नाट्यपरीक्षण तंत्र व स्वरूप (भाग - २ ) - नाट्यघटक व अभिनय

घटक - २ *नाट्यघटक व अभिनय* कथात्म साहित्यातील कथा कादंबरी या साहित्य प्रकारापेक्षा नाटकाचा पृथगात्मकतेने विचार करावा लागतो.कथात्म साहित्याचे काही समान गुणविशेष नाटकात असले तरी कथा कादंबरीपेक्षा काही वैशिष्ट्ये ही वेगळीच आहेत.संवाद हे नाटकाचे मूलद्रव्य आहे आणि संवादाच्या माध्यमातून व पात्रांच्या अभिनयातून नाट्य प्रयोग साकारत जातो.प्रयोगाच्या वेळी नाटकाच्या मुख्य घटकांबरोबरच दिग्दर्शन व दिग्दर्शक आणि प्रेक्षक व प्रेक्षागृह याचाही विचार या घटकाच्या अनुषंगाने करावा लागतो.तरच त्या नाट्यकलाकृतीचे व्यवस्थित परीक्षण परीक्षकाला करता येते.म्हणून इथे काही महत्त्वाच्या नाट्य घटकांचा आढावा घेणे क्रमप्राप्त ठरते. *१)संविधानक* कादंबरीत व कथेत कथानक असते.नाटकातील कथानकाला मात्र संविधानक असे संबोधले जाते.संविधानक हा नाटकाचा कणा असतो.यात घटना,प्रसंग, वळणं व उत्कंठावर्धकता या सर्वांचा समावेश होतो.कथानक म्हणजे नाटकात घडणाऱ्या घटनांचा शृंखलाबद्ध क्रम जो कथेला युक्तीपूर्ण वाटचाल देतो.म्हणून नाटकांमध्ये संविधानकाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. न्यायशास्त्रज्ञ ॲरिस्टॉटल यांच्या मतानुसार, "नाटकाच्या सहा मुख्य घटकांपैकी कथानक हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे."अशा या महत्त्वपूर्ण घटकाची अर्थातच कथानकाची गुंतागुंत, निरगाठ व उकल ही नाट्यरस निर्माण करण्यासाठी आवश्यक ठरते.रसिक वाचकाला अथवा प्रेक्षकाला नाट्यरस सहजतेने अनुभवता येत असेल असं संविधानक नाट्यकलाकृतीमध्ये नाटककाराने साकारले पाहिजे. नाटक हे अनेक पात्रे, प्रसंग व संवाद यांच्या साहाय्याने रंगमंचावर सादर केले जाते. शेवटी नाटकाचे संविधानक अर्थातच कथानक म्हणजे नाट्यातील घटनांचा अनुक्रमाने केलेला कलात्मक विकास होय. जे प्रामुख्याने व्यक्तींच्या संवाद, त्यांच्या कृत्यांमधून आणि विविध प्रसंगांच्या मांडणीमधून पुढे सरकते. घटनाक्रमात एक निवडक संकट, संघर्ष, उत्कंठा, क्लायमॅक्स आणि शेवटचा समाधान असा विकास असतो. नाटकातले कथानक सरळ रेषेत अथवा विस्कळीत पद्धतीने विकसित होऊ शकते. केंद्रीय किंवा मुख्य पात्राभोवती कथानक गुंफलेले असते. यामध्ये प्रसंग, भावनात्मक उंचावणी, उत्कंठा व नाट्यपूर्णता हे सर्व घटक आपापले महत्त्व राखतात.पात्रे, संवाद, गाणी, नेपथ्य—हे सर्व कथानकाभोवती फिरतात आणि त्याच्या सहाय्याने नाटकाचं संपूर्ण रूप साकारतं. नाट्यसंहितेमध्ये नाटककाराने हा भाग शाब्दाविष्कारातून साकारलेला असतो.प्रयोगात मात्र इतर घटकांच्या सहाय्याने नाटकाचे संविधानक परिणामकारकपणे कसे साकारते व प्रेक्षक मनावर त्याचा कितपत परिणाम होतो.संविधानक बांधेसूद आहे का आणि ते प्रेक्षकांना नाटकाच्या उत्कर्षबिंदूपर्यंत घेऊन जाते का? अर्थातच केवळ घटनांची रचना म्हणजे संविधानक नसून त्यात व्यक्तिरेखा, शैली, संवाद आणि परिणामी उपसंहार यांचाही समावेश होतो. या सर्व घटकांचा परिणाम किती प्रभावीपणे रसिक - प्रेक्षकावर होतो. याचा विचार परीक्षण करत असताना परीक्षकाला करावा लागतो. *२.व्यक्तिपरिपोष* नाटक हे अनेक घटना प्रसंगाच्या माध्यमातून साकार होत जाते व शेवटी त्याचे लक्षात राहते ते एक संविधानाक; पण नाटक ही केवळ रचनांची जंत्री नसते.तर त्यात एकापेक्षा जास्त घटक महत्त्वपूर्ण ठरतात.कोणतीही नाट्यकलाकृती घेतली तर त्या नाट्यकलाकृतीतील पात्रसृष्टी ही तितकीच महत्त्वाची असते.पात्राशिवाय नाटकाला परिपूर्णता येऊ शकत नाही.म्हणून नाटकातील व्यक्तिरेखांचा परिपोष योग्य पद्धतीने झाला तर ते नाटक रसिकमनावर मोहिनी घालू शकते. नाटकातील व्यक्तिरेखांच्या स्वभाव, मनोवृत्ती, त्यांचे आचार–विचार, भाव–भावना यांचे सखोल, सुसंगत आणि आकर्षक चित्रण होणे यालाच नाटकाच्या परिभाषेत नाटकातील 'व्यक्तिपरिपोष' असे संबोधता येईल. अर्थात नाट्यकलाकृतीत नाटककार एखाद्या पात्राचा विकास, प्रवास व व्यक्तिमत्त्वाच्या विविध अंगांचा विस्तार नाटकाच्या कथानकात कसा दाखवतो ? याला 'व्यक्तिपरिपोष' असे म्हणतात. नाट्यसंहितेचं वाचन करत असताना रसिक वाचक मनावर काही पात्रे गारुड घालतात.ती केवळ त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा परिपोष साधण्यामध्ये नाटककाराला आलेल्या यशामुळेच होय.उत्तम व्यक्तिपरिपोष नाटकाला जिवंतपणा प्राप्त करून देतो.परिणामस्वरूप रसिकवाचक अथवा प्रेक्षक त्या नाटकाशी तादात्म्य पावतो.कलाकृतीतील व्यक्तीच्या भावनांचा अनुभव घेत समरस होतो.नाटकात त्या व्यक्तिरेखेचा चाललेला जो संघर्ष आहे त्या संघर्षाला प्रेक्षक स्वतःसोबत जोडून घेतो. नाटकातील व्यक्तिरेखा या एकाच स्वरूपाच्या किंवा साचेबद्ध असत नाहीत.त्यात वेगवेगळ्या स्वरूपाच्या व्यक्तिरेखा अनुभवायला मिळतात. काही व्यक्तिरेखा प्रतीकात्मक,विशिष्ट प्रवृत्तीचे निदर्शक किंवा प्रातिनिधिक असू शकतात.काही व्यक्तिरेखा सपाट असतात. तर काही गोलाई असलेल्या असतात.म्हणजेच काही पात्रे एका गुणाने परिचित असतात तर काही बहुआयामी असतात.या सर्व व्यक्तिरेखांचा परिपोष साधत असताना व्यक्तिरेखांचे सुसंगत, सखोल आणि बहुआयामी प्रस्तुतीकरण करण्यात नाटककाराला यश आले तर कथानकास आणि नाट्यानुभवाला समृद्ध रूप प्राप्त होते ;आणि ती नाट्यकलाकृती श्रेष्ठ नाट्यकलाकृती ठरू शकते.अलीकडच्या काळातील मिलिंद सोमण लिखित 'ईश्वरसाक्ष'या नाटकातील पात्रसृष्टीवर दृष्टिक्षेप टाकल्यास ती पात्रे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवताना दिसतात.ती त्यांच्या मनात ठसतात.याला कारण केवळ त्या व्यक्तिरेखांचे प्रबळ आणि सखोल केलेले व्यक्तिपरिपोषण होय.सुप्रसिद्ध नाटककार प्र.के.अत्रे यांचे 'तो मी नव्हेच', महेश एलकुंचवार लिखित 'पार्टी'या नाटकांमध्येही प्रबळ आणि सखोल व्यक्तिपरिपोष दिसून येतो—त्यामुळेच या नाटकातील पात्रे प्रेक्षकांच्या मनात ठसतात. ' पार्टी 'त सहभागी झालेल्या व्यक्तीमधील ढोंगीपणा ,खोटेपणा,त्यांच्यातील दांभिकता व भ्रष्टाचारीपणा हा नाटककाराने प्रभावीपणाने चित्रित केला आहे.या सर्व व्यक्तिरेखा चांगुलपणाचे आव आणत सभ्यतेचे मुखवटे परिधान केलेले असतात .महेश एलकुंचवारांनी हे सभ्यतेचे मुखवटे परिधान केलेल्या व्यक्तिरेखांचे मुखवटे दूर करून त्याची चिरफाड केली आहे. त्यामुळे ही 'पार्टी'लक्षणीय बनते.व्यक्तिपरिपोषाच्या दृष्टीने ही दिलेली नाटकाची नावे केवळ वानगीदाखल आहेत.मराठी नाट्य वाङ्‌मयाच्या इतिहासात अशा कितीतरी कलाकृती दाखवता येतील ज्यात नाटकातील व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचे परिपोषण करण्यात नाटककाराला कमालीचे यश आले आहे. नाट्यसंहितेच्या दृष्टिकोनातून व्यक्तिपरिपोषाचा विचार करत असताना ती पात्रे रसिकवाचकावर किती मोहिनी घालतात यावर त्या पात्राचं महत्त्व अधोरेखित होतं;परंतु प्रयोगाचा ज्यावेळी विचार केला जातो तिथे प्रेक्षकांची भूमिका महत्त्वाची असते.अभिनयाच्या माध्यमातून आपला अभिनय साकार करत असताना कलावंत नट अर्थातच पात्रं जिवंतपणा आणत असेल ;आणि त्याचा परिणाम रसिक प्रेक्षक मनावर होत असेल तर ते नाटक उत्तम नाटक होऊ शकते व पात्रही कमालीचे ठरते. प्रयोगाच्या नाट्यपरीक्षणाच्या वेळी नाट्यपरीक्षकाने मूळ संहितेमध्ये नटासाठी दिलेली भूमिका संवाद ,वातावरणनिर्मिती व त्यातून निर्माण होत असलेले प्रसंग आणि इतर घटकांच्या सहाय्याने नट कशी साकार करतो ?शिवाय त्याची वेशभूषा, केशभूषा या बाबीकडेही लक्ष ठेवणे तितकेच महत्त्वाचे असते.नाट्यकलाकृतीतील आपल्या भूमिकेला तो न्याय कसा देतो हे पाहणे महत्त्वाचे ठरते.म्हणून नाट्यपरीक्षक नाट्यपरीक्षण करत असताना त्या नाट्यप्रयोगातील नटांचा अर्थातच व्यक्तींचा परिपोष कसा होतो ? याकडे गांभीर्याने पाहतात. *३.संवाद* संवाद हे नाटकाचे मूलद्रव्य आहे.कथा कादंबरी आदी साहित्यप्रकारात निवेदनाला भरपूर वाव असतो.निवेदनाच्या माध्यमातून तिथे बऱ्याच गोष्टी आपल्याला सांगता येतात;पण नाटक या साहित्यप्रकारात संवादाशिवाय पर्याय नसतो.अर्थातच संवादाशिवाय नाटक अवतरूच शकत नाही.नाटकाचे संविधानक गतिमान होण्यासाठी संवाद हे प्रवाही व आकर्षक असले पाहिजेत.संवाद खटकेबाज, चुरचुरीत, चित्ताकर्षक,नर्म-विनोदी किंवा भावोत्कट असतील तर नाटकाला एक उंची प्राप्त होते.सुरेख संवाद प्रेक्षकांचे लक्ष वेधतात आणि नाटक प्रभावी बनवतात.संवादामुळे जसे संविधानाक पुढे सरकते अगदी त्याचप्रमाणे पात्रांची उंची वाढवण्यासाठी सुद्धा संवाद तितकेच महत्त्वाचे ठरतात.म्हणून शक्यतो संवाद प्रेक्षक व नट यांना डोळ्यासमोर ठेवून लिहिलेले असावेत.त्या संवादात लांबलचकपणा ,अलंकारिकता , अवजडपणा असेल तर ते नाट्यकलाकृतीला मारक ठरतात. म्हणून संवादात सदोषता येणार नाही याची काळजी नाटककाराला घ्यावी लागते.संहितारूपाने नाटक मूर्त रूपात आल्यानंतर त्याचे बरेचसे प्रयोग केले जातात.प्रयोगाच्यावेळी मात्र परीक्षण करत असताना नाट्यपरीक्षकाला नाट्यकलाकृतीतील संवाद नाटकाच्या गतिमानतेला किती पूरक ठरतात ?ते चित्ताकर्षक आहेत का ?संहितेतील संवादाची फेक नट व्यवस्थितपणे करतो का ?पात्रांच्या तोंडी दिलेले संवाद हे त्या पात्राला शोभणारे आहेत का ?संवादाच्या माध्यमातून नाट्यकलाकृती पुढे सरकत असताना ती रसिक प्रेक्षकांवर किती प्रभाव गाजवते ? या सर्व बाबींचा विचार करावा लागतो. नाट्यसंहितेचा प्राण म्हणून संवादाकडे पाहिले जाते.त्यात स्वाभाविकता असली पाहिजे म्हणजेच ऐकताना ते खरे वाटावेत.संवाद विषयाशी निगडित असावेत.पात्रांच्या सामाजिक,शैक्षणिक,वैयक्तिक पातळीशी जुळणारे असावेत.त्यातून पात्रांचे भाव त्यांची मानसिकता प्रकट झाली पाहिजे.तरच ते संवाद परिणामकारक ठरतात.या सर्व वैशिष्ट्यांचा विचार करून ते संवाद किती परिणामकारक आहेत ?मूळ कलाकृतीतील संवादातला परिणामकारकतेचा भाग नटाच्या अभिनयावेळी व संवादफेकीतून किती प्रमाणात जोपासला गेला आहे.या सर्व बाबींचा विचार नाट्यपरीक्षक नाट्यपरीक्षणाच्या वेळी करतात.संवाद हे कथानकाला प्रवाहीपण देत असतील अर्थातच संविधानाक गतिमान बनवत असतील तर ते संवाद परिणामकारक ठरतात.म्हणून नाट्यपरीक्षक या घटकाकडे विशेष असे लक्ष देतात. *४.वातावरणनिर्मिती* नाटकाचे प्रयोगरूप साकार करत असताना रंगमंचावर नटाचा नाट्यानुकूल अभिनय चालू असतो.पात्रापात्रातील संवादातून नाटकाचे संविधानाक पुढे सरकत जात असते.पण कोणतेही नाटक तेव्हाच प्रभावी ठरते जेव्हा प्रसंगानुरूप वातावरणनिर्मिती करण्यात नट कमालीचे यशस्वी ठरलेले असतात.वास्तविक नाट्यसंहितेमध्ये नाटककाराने तसे रंग भरण्याचे प्रयत्न केलेले असतात ;आणि प्रसंगानुरूप वातावरणनिर्मिती केलेली असते.वातावरणनिर्मिती ही नाटकाच्या यशाचे एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि प्रभावी अंग आहे.नाटककाराने नाट्यसंहितेमध्ये हे यश मिळवले असेल तर नटाने प्रयोगरूपावेळी नाट्यानुकूल इतर घटकांच्या सहाय्याने वातावरणनिर्मिती करण्यात मोलाची भूमिका पार पाडली पाहिजे. प्रयोगरूप नाटकात वातावरणनिर्मितीचे महत्त्व फार मोठे आहे. नाटक सजीव आणि प्रभावी व्हावे, तसेच प्रेक्षकांवर योग्य परिणाम घडावा यासाठी वातावरणनिर्मिती महत्त्वाची भूमिका बजावते.वातावरणनिर्मितीमुळेच कथानकातील घटना अधिक परिणामकारक होतात.त्यातून पात्रांचे भावविश्व सहजतेने उलगडते.रंगभूमीवरील वास्तवता वाढण्यास मदत होते त्याचाच परिपाक म्हणून प्रेक्षक नाट्यप्रयोगामध्ये गुंग होतात.प्रभावी वातावरणनिर्मितीमुळे नाटकास एक प्रकारची एकतानता व आकर्षकता प्राप्त होते.कमकुवत वातावरणनिर्मिती ही नाटक कमकुवत करू शकते.अशा नाटकाचा प्रभाव प्रेक्षकावर पडू शकत नाही.म्हणून प्रयोगरूप नाटकात वातावरणनिर्मितीला अनन्यसाधारण महत्त्व आहे.वातावरणनिर्मिती ही प्रयोगरूप नाटकाची पूरक बाजू नसून तो अत्यावश्यक घटक आहे असे आपल्याला म्हणता येईल. नाट्यपरीक्षण करत असताना नाट्यपरीक्षकाला या तंत्राकडेही विशेष लक्ष द्यावे लागते.अर्थातच नाट्यकलावंत अभिनयाच्या वेळी इतर नाट्यघटकाच्या साह्याने नाट्यानुकूल वातावरणनिर्मिती करतात किंवा नाही हे लक्षात घेणे महत्त्वाचे ठरते.संवाद , अभिनय ,वेशभूषा, नेपथ्य, पार्श्वसंगीत , प्रकाशयोजना या सर्व घटकांचे एकात्मिक संयोजन झाल्यास रंगमंचावरील वातावरण प्रभावीपणे साकारले जाते, ज्यामुळे नाट्यकृती प्रेक्षकांसाठी अधिक जिवंत व मनोरंजक बनते.नाट्यकलाकृतीमध्ये वातावरणनिर्मिती करून त्या कलाकृतीत जिवंतपणा कितपत येत आहे हे नाट्यपरीक्षणाच्या दृष्टीने पाहणे उचित ठरते.म्हणून नाट्यपरीक्षकाला या घटकाकडेही गांभीर्याने पाहावे लागते. ५. *प्रसंगवर्णन* नाटकात व्यवस्थित वातावरणनिर्मिती व्हायची असेल आणि रसिक प्रेक्षकाला रसप्रतीती निर्विघ्नपणाने द्यावयाची असेल तर त्या नाट्यकलाकृतीतील प्रसंग उठावदार झाले पाहिजेत.म्हणून नाटकातील प्रसंगाला मूलभूत महत्त्व आहे.प्रसंग म्हणजेच नाटकातील विशिष्ट घटना व संवादांची सुसंगत मालिका . . . त्यामुळे नाट्यकलाकृतीचे कथानक पुढे सरकण्यास मदत होते.किंबहुना नाटकाची रचना प्रसंगामधूनच होते असे म्हटले तर मुळीच वावगे ठरणार नाही.गुंतागुंतीचे प्रसंग, त्यातील निरगाठ आणि त्याची उकल यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्कंठा आणि रस निर्माण होतो.अर्थातच कथानकाच्या विकासात प्रसंगाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होते. कथानकाला गतिमानता आणि दिशा प्राप्त करून देण्यामध्ये प्रसंगाचा मोलाचा वाटा असतो. तसेच नाटक उत्कर्ष बिंदूपर्यंत पोहोचण्यास मदत होते.नाटकामध्ये घडत असलेले सर्व प्रसंग परस्पर संलग्न असतात, त्यामुळे कथानक सुसंघटित आणि बांधेसूद राहण्यास मदत होते.शिवाय उठावदार प्रसंगाच्या माध्यमातून नाटकातील व्यक्तिरेखा उभ्या राहतात.व्यक्तिरेखांच्या परस्पर संवादातून किंवा त्यांच्यातील अंतर्गत संघर्षातून नाटकातील आशय व भावना प्रकर्षाने व्यक्त होतात.त्यात प्रसंग ही मोलाची भूमिका पार पाडतात. प्रेक्षागृहात नाटक पाहणारा प्रेक्षक हाही तितकाच महत्त्वाचा घटक आहे.रंगमंचावर उभे राहणारे नाट्यकलाकृतीतील प्रसंग यामुळे प्रेक्षकांच्या भावना , विचार आणि सामाजिक जाणिवा प्रभावित होतात.परिणामस्वरूप नाटक वास्तवाशी जवळीकता साधून प्रेक्षकांवर प्रभाव गाजवते.खरे तर प्रसंगामुळे नाट्यमयता, रस, संघर्ष, उत्कंठा आणि समाधानाचे वातावरण निर्माण होते आणि त्यामुळेच नाटक प्रभावी ठरते. नाट्यपरीक्षकाला कलाकृतीचे समग्र परीक्षण करत असताना नाट्यकलाकृतीतील प्रसंग किती उठावदार होतात व रसिक प्रेक्षकावर ते प्रसंग किती प्रभाव गाजवतात.याचा विचार करावा लागतो.नाट्यकलाकृतीतील प्रसंग उठावदार झाले तरच रस प्रतीती व्यवस्थितपणे होते;म्हणून नाट्यपरीक्षक प्रयोगाच्या वेळी प्रसंगाकडेही विशेषत्वाने लक्ष देतात. *६. रसाविष्कार* साहित्यामध्ये रसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.सुप्रसिद्ध प्राचीन साहित्य अभ्यासक विश्वनाथाच्या शब्दात सांगायचे म्हटलं तर " वाक्यं रसात्मकं काव्यं " असं त्यांनी रसाला मानाचे स्थान दिलं ;आणि ते यथार्थच आहे.रस म्हणजे प्रेक्षकांच्या मनात निर्माण होणाऱ्या भावनांची अनुभूती; नाटकाच्या प्रभावीतेसाठी विविध रसांचा वापर होतो.शृंगार (प्रेम, सौंदर्य) ,वीर (पराक्रम, शौर्य),करुण (दुःख, शोक),हास्य (विनोद, आनंद),रौद्र (क्रोध) ,भयानक (भीती),बीभत्स (किळस) ,अद्भुत (विस्मय),शांत (शांती, भक्ती) आदी रस साहित्यात महत्त्वाचे मानले गेलेले आहेत.यापैकी नाट्यकृतीच्या प्रकृतीधर्मानुसार नाटककार काही रसांचे आविष्कारण शब्दरूपातून करतो. त्याचे प्रभावीपण हे कलाकृतीची उंची वाढवणारे ठरते.अगदी रसपूर्ण कलाकृतीच रसिक मनावर प्रभाव गाजवत असते.कलाकृतीतून वाचक ,रसिक , प्रेक्षकाला रसप्रतीती कशी व किती प्रमाणात होते यावर त्या कलाकृतीचे यशापयश अवलंबून असते.लिहिणारा लेखक आपल्या कलाकृतीतून प्रसंगानुरूप शब्दांचे आविष्कारण करून रसनिर्मितीला पूरक अशी स्थिती निर्माण करतो. संहितारुपातील हा रस नाट्यप्रयोगाच्यावेळी विभावा अनुभवादींच्या साह्याने प्रत्ययाला येतो ;पण या घटकांना सक्षमपणे उभे करण्याचं काम प्रयोगावेळी नटाबरोबरच नाटकाच्या अन्य घटकांनी झाले आहे की नाही याचे सूक्ष्म निरीक्षण नाट्यपरीक्षक करतात.नाट्यप्रयोगाच्या वेळी रसभंग होत असेल तर ते नाटक अथवा एकांकिका स्पर्धेमध्ये निश्चितच पाठीमागे पडते. नाटक म्हणजे दुसरे तिसरे काहीही नसून जीवनाच्या विविध भावनांचे (रसांचे) रंगमंचीय सादरीकरण होय. त्यात संवाद, अभिनय, संगीत आणि रस हे मुख्य घटक असतात. नाट्यकलावंत आपल्या अभिनयाच्या माध्यमातून रसाचे प्रभावी सादरीकरण करतात. नाटकातील प्रत्येक प्रसंग, संवाद, संगीत किंवा अभिनय हे सर्व घटक प्रेक्षकांच्या भावनेला (रसांना) साद घालतात. रसांच्या योग्य वापरामुळे नाटक प्रेक्षकांचे मनोरंजन, विचारप्रवृत्ती आणि भावभावना जागृत करते.प्रयोगाच्यावेळी रसिक प्रेक्षकांची नाट्यकलाकृती खरोखरच किती भावजागृती करते.याकडे नाट्यपरीक्षक बारकाईने लक्ष ठेवून असतात. *७. नेपथ्य* नेपथ्य म्हणजे रंगमंचाची सजावट.नाट्य कलाकृतीच्या प्रकृती धर्मानुसार व प्रसंगानुसार नेपथ्य सजावट केल्यास कलाकृती अतिशय उठावदार दिसते.त्या कलाकृतीत एक प्रकारचा जिवंतपणा येतो.केवळ पडद्यावरचे चित्र म्हणजे नेपथ्य नव्हे तर इतरही काही बाबी नेपथ्यामध्ये समाविष्ट असतात. त्यात रंगमंचावर नाटकाच्या कथेनुसार काळ आणि स्थळाशी सुसंगत अशी वस्तू, वस्त्र, पडदे, प्रकाश, वेशभूषा, घरातील वस्तू, भित्तीवरील चित्रे इत्यादींची केलेली सुसंगत मांडणी होय. उदा.एखादा स्वयंपाक घरातला प्रसंग दाखवायचा असेल त्यावेळी स्वयंपाक घरातील भांडे, गॅस व स्वयंपाकाला इतर उपयुक्त वस्तू दाखवल्या तर तो प्रसंग वास्तववादी वाटायला लागतो.त्याचप्रमाणे दवाखान्यातील एखादा प्रसंग दाखवायचा असेल तर पेशंट , डॉक्टर, रुग्णरूम ,कॉट , कॉटला अडकवलेले सलाईन , स्टेथोस्कोप ,प्रसंगाला अनुकूल ऑपरेशन थिएटर ,त्याच्या दरवाजावर लाल दिवा आदीचे नेपथ्य उभे केले तर तो प्रयोग प्रभावी वाटतो. कारण नेपथ्याचा उद्देशच प्रेक्षकांसमोर नाटकातील वातावरण साकार करणे, नाट्याच्या आशयाला दृश्य पूरकता देणे हा असतो.प्रभावी नेपथ्य योजनेमुळे नाटकाला आकर्षकता प्राप्त होते.नेपथ्य हे नाटकाच्या एकूण प्रभावाचा आणि प्रेक्षकांच्या अनुभवाचा एक अनिवार्य घटक मानला जातो.प्रकाश, आवाज , संगीतआणि नेपथ्याच्या मदतीने योग्य वातावरण तयार करण्यास मदत होते.जेणेकरून ती कलाकृती उत्कृष्ट कलाकृती अथवा उत्कृष्ट प्रयोग म्हणून गणली जाऊ लागते.काही वेळेला नाटकात प्रतिकात्मक व काल्पनिक नेपथ्य योजना केली जाते तर व्यावसायिक रंगभूमीवर आकर्षक नेपथ्य योजनेला प्राधान्य दिले जाते. नाट्यस्पर्धेच्या प्रयोगावेळी नाट्यकलाकृतीच्या प्रकृती धर्मानुसार नेपथ्य योजना झाली आहे किंवा नाही.शिवाय प्रसंगाला अनुकूल वातावरणनिर्मिती करत रसपरिपोष करण्यास ती नेपथ्य योजना किती उपयुक्त ठरते.याकडे नाट्यपरीक्षकाला लक्ष द्यावे लागते.तरच तो त्या नाट्यकलाकृतीचे परीक्षण सुव्यवस्थित करू शकतो. प्रयोग सादर होत असताना नाटकाचा आशय पारंपरिक असेल तर त्या नाटकातील नेपथ्य योजनासुद्धा प्राचीन भारतीय लोकनाट्य आणि संस्कृतीशी घट्ट जोडलेली असते.पारंपरिक नेपथ्याची रचना बहुतेकवेळी केवळ प्रतीकात्मक स्वरूपाची असते तर कधी कधी रंगमंचावर गणेश, सरस्वती यांच्या रूपातील मुखवटे, झगमगते मुकुट, फुलांची माळ, लाकडी हात, मोर इ. वस्तू वापरल्या जातात.दशावतार किंवा पौराणिक पार्श्वभूमी दाखवायची असेल तर नेपथ्य साधारणपणे भागवत, रामायण, महाभारत यातील प्रसंगानुसार बनवलेले रंगीत पडदे, बुरुज, वाडे, जंगल यांसारखे स्थळरूप तयार केलेले असतात.शिवाय प्रारंभिक काळी गॅस बत्तीचा वापर केला जात असत.त्याचबरोबर प्राकृतिक सामग्री म्हणून लाकडी मेज, खुर्च्या, झाडांच्या फांद्या, फुलांची माळ, विटांचा वापर, पारंपरिक वस्त्रसुची आदींचा वापर नेपथ्य योजनेमध्ये केला जातो. विस्तृत रंगसज्जा हे आधुनिक नाटकाच्या कालखंडाचे वैशिष्ट्य आहे.आधुनिक मराठी नाटकात केली जाणारी नेपथ्य योजना आधुनिक स्वरूपाची आहे.त्यात घरातील दिवाणखाना, स्वयंपाकघर, खिडक्या, दरवाजे, कॉर्पोरेट ऑफिस, हॉस्पिटल, कॅफे अशा समकालीन जागांची नेपथ्यरचना केली जाते.जेणेकरून प्रभावी वातावरणनिर्मिती होईल याला प्राधान्य दिले जाते.पारंपरिक नेपथ्य योजनेमध्ये भव्यतेला प्राधान्य होते तर आधुनिक नाटकात नेपथ्य योजनेमध्ये सूक्ष्म यथार्थ व वास्तववादी योजनेला प्राधान्य दिले जाते.प्रकाश,आवाज आणि अल्प साहित्याच्या साह्याने वातावरणनिर्मितीवर भर दिला जातो, हे आधुनिक नाटकातील नेपथ्य योजनेचे वैशिष्ट्य आहे. नाट्य परीक्षणाच्या वेळी नाट्य परीक्षकाला अगदी पारंपरिकता व नवता आणि त्यातील नेपथ्याला लक्षात घेऊनच परीक्षण करावे लागते.तरच तो नाट्यपरीक्षक त्या कलाकृतीचे यथायोग्य परीक्षण करू शकतो.म्हणून नेपथ्य या घटकाकडे अन्य घटकाप्रमाणेच नाट्य परीक्षकाला लक्ष द्यावेच लागते.नाट्यकलाकृतीमध्ये उपयोगात आणले गेलेले नेपथ्य हे त्या कलाकृतीला सुसंगत आहे का ? हे लक्षात घेऊन त्या कलाकृतीचे मूल्यमापन नाट्यपरीक्षक करतात. *८.प्रकाशयोजना* नाटकातील प्रसंगाला उठावदारपणा येण्यासाठी प्रकाश योजनेची आवश्यकता असते.प्राचीन काळी नाट्यप्रयोग सादर केले जात असताना टेंभे, गॅसबत्ती आदींचा वापर केला जायचा.अशा प्रकाशयोजनेत निश्चितच मर्यादा पडायची आणि जो न्याय नटाला मिळायला हवा तितका मिळत नव्हता.आधुनिक काळात तंत्रज्ञानाने खूप मोठी प्रगती केलेली आहे.त्याचा परिणाम नाटकाच्या परिणामकारकतेसाठी सुद्धा महत्त्वपूर्ण ठरतो.एखादे पात्र बोलत असेल तर त्याच पात्रावर प्रेक्षकाचे लक्ष केंद्रित व्हावे यासाठी फक्त त्याच पात्रावर प्रकाशयोजना करण्याची सोय आता झालेली आहे.आता रंगमंचावरील प्रसंगांना भावात्मक आणि दृष्यात्मक अर्थ देण्यासाठी प्रकाशाचा वापर करण्याची कला अवगत झाली आहे.प्रकाशयोजनेमुळे नाटकातील घडामोडी स्पष्टपणे प्रेक्षकांसमोर येतात. कलाकारांचे भाव आणि हालचाली ठळक होतात आणि रंगमंचासाठी आवश्यक वातावरणनिर्मिती होते.अलीकडच्या काळात स्पॉटलाइट्स आणि पारलाइट्स या दिव्यांचा वापर करून प्रकाशाची तीव्रता, कोन आणि दिशा नियंत्रित केली जाते. त्यासाठी डिमर कंट्रोल वापरून प्रकाश अधिक किंवा कमी केला जातो.आधुनिक प्रकाशयोजनांमध्ये डिजिटल आणि ऑटोमॅटिक कंट्रोलचा वापर वाढला आहे ज्याने प्रकाश नियोजन अधिक सूक्ष्म आणि सजीव होते.ज्यामुळे त्या त्या प्रसंगाचा अर्थ अधिक प्रभावीपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यास मदत होते. रंगीत प्रकाशयोजनेमुळे भावनांचे सूचन करणेही सोपे होते. उदा.निळा रंग रात्रीचा प्रसंग दर्शवतो तर लाल रंग धोका किंवा तीव्र भावना व्यक्त करतो.शिवाय सकाळ - संध्याकाळ ,पहाट ,चांदणं हे सर्व रंगमंचावर दाखवण्याची किमया प्रकाश योजनेमुळे निर्माण झाली आहे.अर्थातच प्रभावी प्रकाश योजनेमुळे नाटकाची परिणामकारकता वाढण्यास मदत होते. नाट्यपरीक्षकाला प्रयोगाच्या वेळी केली जाणारी प्रकाशयोजना सुसंगत आहे की नाही याकडे लक्ष द्यावे लागते.खरेतर कलाकारांवर एकमेकांची सावली पडणार नाही याची काळजी प्रकाशयोजकाला घ्यावी लागते.म्हणजे प्रेक्षकांना सर्व पात्र सुस्पष्ट दिसतील.चुकीच्या प्रकाश योजनेमुळे एका पात्राची दुसऱ्या पात्रावर सावली पडत असेल तर ती बाब परीक्षकाला खटकते आणि त्या कलाकृतीला गुणांकन कमी दिले जाते.नाट्यकलाकृतीत नेपथ्य आणि संगीतासह प्रकाशाचा समन्वय करून नाटक अधिक अर्थपूर्ण आणि आकर्षक करता येते.म्हणून प्रकाशाचा वापर अर्थपूर्णता व आकर्षकतेसाठी कसा केला जात आहे याकडे नाट्यपरीक्षक बारकाईने लक्ष देतात. रंगमंचावर दाखवला जाणारा प्रसंग अधिक सजीव, अर्थपूर्ण आणि प्रेक्षकांच्या अनुभवाचा भाग होण्यासाठी प्रकाश योजनेचा कसा वापर केला जातो. याचे सूक्ष्म निरीक्षण नाट्यपरीक्षक करत असतात. *९.वेशभूषा* नाट्यकलाकृतीमध्ये नाटकाची संहिता कशी आहे अथवा स्थळ ,काळ परिस्थिती कशी आहे यानुसार वेशभूषा असावी लागते.अर्थातच कलाकृतीतील प्रसंगानुरूप वातावरणनिर्मिती होण्यासाठी वेशभूषासुद्धा तितकीच महत्त्वपूर्ण ठरते.वेशभूषा म्हणजे केवळ कलाकारांचा कपडा नव्हे, तर ती पात्राची ओळख, त्याची सामाजिक स्थिती, मनःस्थिती आणि व्यक्तिरेखेचा प्रभाव प्रस्थापित करणारे महत्त्वाचे घटक असतात.नाटकातील पात्रांचे स्वभाव ,काळ,पार्श्वभूमी आणि भूमिका प्रेक्षकांना स्पष्ट आणि प्रभावीपणे समजण्यास वेशभूषा उपयोगी पडते.नाटकातील वेशभूषा प्रामुख्याने त्या नाटकाच्या थीमवर आधारित असते.एखाद्या नाट्यकलाकृतीमध्ये पौराणिक प्रसंग दाखवायचा असेल तर देव देवता , देवता गण व त्यानुरूप पात्र यांना शोभणारी वेशभूषा तिथे असावी.नाट्यकलाकृतीची संहिता ऐतिहासिक विषयावर असेल तिथे राजा,प्रधान व सैन्य यांना अनुरूप अशीच वेशभूषा असावी.शेतकऱ्याचे चित्र नाट्य कलाकृतीत रंगवायचे असेल तर शेतकऱ्याला शोभेल अशी वेशभूषा त्यात असावी.आधुनिक भारतीय वेशभूषा पारंपरिक तत्त्वांना कायम ठेवून जागतिक फॅशनच्या ट्रेंडनुसार बदलत आहे. ज्यात दैनंदिन सोयीसाठी व पारंपरिक सणांसाठी वेगळा फोकस आहे.जागतिकीकरणाच्या काळात माणसाच्या वेशभूषेत बराच बदल झाला तो नाट्यकला कृतीतही प्रत्ययाला येतो. नाट्यप्रयोगाच्या परीक्षणावेळी नाट्यपरीक्षकाने अभिनय करणाऱ्या नटाच्या वेशभूषेकडे लक्ष देऊन त्याने परिधान केलेली वेशभूषा किंवा रंगसंगती ही त्याच्या पात्ररूपाला अनुरूप आहे का हे पाहावे लागते.त्याचबरोबर त्याने केलेली वेशभूषा ही नेपथ्याच्या पडद्यावरील रंगाशी साधर्म्य साधणारी नसून विरोधी आहे का हे पाहावे लागते.जर पडद्याचा रंग आणि नाट्य कलावंताच्या वेशभूषेचा रंग सारखाच असेल तर नाटकातील परिणामकारकता निघून जाते ;आणि नाट्य कलाकृतीतील रसपरिपोष व्यवस्थितपणे होण्यास बाधा निर्माण होते.अगदी 'ईश्वरसाक्ष' या नाटकाचा प्रयोग करत असताना ही उणीव आमच्या कलावंत टीमला नाट्यपरीक्षकाने दाखवून दिली होती.केवळ वेशभूषेतील त्या चुकीमुळे काही गुणही कमी केले होते.त्यावेळी त्यांनी त्याचे महत्त्व सांगताना - "अशा चुकीमुळे प्रेक्षकाचे अवधान नाट्यावरून बाजूला सारले जाते व ते वेशभूषा आणि पडद्यावर लक्ष केंद्रित करतात.म्हणून रसविघ्न येण्याची शक्यता नाकारता येत नाही. "असे मत प्रतिपादन केले.अर्थातच रसपरिपोष आणि वेशभूषा दोन्ही मराठी नाटकांत एकमेकांच्या पूरक असून, नाटकाला जीवनदान देणारे आणि प्रेक्षकांच्या मनाला भिडणारे मुख्य घटक आहेत.म्हणून नाटकात पात्रांची केली जाणारी वेशभूषा ही त्या पात्राला शोभणारी,प्रसंगाला शोभणारी व नेपथ्य सजावटीला उठून दिसणारी असावी.अशी भूमिका त्यांनी मांडली.वरवर पाहता वेशभूषा ही दुय्यम वाटत असली तरी ती नाट्यकलाकृतीच्या परिणामकारकतेसाठी पूरक आहे.अर्थातच 'ईश्वरसाक्ष ' नाट्यप्रयोगाच्यावेळी नाट्यपरीक्षकाने उपरनिर्देशित व्यक्त केलेले त्यांचे मत हे सर्वच नाट्यपरीक्षकांच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण आहे.नाट्यपरीक्षण तंत्राच्या दृष्टीने ते उपयोगी आहे. *१०.अंक ,प्रवेश ,दृश्य* नाटकात स्थळ,काळ व परिस्थिती बदलून दाखवण्यासाठी अंक -प्रवेश - दृश्याचा सुयोग्य वापर करता येतो. म्हणून नाटकात 'अंक ', 'प्रवेश 'आणि 'दृश्य'या घटकांना अत्यंत महत्त्व आहे. या घटकांविषयी सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे सांगता येईल. *अंक* कथानकाचा घटनाक्रम, संघर्ष , उत्कर्षबिंदू व निराकरण असे विविध टप्पे अंकामध्ये समाविष्ट असतात.हा नाटकातील मोठा विभाग मानला जातो. प्रत्येक अंकात एक विशिष्ट दृष्टिकोन , नवीन संघर्ष किंवा काही बदल दाखवले जातात.प्रत्येक अंकाचा शेवट मात्र प्रेक्षकांच्या उत्सुकतेत भर भरणारा असावा लागतो.त्याशिवाय रसिक - प्रेक्षक त्यात गुंतून राहत नाही.अशा उत्सुकतेत भर घालणाऱ्या अंकामुळेच रसिक प्रेक्षक पुढील अंकाची वाट पाहतात व त्यात रमतात.म्हणून अंकाची योजना अशा प्रकारे आकर्षक करावी लागते.नाट्यपरीक्षक मोठ्या नाटकाचे परीक्षण करत असेल तर त्यातील अंक योजना करत असताना किती आकर्षक केली गेली आहे . रसिक प्रेक्षकांना ती किती प्रमाणात उत्कंठा वाढवत गुंतवून ठेवणारी आहे.याकडे लक्ष देतात. *प्रवेश* नाटकात एकाच अंकात वेगळ्या घटनास्थळी किंवा वेगळ्या वेळेला घडणारी परिस्थिती दाखवण्यासाठी प्रवेश या घटकाचा वापर केला जातो. अर्थातच प्रवेश हा अंकाचा पुढचा विभाग आहे असे म्हटल्यास मुळीच वावगे ठरणार नाही. प्रवेश बदलल्यामुळे नाटकातील व्यक्तिरेखा, स्थळ किंवा प्रसंग बदलतो. परिणामस्वरूप कथानक अधिक स्पष्ट आणि आकर्षक बनण्यास मदत होते.रंगमंचावरील हालचाली सुलभ होण्यास प्रवेशाची मदत घेतली जाते.नाट्यपरीक्षक नाटकातील प्रवेशाचा वापर प्रयोगाच्या वेळी कसा केला गेला आहे.त्याचा वापर औचित्यपूर्ण केला आहे किंवा नाही.याचेही निरीक्षण करतात.एकंदरीत गुणांकन प्रक्रियेमध्ये या घटकाचाही विचार केला जातो. *दृश्य* हा एक नाटकाच्या प्रवेशातील अधिक सूक्ष्म विभाग म्हणून लक्षात घेतला जातो. नाटकातील प्रवेशात जे विशिष्ट प्रसंग साकारले जातात त्यांना 'दृश्य ' असे म्हणतात.नाटकाची कथा अधिक तरल , गतिमान व वास्तववादी होण्यास 'दृश्य ' हा घटक उपयुक्त ठरतो.कथानकाला गतिमानरूप देतानाच व्यक्तिरेखांच्या भावनांचे प्रकटीकरण आणि प्रेक्षकासमोर दृश्य घटक उपयोगात आणला जातो. थोडक्यात नाटकातील अंक, प्रवेश आणि दृश्ये यामुळे रंगमंचावर रचनेची सुस्पष्टता मांडण्यासाठी सोपी होते आणि त्या नाटकास कलात्मकरुप देता येते.शिवाय या घटकामुळे नाटकाची उंची वाढवण्यास मदत होते.त्याचबरोबर दिग्दर्शकसुद्धा या वेळेचा सदुपयोग प्रकाश , नेपथ्य , संगीत यात बदल करण्यासाठी करून घेतात. नाट्यपरीक्षक अंक - प्रवेश व दृश्य या घटकामुळे प्रस्तुत नाटक गतिमान, सुसंगत व किती परिणामकारक झाले आहे हे तपासतात.शिवाय अंक - प्रवेश - दृश्य यामुळे कथानकातील भावनिक उत्कर्ष व प्रसंगाची अदलाबदल किती सहजपणे व स्पष्टपणे दाखवलेली आहे याकडेही ते लक्ष देतात. *११.रंगसूचना* नाटकातील संहितेमध्ये कंसात जी वाक्य दिली जातात त्यांना 'रंगसूचना'असे म्हणतात.नाट्यप्रयोगाच्यावेळी नटाने रंगसूचनेची वाक्य संवादाच्या माध्यमातून उच्चारायची नसतात तर त्यानुरूप अभिनय करावयाचा असतो.नाटकात रंगसूचना प्रामुख्याने कंसात असल्या तरी काही काही नाटकात कोष्टक, तिरकस अक्षरे ,फॉन्ट किंवा वेगळ्या रचनेनेही दिलेले असतात.अर्थातच नाट्यसंहितेमध्ये संवादाशिवाय दिलेले निर्देश म्हणजेच रंगसूचना होय.रंगसूचनेमुळे दिग्दर्शक व अभिनय करणाऱ्या नटाला पात्र, वेश,प्रकाश , आवाज, नेपथ्य , चलनवलन , मौन , हालचाली, प्रसंगातील वातावरण अशा विविध बाबींची माहिती मिळण्यास मदत होते.परिणामस्वरूप नाटकातील भाव उत्कटपणे प्रेक्षकापर्यंत पोहोचण्यास मदत होते आणि नाटकातील आशय प्रभावीपणाने पोहोचतो. प्रसंगदर्शक ,भावदर्शक , चालनदर्शक , वातावरणदर्शक, मौनदर्शक असे रंगसूचनांचे विविध प्रकार पडतात. 'रात्रीच्या अंधुक प्रकाशात पडलेले चांदणे ' , 'पात्र खिडकीतून बाहेर पाहते ' (प्रसंगदर्शक) ; ' क्षणभर मौन ' , ' ती उत्कंठेने बोलते ' (भावदर्शक)अशा विविध प्रकारांच्या रंगसूचनांचं आविष्कारण नाट्यसंहितेतून आलेलं असतं. त्या रंगसूचनेनुसार प्रयोगात कृती अपेक्षित असते. रंगसूचनेनुसार नट किती प्रभावी अभिनय करतो व प्रयोगात प्रसंगानुरूप रंगसूचनेचा किती प्रभावीपणाने वापर केला जातो.यावर त्या रंगसूचनेचे महत्त्व अधोरेखित होते.कारण नाटकातील संवादानंतरच्या किंवा संवादात नसलेल्या भावना ठळकपणे प्रकट करण्याचं काम रंगसूचना करत असतात .शिवाय रंगसूचनेचा उपयोग फक्त दिग्दर्शक व कलाकारांसाठीच होतो असे नव्हे ;तर प्रेक्षकांच्या मनामध्ये नवे अर्थ व भाव उमजवण्याचे काम रंगसूचनेच्या माध्यमातून केले जाते.म्हणून नाट्याची परिणामकारकता वाढवण्यास या घटकाचेही अनन्यसाधारण महत्त्व आहे. नाट्यपरीक्षक नाट्यपरीक्षण करत असताना दिग्दर्शक व कलाकारांनी प्रसंगदर्शक , भावदर्शक ,चालनदर्शक , वातावरणदर्शक , मौनदर्शक या रंगसूचनांचा प्रभावी वापर करून नाटकाला परिणामकारकता प्राप्त करून दिली आहे का ? याकडे लक्ष देतो. रंगमंचावरील दृश्ये अधिक प्रभावी, नेमकी व प्रेक्षकांना समजण्यास सोपी बनतात ते रंगसूचनेमुळे. . . तो प्रभावीपणा व नेमकेपणा नाट्यप्रयोगात किती आणला गेला आहे याचेही निरीक्षण नाट्यपरीक्षक करत असतात. *१२.पार्श्वसंगीत* नाटकाला परिणामकारकता प्राप्त करून देण्यात पार्श्वसंगीत (बॅकग्राऊंड ) हाही एक महत्त्वपूर्ण घटक आहे.या घटकाचा प्रामुख्याने वापर पडद्यामागून किंवा आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने केला जातो. नाटकातील प्रसंग, वातावरण,भावना आणि पात्रांचे मनोविज्ञान खुलवण्याचे मोठे काम पार्श्वसंगीत करते. अभिनयाला पूरक आणि प्रसंगाला पूरक असे संगीत पार्श्व स्वरूपात दिल्यामुळे एखादा भावनिक, संघर्षात्मक किंवा रहस्यमय प्रसंग अधिक रंगतदार होतो.उदाहरणार्थ आनंदाच्या प्रसंगी 'हलकेफुलके संगीत ,' संघर्षाच्या प्रसंगी 'नाट्यमय संगीत ' ,पाऊस पडत असल्याचा भाग दाखवायचा असेल तर 'पाऊस पडत असल्याचे ध्वनीयुक्त संगीत ' , 'दरवाजा वाजल्याचे संगीत ' ,बंदुकीतून गोळी घालावयाची असेल तर 'बंदुकीतून गोळी सुटण्याचा आवाज करणारा ध्वनी ' ,अशाप्रकारे नाटकातील विविध प्रसंगांच्या अनुषंगाने वेगवेगळे संगीत किंवा ध्वनी फक्त वापरले तर सांगीतिक पार्श्वरूप नाटकाला उठावदारपणा प्राप्त करून देते. शिवाय रसानुकूल रागदरी पार्श्वसंगीत असेल तर ते नाटक उत्तम नाटक होते.यमन ,भीमपलास , पिलू , पहाडी आदीसारखे राग भावनात्मक किंवा मृदू,रेशमी शृंगाररसात्मक प्रसंगांमध्ये अधिक वापरले जातात ; करुण, दु:खद प्रसंगासाठी हळूवार उदासिनतेचे रंग असणारे भीमपलास, भैरवी ,कलावती ,मुलतानी राग निवडले जातात ;वीररसासाठी उन्मेषजनक, सामर्थ्यदर्शक असे कल्याण, देसकार , जयजयवंतीसारखे राग निवडतात ;अद्भुत , आश्चर्य, नवलाईसाठी शंकरा, झिनी, आसावरी, ललतसारखे राग ;शांत रसासाठी यमन, भैरवी, अडाणा, पहाडी आदी सारखे राग वापरले जातात.म्हणून योग्य त्या ठिकाणी योग्य त्या पार्श्वसंगीताचा व त्या संगीताला पूरक अशा रागाचा वापर नाट्यप्रयोगाच्या वेळी केला तर रसोत्पत्ती व्यवस्थित होऊ शकते.नांदी, पदे, प्रसंगातील पार्श्वसंगीतासाठी जागोजागी विविध रागांचा वापर आजपर्यंत मराठी नाटकात करण्यात आलेला आहे.विविध रसानुरूप प्रसंगासाठी त्या त्या भावनेला उठावदार रूप प्राप्त करून देण्याकरिता अनुकूल असा राग निवडला जातो.अन्यथा रसविघ्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.सामान्यपणे, राग यमन, भीमपलास, झिनी, पहाडी, कलावती, भूपाळी, भैरवी, आसावरी, मालकंस, जयजयवंती, देसकार वगैरे राग प्रसंगानुरूप व रसानुकूल वापरण्याचं काम दिग्दर्शक व कलावंत करत असतात. नाटकाच्या दृश्यांना अधिक सजीव करून भावनांची सूक्ष्म छटा रंगवत प्रेक्षकांमध्ये रसोत्पत्ती (काव्यरस) निर्माण करण्यास हा घटक अतिशय उपयुक्त ठरतो.त्याचबरोबर संगीतामुळे नाटकाच्या एकूण बांधणीला लय, गती, जोश आणि आकर्षकता मिळते. दृक्-श्राव्य अनुभव अधिक सुंदर, नाट्यमय बनतो. प्रेक्षकांसमोरील दृश्य प्रत्यक्ष अनुभवासारखे वाटते.संवाद , अभिनय व वातावरण यामध्ये समन्वय साधून एकात्मता निर्माण करण्यात पार्श्वसंगीत मोलाची भूमिका पार पाडते. नाट्यपरीक्षक नाट्यपरीक्षण करताना नाटकामध्ये उपयोगात आणलेले पार्श्वसंगीत नाटकातील आशय व सामाजिक संदेश पोहचवण्यास ताकद देणारे आहे का ?प्रसंगानुरूप व रसाला पूरक असे पार्श्वसंगीत आहे का?तसेच कलात्मक सौंदर्याची उंची गाठण्यास ते कितपत मदत करते ? याकडे विशेष लक्ष देतात. कारण पार्श्वसंगीत हा एक नाटकाचा अविभाज्य आणि प्रभावी घटक आहे. *१३.विंगेतील प्रवेश* नाट्य प्रयोगाच्यावेळी नाट्य कलावंताला अनेक बाबीचे भान ठेवावे लागते. उत्कृष्ट अभिनय हा त्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा असतो ;पण त्याबरोबरच हा अभिनय रंगमंचावर सादर करण्यासाठी येण्याकरिता त्याचा विंगेतून होणारा प्रवेश हासुद्धा तितकाच महत्त्वाचा असतो.विंगेतील प्रवेश चुकीचा झाला तर काही प्रमाणात रसबाधा येऊ शकते. "विंग म्हणजे रंगमंचाच्या बाजूतील किंवा मागील बाजूस असलेली जागा जिथून नट/नटी रंगमंचावर प्रवेश करतात. " नटाचा विंगेतील प्रवेश हा विशेष कौशल्याचा भाग असतो.नेहमी रंगमंचावर प्रवेश करत असताना प्रेक्षकांच्या विरुद्ध दिशेला असणाऱ्या पायाने प्रवेश करावा. अर्थातच नट अथवा नटी उजव्या विंगेतून प्रवेश करत असतील तर उजवा पाय प्रथम रंगमंचावर ठेवावा ;आणि डाव्या विंगेतून प्रवेश करत असतील तर डावा पाय पुढे ठेवावा. अशा पद्धतीने नट -नटींनी प्रवेश केल्यामुळे प्रवेशाच्या वेळी प्रेक्षकाकडे पाठ होणार नाही व कलावंताच्या चेहऱ्यावरील भाव प्रेक्षकास स्पष्टपणाने दिसण्यास मदत होईल. शिवाय कलावंताने ठरलेल्या क्षणी, योग्य भाव, वेश, वाचिक आणि शरीरिक तयारीसह विंगेतून मंचावर यावे लागते.म्हणून प्रवेशसुद्धा कौशल्यपूर्ण असावा लागतो.रंगमंचावर नटाचा प्रवेश (विंग एंट्री) ही नाटकातील अत्यंत महत्त्वाची क्षणिक क्रिया आहे. कारण विंगेमधून येणारा नट आपली भूमिका, व्यक्तिमत्त्व, मानसिक स्थिती किंवा कथानकातील वळण प्रेक्षकांसमोर ठेवतो.म्हणून नटाचा विंगेतील प्रवेश हासुद्धा प्रयोगाच्यावेळी तितकाच महत्त्वपूर्ण ठरतो.या प्रसंगाचे महत्त्व प्रतिपादित करीत असताना "रंगमंचावर नटाने विंगेतून केलेला प्रवेश ही एक रंगावली आणि कौशल्याची कविता असते ,जी प्रयोगाला प्रभावी व जिवंत बनवते. "असे म्हटले जाते.यावरूनच विंगेतून प्रवेशाला असलेले महत्त्व अधोरेखित होते. नाट्यपरीक्षक नाट्यप्रयोगाचे परीक्षण करत असताना नट अथवा नटीचा रंगमंचावर विंगेतून होणारा प्रवेश याकडे बारकाईने लक्ष ठेवून असतात.मूल्यमापनाच्यावेळी या घटकाकडेसुद्धा ते विशेष लक्ष देतात. नाट्यप्रयोगाच्या वेळी रसप्रतीती येण्यास अडचण येणार नाही असा नटाने विंगेतून प्रवेश करावा. हा सांकेतिक नियम लक्षात घेऊन नाट्यपरीक्षक नाटकाचे मूल्यमापन म्हणजेच परीक्षण करतात. *१४.अभिनय* नाटकाची नाट्यसंहिता प्रभावी असली तरी प्रयोगाच्यावेळी नाट्यप्रयोगातील कलावंत अभिनय किती उत्कृष्टपणे साकार करतात यावर त्या नाट्यकलाकृतीचे यशापयश अवलंबून असते.हा अभिनय भाषिक (वाचिक), आंगिक , सात्विक व आहार्य स्वरूपाचा असतो.नाट्यपरीक्षकाला प्रयोगाचे परीक्षण करत असताना अभिनय या घटकाकडे विशेष लक्ष द्यावे लागते.म्हणून या घटकाचे परीक्षण करत असताना तो पुढील गोष्टींच्या नोंदी विशेषत्वाने लक्षात घेतो. *अ)भाषिक अभिनय* नाट्यप्रयोगाच्यावेळी नाटकातील पात्रा - पात्रांच्या संवादातून संविधानाक आकारास येते.म्हणून नाटकातील भाषिक बाजू अत्यंत महत्त्वाची असते.नटाने केलेली संवाद फेक ,त्या संवादातील शब्द व शब्दाचे अर्थ,संप्रेषणक्षमता आणि शब्दावलीतील भावनांचा परिणाम कसा आहे ? हा भाग भाषिक अभिनयाच्यावेळी महत्त्वपूर्ण ठरतो.म्हणून नाट्यप्रयोगात नटाचा आवाज त्याची उच्चारणाची पद्धत अर्थातच स्पष्ट उच्चार,पात्राचे वय व त्याचा स्तर यानुसार उच्चार ,वाक्यावर तो देत असलेले आघात ,वाक्य उच्चारण करत असताना त्याने घेतलेले विराम या सर्व भाषिक अभिनयाच्या बाबी लक्षात घेऊन नाट्यपरीक्षण केले जाते.कारण वाचिक अभिनयामुळे म्हणजेच नटाचे संवाद, शब्द, आवाजाची लय, उतार-चढाव, स्पष्टता, भावना आणि योग्य अर्थपूर्णता राखून प्रेक्षकांपर्यंत संवाद सहजपणे पोहोचवण्यास मदत होते. असा भाषिक अभिनयच नाटकाची परिणामकारकता वाढवण्यास मदत करतो.म्हणून नाट्यप्रयोगात वाचिक अभिनय हा मूलभूत व केंद्रस्थानी मानला जातो. *ब)आंगिक अभिनय :-* शरीर, शरीराची हालचाल , हावभाव , मुद्राभंग , पावलांची चाल ,चेहरा, हात, पाय, डोळे, भुवया, हातवारे आणि शरीराची हालचाल यांच्या साह्याने भावना, विचार, घटना सादर करण्याच्या अभिनयाला 'आंगिक अभिनय ' असे म्हणतात.भरतमुनींच्या नाट्यशास्त्रानुसार, नाटकातील आंगिक अभिनयाला सर्वात मूलभूत मानले जाते. नाट्यपरीक्षक नाट्यपरीक्षण करत असताना नटाच्या आंगिक अभिनयाच्या दृष्टिकोनातून तंत्रशुद्ध निरीक्षण करत असतात.नटाचे शरीर व शारीरिक हवभावांची भाषा ,डोळ्याच्या हालचाली आदीवर नजर ठेवून परीक्षकाचे निरीक्षण चालू असते.नटाची हालचाल अभिनयाच्या वेळी अतिशय महत्त्वाची असते.खरे तर अभिनय करत असताना नटाने प्रेक्षकांना पाठ दाखवू नये.नटाने प्रेक्षकाकडे पाठ करून अभिनय केला तर चेहऱ्यावरचे बारकावे लक्षात येणार नाहीत.म्हणून या हालचालीकडेही परीक्षक बारकाईने लक्ष ठेवून असतात.संवाद फेक करण्यापूर्वी व्यवस्थित कृती करतो किंवा नाही या शारीरिक गोष्टीकडेही परीक्षकाचे लक्ष असते.आंगिक अभिनय हा भूमिकेच्या सजीव अभिव्यक्तीचा मुख्य पाया असतो. या आंगिक अभिनयामध्ये महत्त्वाचे तीन मुख्य भाग लक्षात घेतले जातात. ते म्हणजे शरीरज , मुखज व चेष्टाकृत हे होय. ।)शरीरज या भागात शरीराच्या मुख्य अंगांचा वापर करून केलेला अभिनय असतो. उदा. अंगविक्षेप, शारीरिक हालचाली , नृत्याप्रसंगीच्या विविध मुद्रा ॥)मुखज या भागात मुख, डोळे, भुवया, ओठ आणि चेहऱ्याच्या लहान अंगाद्वारे भावप्रदर्शन करून केलेला अभिनय लक्षात घेतला जातो. ॥।)चेष्टाकृत या भागात शरीराचा विशिष्ट भाग वापरून केलेल्या हालचाली उदा. लंगडेपणा, बुजुर्गांची वागणूक यांचं अनुकरण यासारख्या बाबी लक्षात घेतल्या जातात. *क) सात्त्विक अभिनय* भरतमुनींनी रसनिष्पत्तीच्या संदर्भामध्ये नाट्यशास्त्रात अष्टसात्त्विक भाव सांगितले. त्यात त्यांनी अश्रू (डोळ्यांत पाणी), स्वेद (घाम), रोमांच (अंगावर शहारे), स्तंभ (अचल अवस्था), कंपन (कंपायमानता), वैवर्ण्य (चेहऱ्याचा रंग बदलणे), मूर्छा (बेशुद्ध अवस्था) व स्वरभेद (आवाज बदलणे) हे अष्टसात्त्विक भाव मानलेले आहेत. सात्त्विक अभिनय हा नाटकातील अभिनयाचा एक अत्युच्च प्रकार आहे. कलावंताने अभिनय करताना केवळ बाह्य रूप, हालचाल किंवा संवाद असा अभिनय न करता ,तो साकारत असलेली व्यक्तिरेखा जिवंतपणे उभी करण्यासाठी त्या व्यक्तिरेखेच्या अंतरंगात प्रवेश करावा लागतो. तरच त्या अभिनयातून मुळची अनुभूती प्रेक्षकांपर्यंत पोचवण्यास मदत होते. वास्तविक अनुभूती प्रेक्षकापर्यंत पोहोचवणे हाच सात्त्विक अभिनयाचा गाभा आहे.इथे प्रामाणिकपणाने अष्टसात्त्विक भाव प्रकट केले तर अभिनयात कृत्रिमपणा वाटत नाही.तिथे एक सच्चा अनुभव प्रत्ययाला येतो.नाट्यकलाकृतीतील मूळ पात्र सजीवपणे उभे करणे हेच सात्त्विक अभिनयाचे खरे प्रयोजन असते. नाट्यपरीक्षक नाट्य प्रयोगाच्यावेळी नट आपल्या सात्त्विक अभिनयामुळे व्यक्तिरेखेला किती प्रमाणात सजीवता प्राप्त करून देतो ;आणि त्याचा सात्त्विक अभिनय नाटकाची परिणामकारकता वाढवण्यासाठी कितपत फायदेशीर ठरतो याकडे लक्ष देऊन परीक्षण करतात. *ड)आहार्य अभिनय* भरतमुनींनीच नाट्यशास्त्रामध्ये आहार्य अभिनय हासुद्धा रसनिष्पत्तीसाठी महत्त्वाचा मानलेला आहे.आधुनिक काळात तर आहार्य अभिनयाचा वापर अतिशय सहजतेने करून घेतला जातो. रंगमंचावरील नेपथ्य, वेशभूषा, रंगभूषा, अलंकरण, वस्त्र, मुखवटे, शस्त्रे, उपकरणे,विशेष प्रकाशयोजना इ.च्या मदतीने पात्र,काळ,प्रसंग आणि वातावरणाची निर्मिती करणे म्हणजेच आहार्य अभिनय होय.ज्यात नटाची कृती अथवा अभिनयापेक्षा त्याची बाह्य सजावट, रूप, नेपथ्य या गोष्टी लक्षात घेतल्या जातात.अगदी स्पॉटलाईटचा वापर प्रयोगाच्यावेळी योग्यपद्धतीने केला आहे काय ?याकडेही विशेष लक्ष दिले जाते. जर नट स्पॉटलाईटच्या बाहेर गेला तर त्याच्या हालचाली व हावभाव प्रेक्षकांना स्पष्ट दिसत नाही.म्हणून आहार्य अभिनयातील या बारकाव्याकडेही काळजीपूर्वक पाहावे लागते. वरील चारही अभिनयाच्या अनुषंगाने संक्षिप्त स्वरूपात काही नियम ज्यांचा उल्लेख नाट्यशास्त्राचे अभ्यासक रुस्तुम अचलखांब यांनी केला आहे.त्या नियमांचा थोडक्यात परामर्श घेणे इथे उचित ठरते. १)नटाच्या चेहऱ्यावरचे हावभाव स्पष्टपणाने दिसण्यासाठी त्याचा चेहरा प्रेक्षकाकडे असावा. २)प्रसंगाच्या मागणीनुसार एखाद्या वेळेस प्रेक्षकाकडे पाठ करण्याची वेळ आल्यास काही हरकत नाही ;परंतु नटाने उच्चारलेले वाक्य प्रेक्षकापर्यंत पोहोचेल याची काळजी अशावेळी नटाने घ्यावी. ३)रंगमंचावर दुसऱ्या बाजूला वळायचे असेल तर नटाने प्रेक्षकाकडे चेहरा करूनच वळावे. ४)दोन पात्रातील संवादाच्या वेळी जे पात्र बोलत आहे त्याकडे इतर पात्रांनी लक्ष द्यावे. ५)रंगमंचावर कुठलीही बावळट कृती करू नये. ६)नाटकातील संवाद फेक उत्कृष्ट होण्यासाठी व अभिनय परिणामकारक होण्यासाठी अगोदर कृती व नंतर संवादाचे उच्चारण असावे. ७)आपला संवाद उच्चारायची वेळ आल्यास तिथे विनाकारण विराम पडणार नाही याची काळजी घ्यावी. ८)गरज असेल तिथेच विराम घ्यावा अन्यथा विनाकारण विराम घेऊ नये. ९)संवाद उच्चारण्यापूर्वीच श्वास घ्यावा.आपल्या संवादातील वाक्य लांबलचक असेल तर अगोदरच दीर्घ श्वास आत घ्यावा. १०)नाट्यप्रयोगात असलेले आपले सहकारी यांना योग्य त्यावेळी योग्य ती साथ द्यावी. ११)नाट्यप्रयोगातील एखाद्या प्रसंगावर प्रेक्षकांचे लक्ष केंद्रित झाले असेल तर त्यात आपल्या अभिनयाने प्रेक्षक विचलित होणार नाही याची काळजी नटाने घ्यावी. १२)विनोदी प्रसंगाच्या वेळी प्रेक्षागृहामध्ये हशा पिकला असेल तर प्रेक्षकाचे हसणे बंद झाल्याशिवाय कलावंताने पुढचे वाक्य उच्चारू नये. अन्यथा ते वाक्य हास्यातच विरून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. १३)जे साहित्य वापरावयाचे आहे ते तालमीपासूनच वापरावे.तसे न झाल्यास ऐनवेळी सवय नसल्यामुळे प्रयोगाच्यावेळी अडचण निर्माण होण्याची शक्यता असते. १४)नटाने रंगभूमीचे काही नियम पाळावयाचे असतात.त्यात नटाची वेशभूषा असताना मध्यंतरात त्यांनी प्रेक्षकांमध्ये मिसळू नये.कारण रंगभूमीच्या दृष्टीने हा विषय निषिद्ध मानला जातो. १५)प्रयोगाला आणि रसाला अनुरूप असाच अभिनय करावा.उदाहरणार्थ,मृत्यू प्रसंग दाखवत असताना तो मृत्यूचाच प्रसंग वाटला पाहिजे. शिंक आली म्हणून शिंकणे हा भाग प्रसंगामध्ये विपर्यास आणतो. १६)नाटकात प्रत्येक वेळी वाक्याला अथवा विनोदाला सारखीच दाद मिळेल असे नाही.एखाद्या वेळेस दाद नाही मिळाल्यास निराश न होता आपल्या अभिनयाशी प्रामाणिक राहून अभिनय सादर करावा.तरस त्यातील तद्रुपता प्रत्ययाला येईल. १७)नाटकाच्या प्रकारानुसार अभिनयाच्या वेळी नटाचे वर्तन असणे अपेक्षित असते.लोकनाट्य, संगीत नाटक , फार्स , विनोदी नाटक यात प्रेक्षकाकडे पाहून बोलले तर चालते ; पण गंभीर प्रकृतीच्या नाटकांमध्ये ते योग्य ठरत नाही. उलट प्रेक्षकांकडे न पाहता बोलणे अशा नाटकात सयुक्तिक ठरते. १८)विंगेतून प्रवेश करण्यापूर्वी नटाने विनाकारण स्पॉट लाईटसमोर थांबू नये.तसे केल्यास त्या नटाची सावली रंगमंचावर पडते. १९ )रंगमंचावरील नटाच्या हालचाली या कृत्रिम न वाटता नैसर्गिक वाटाव्यात. २०)माइक सिस्टीमचा योग्य वापर करावा व आपले संवाद प्रेक्षकापर्यंत व्यवस्थित पोहोचतील याची काळजी घ्यावी. अर्थातच भाषिक,आंगिक , सात्त्विक व आहार्य अभिमानाच्या अनुषंगाने नटाने महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडावी लागते. त्यात दिग्दर्शकाचा रोलही तितकाच महत्त्वाचा असतो.म्हणून नाट्यप्रयोगात या अभिनयाकडे विशेष लक्ष दिले जाते.नाट्यपरीक्षक अभिनयाचे हे तंत्र लक्षात घेऊन नाट्यपरीक्षण करतात. *१५)स्वगत -* नाटकामध्ये संवाद महत्त्वाचे असले तरी 'स्वगत'सुद्धा नाटकाची परिणामकारकता वाढवण्यासाठी उपयुक्त ठरते. 'नटाने स्वतःचा स्वतःशी केलेला संवाद म्हणजे स्वगत होय.'यालाच इंग्लिशमध्ये 'मोनोलॉग 'असे म्हणतात.नाटकातील एखाद्या पात्राच्या मनातील विचार, भावना, संघर्ष हे इतर पात्रांशिवाय केवळ प्रेक्षकांपुढे सादर करण्याची ही पद्धत असते.अलीकडच्या काळात लेखक आणि नट आपली भूमिका अधिक परिणामकारकपणे उभी करण्यासाठी 'स्वगता 'चा पुरेपूर वापर करून घेत आहेत.उदा. ‘एकच प्याला’ या नाटकातील सुधाकरचे स्वगत;‘नटसम्राट’मधील अप्पासाहेब बेलवलकर यांचे स्वगत ;‘फुलराणी’मधील मंजुळाचे संवादात्मक स्वगत. अर्थातच स्वगत हा मनातील भावनिक गुंतागुंत आणि व्यथांना थेट प्रेक्षकांशी जोडणारा प्रभावी प्रकार आहे. नाट्यपरीक्षक नाटकात आलेली 'स्वगते ' ही नाटकाला आणि अभिनयाला किती परिणामकारक रूप देतात याकडे लक्ष देऊन नाटकाचे परीक्षण करतात. *नाट्यपरीक्षण मूल्यमापन तक्ता* क्र. तपशील गुण प्राप्त गुण १.नाटकाचा आशय - १० २.नटाचा अभिनय - ४० ३.नेपथ्य व वेशभूषा - १० ४.पार्श्वसंगीताचा वापर - १० ५.अन्य घटक व नाटक - १० ६.नाटकाची परिणामकारकता -१० ७.प्रेक्षक प्रतिसाद - १० . एकूण गुण - १०० प्राप्त गुण - *समारोप* नाट्यप्रयोगाचे परीक्षण करत असताना नाट्यपरीक्षकाला त्या कलाकृतीशी एकरूप व्हावे लागते.केवळ वाचून ,पाहून अथवा ऐकून नाटकाचे परीक्षण करणे शक्य नाही.म्हणून नाट्यसंहिता , संवाद ,पात्रसृष्टी , त्यांचा अभिनय ,नाटकाला परिणामता प्राप्त करून देणारे इतर घटक त्यात नेपथ्य,प्रकाशयोजना,पार्श्वसंगीत , वेशभूषा , केशभूषा , नाटकाची भाषा या सर्व गोष्टीचे मूल्यमापन नाट्यपरीक्षकाला करावे लागते.त्यावेळी त्या कलाकृतीविषयी अथवा नाट्य कलावंताविषयी कुठलाही पूर्वग्रह दूषित दृष्टिकोन नाट्यपरीक्षकांच्या मनामध्ये नसावा अन्यथा तो तटस्थपणाने मूल्यमापन करू शकणार नाही.शिवाय त्याला रंगभूमीचे पूर्ण प्रकार व त्या प्रकारानुसार केले जाणारे सादरीकरण याविषयी इत्यंभूत माहिती असणे गरजेचे असते. एकंदरीत विचार केला तर नाट्यपरीक्षकाला नाट्यसंहिता लक्षात घ्यावी लागते.त्या संहितेचे स्वरूप , तिचा आशय व त्या संहितारूपाचे उपयोजन ,त्यातील मूल्य आदीचे परीक्षण करतानाच नाट्यप्रयोगाचे किती प्रमाणात आकलन झाले अथवा रसास्वादात कोण - कोणते अडथळे आले,नाट्यकलाकृती रसिकमनाचा किती पकड घेत होती ,त्यासाठी पात्राचा आंगिक , भाषिक , सात्विक अभिनय व त्याच्या तोंडून येणारी भाषा ही नाटकाला कितपत पूरक आहे या सर्व बाबींचे निरीक्षण करून नाट्यपरीक्षक नाट्यप्रयोगाचे मूल्यमापन करत परीक्षण करतात.कलाकृतीचे चहूअंगाने केलेले मूल्यमापनच उत्तम परीक्षण म्हणून नोंदविले जाते. म्हणून नाट्यपरीक्षकाला नाट्यपरीक्षणाच्या दृष्टीने बहुआयामी असावे लागते.

Comments

Popular posts from this blog

नाट्यपरीक्षण तंत्र व स्वरूप

नाट्यपरीक्षण तंत्र व स्वरूप(भाग - १ )