थाने इथे लोकशाही सुदृढ होईल. साने गुरुजींनी -"बलसागर भारत होवो , विश्वात शोभुनी राहो" असे म्हटले आहे .त्यांचे हे कवण सत्यात उतरावयाचे असेल तर उपर्युक्त चर्चेतील समस्या व इतर काही समस्या सोडविण्यासाठी केवळ विचारांच्या पातळीवर विचार अभिव्यक्त करून चालणार नाही तर विचार आणि कृती यामध्ये बदल करावा लागेल दुसरा बदल म्हणजेच सुधारणा 'प्रथम पुरुषी ' होय .अर्थातच सुधारणा 'द्वितीय पुरुषी ' होण्याच्या ऐवजी 'प्रथम पुरुषी ' बनावी म्हणजेच या समाजव्यवस्थेचे खऱ्या अर्थाने नंदनवन होईल. यात तीळमात्र शंका नाही.

Comments

Popular posts from this blog

नाट्यपरीक्षण तंत्र व स्वरूप

नाट्यपरीक्षण तंत्र व स्वरूप (भाग - २ ) - नाट्यघटक व अभिनय

नाट्यपरीक्षण तंत्र व स्वरूप(भाग - १ )