नाट्यपरीक्षण तंत्र व स्वरूप

घटक - १ ला *नाट्यपरीक्षण तंत्र व स्वरूप* प्रास्ताविक - मराठी नाटकाचा विचार करू जाता मराठी नाटकाची परंपरा फार प्राचीन असल्याचा प्रत्यय येतो.अगदी भरतमुनींनी आपल्या साहित्यविचारात प्रामुख्याने नाटकाचाच विचार केला आहे.भरतमुनींच्या 'नाट्यशास्त्र' या ग्रंथाला नाटकाच्या परंपरेचा पाया मानला जातो. संस्कृत नाटके, राजदरबारातील प्रयोग आणि लोककला यांचा मराठी नाटकावर प्रभाव प्रतीती येते. आचार्य भरतमुनी यांनी मांडलेले रससूत्र हे नाटकाच्या संदर्भातलेच आहे.संस्कृत नाटकाच्या अनुषंगाने मांडलेला हा रसविचार मराठी नाटकालाही उपयुक्त ठरतो.किंबहुना मराठी नाटकाकरिता आजही या रससूत्र उपयुक्त ठरते . मराठी नाटकाचा विकास दशावतार, भारूड, कीर्तन, लावणी, गोंधळ, तमाशा, कळसूत्री बाहुल्यांचा खेळ, चित्रकथी अशा लोककला प्रकारांतून झालेला दिसतो. अर्थातच प्राचीन भारतीय नाट्यकलेशी आणि लोककलांशी ही परंपरा जोडलेली दिसते.मराठी नाट्यपरंपरेचा शोध घेताना विधीनाट्य ,संतांच्या भारुड रचना,महदंबेचे धवळे,बुकीश नाटके ,विष्णुदास भावे यांचे ओबडधोबड स्वरूपाचे नाटक असा प्रवास लक्षात घ्यावा लागतो. आधुनिक मराठी नाटकाची सुरुवात १८४३ साली विष्णुदास भावे यांच्या 'सीतास्वयंवर' या नाटकाने झाली असे मानले जाते.काही विद्वानांच्या मते, मराठी नाटकाची परंपरा संत ज्ञानेश्वरांच्या काळापासून चालू असावी ;पण पुरावे मुख्यत्वे १९व्या शतकातील आहेत. १८५५ मध्ये महात्मा फुले यांनी 'तृतीय रत्न' हे सामाजिक विषयावरील स्वतंत्र मराठी नाटक लिहिले.ज्यात आशय, विषय आणि भाषा यांचा स्वतंत्र वापर केला गेला. अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी १८८० साली 'संगीत शाकुंतल ' या नाटकाने संगीत नाटकांची परंपरा लोकप्रिय केली.पुढे शेक्सपियरचे नाट्यतंत्र, इब्सेनचे नाट्यतंत्र यांच्या प्रभावातून मराठी नाटक विकसित होत गेले.सामाजिक, ऐतिहासिक आणि प्रयोगशील या प्रकारातून मराठी रंगभूमी विकसित होत गेली.हळूहळू दलित नाटक ,ग्रामीण नाटक, आदिवासी नाटक ,स्त्रीवादी नाटक ,बाल नाटक ,कामगारांचे नाटक , पथनाट्ये या रूपात रंगभूमीवर नाटके सादर केली जाऊ लागली. नाट्य परीक्षणात हा प्रवास लक्षात घेणे महत्त्वपूर्ण ठरते.कारण नाटकाची सुरुवात विधीनाट्यातून झालेली असल्यामुळे यज्ञकुंडाच्या भोवती नृत्य गायन सादर करून नाटकाला सुरुवात केली जात असत.आज मात्र नाटकाचे सादरीकरण तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून केला जातो.नाट्य परीक्षण करणाऱ्या परीक्षकाला या सर्व प्रवासाची माहिती व्यवस्थित असावी लागते.तरच त्यांना न्यायिक संदर्भ लावणे शक्य होते.परंपरा व नवता याचे ज्ञान परीक्षकाला असणे महत्त्वपूर्ण ठरते. *नाट्यसंहिता व प्रयोगाचा विचार* नाटक ही दृकश्राव्य कला आहे.परीक्षणाचा विचार करताना या कलेतील संहितारुपाचा भाग आणि प्रयोगरुपाचा भाग याचा वेगळेपणाने विचार करावा लागतो.प्रयोगरुपाचा संहितारुप हा आधार असला तरी प्रत्यक्ष प्रयोगाच्यावेळी रसपरिपोषाकरिता व एकंदरीत प्रत्ययकारितेकरिता नाटकातील अन्य घटकाकडेही विशेष लक्ष द्यावे लागते.संहितारुप साकार करत असताना नाटककाराने ती काळजी घेण्याचा प्रयत्न केलेला असतो;परंतु प्रयोगाच्यावेळी दिग्दर्शकाला प्रसंगानुरूप अंतर्गत घटकांची सुसंगती लावावी लागते.शिवाय नाटकातील पात्रांना त्याप्रमाणे अभिनय करावा लागतो.पात्रांच्या अभिनयातला जिवंतपणा हा भाग नाटक उठावदार करण्यास कारणीभूत ठरत असला तरी नेपथ्य ,वेशभूषा ,पार्श्वसंगीत, प्रकाशयोजना आदीसारखे घटक रसपरिपोषास व नाटकाच्या परिणामकारकतेस इथे महत्त्वपूर्ण ठरतात.म्हणून प्रयोगरूपाचे परीक्षण हे संहितारुपाच्या परीक्षणापेक्षा काही प्रमाणात निश्चितच पृथगात्मक ठरते.संहितारुपाचे अथवा नाट्यप्रयोगाचे परीक्षण व त्यातील सूक्ष्म भिन्न स्वरूप यावर प्रकाश टाकण्यापूर्वी सर्वप्रथम नाट्यपरीक्षण म्हणजे काय हे पाहणे येथे क्रमप्राप्त ठरते. नाट्यपरीक्षण व्याख्या - १." नाटकाचे विविध घटक त्यात प्रामुख्याने कथा, पात्रे, संवाद, दिग्दर्शन, अभिनय, कलादि, संगीत ;आणि रंगभूमिकेचा विचार करून एखाद्या नाटकाचे किंवा नाट्यप्रयोगाचे वस्तुनिष्ठ आणि गंभीरपणे विश्लेषण केले जाते. त्यास साधारणपणे 'नाट्यपरीक्षण' असे म्हणता येते. " २." नाटकातील चांगल्या आणि वाईट बाजू आणि त्याचं कलात्मक आणि सामाजिक महत्त्व यावर विचार करून भाष्य केलं जातं त्यास 'नाट्यपरीक्षण ' असेही म्हणता येईल. " ३. "नाटकांच्या विविध घटकांचा ( कथा, संवाद , अभिनय , दिग्दर्शन ,नेपथ्य , संगीत , प्रकाशयोजना इत्यादी ) सखोल अभ्यास करून त्या नाटकाची कलात्मक व सामाजिक मूल्य ठरविण्याची प्रक्रिया म्हणजे 'नाट्यपरीक्षण ' होय ." ४. "नाट्यपरीक्षण म्हणजे नाटकाच्या सर्व अंगांचे, रचनात्मक व सादरीकरणातील तांत्रिक बाबींचे बारकाईने परीक्षण करणे. यात नाटकाची संहिता, अभिनय, दिग्दर्शन, नेपथ्य, प्रकाशयोजना, संगीत, रंगभूषा, वेशभूषा, संवाद, कथानक, व्यक्तिरेखा आणि प्रेक्षकांचा अनुभव यांचा समावेश होतो. " नाट्यपरीक्षण ही केवळ संहितेची समीक्षा नसते,तर संपूर्ण नाट्यकृतीच्या सर्व अंगाचा विचार त्यात केला जातो.नाटकातील कथानक , पात्रांची मांडणी , संवाद ,अभिनय ,नेपथ्य , संगीत , प्रकाशयोजना , रंगभूमीवरील सादरीकरण इत्यादी घटकांचा समावेश त्यामध्ये असतो. त्याचबरोबर नाट्यपरीक्षकाने नाटकाच्या सामाजिक, सांस्कृतिक ,ऐतिहासिक संदर्भाचा विचार करणे आवश्यक असते ; आणि हे नाट्यपरीक्षण तटस्थ , सुसंगत आणि वस्तुनिष्ठ असावे लागते. संहितारूपाचे नाट्यपरीक्षण हे थोडक्यात समीक्षणाच्या पातळीवर जाणारे असते. वृत्तपत्रीय परीक्षण अथवा पुस्तकी परीक्षणासाठी हे भाष्य उपयुक्त ठरते.आपल्याला या परीक्षणांचा विचार करता करता प्रामुख्याने स्पर्धात्मक नाट्यप्रयोगाचे परीक्षण या अंगाने विचार करावयाचा आहे. प्रयोगात्मक नाटकाचे परीक्षण करत असताना परीक्षकांच्या ठिकाणी निश्चितच काही गुण असावे लागतात.त्यांना नाटकाचं परीक्षण तंत्र व्यवस्थित माहीत असावं लागतं तरच नाट्यपरीक्षण व्यवस्थित होऊ शकते.सांस्कृतिक कार्य संचालनालय,मुंबईच्या वतीने राज्य नाट्य स्पर्धा घेण्यात येतात; आणि त्यात नाट्य स्पर्धांचे परीक्षण करण्यासाठी एका एकांकिकेकरिता परीक्षकाला ९०० रुपये मानधन दिले जाते.हे परीक्षण करण्यासाठी नाटकाचे संविधानक , संवाद ,पात्राची वेशभूषा,नेपथ्य, प्रकाशयोजना नाटकातील पार्श्वसंगीत रसपरिपोष करणारे आहे किंवा नाही , पात्राचा अभिनय प्रसंगानुरूप आहे किंवा नाही त्याचबरोबर अभिनय करणारा नट विंगेत प्रवेश करत असताना कोणत्या पद्धतीने करतो यासारखे बारकावे परीक्षकाला लक्षात ठेवावे लागतात.या तंत्रानुसार परीक्षण केले तर ते परीक्षण तंत्रशुद्ध अशा स्वरूपाचे होते. *नाटकाची परिणामकारकता* . नाटक हे दृक-श्राव्य माध्यम असल्याने त्याचा प्रभाव इतर साहित्यप्रकारांपेक्षा अधिक असतो.नाट्यप्रयोगाच्या वेळी प्रेक्षकावर त्या कलाकृतीतील आशयाचा ,अभिनयाचा कितपत परिणाम होतो यावरूनही त्या कलाकृतीचे यश ठरते.नाट्य कलाकृतीचा आशय हा रसिक प्रेक्षकाच्या मनाचा ठाव घेणारा असेल तर ती कलाकृती श्रेष्ठ ठरते.नाटकाचा आशय कोणत्या अंगाने फुलत जातो.हेही तितकेच महत्त्वाचे असते. सामाजिक जीवनावरील नाटकातून सामाजिक प्रश्न, अनिष्ट प्रथा, सामाजिक बदल यावर प्रकाश टाकला जातो ;आणि समाजमनावर परिणाम घडवण्याचा प्रयत्न केला जातो. डॉ.सदा कऱ्हाडे यांनी 'जीवनाचा आरसा म्हणजे नाटक होय '. (Drama is a mirror of life ) - असे म्हटले आहे.मानवी जीवनाचे प्रतिबिंब नाटकातून उमटत असतं.सामाजिक, कौटुंबिक, राजकीय, ऐतिहासिक असे विविध विषय नाटकातून प्रभावीपणे मांडले जातात, त्यामुळे प्रेक्षकांमध्ये जागरूकता निर्माण होते.नाटक हे समाजाचे यथार्थ दर्शन घडवणारे, मनोरंजनासोबतच प्रबोधन करणारे प्रभावी माध्यम आहे.नाटकातील संघर्ष, भावभावना,व्यक्तिरेखा यामुळे प्रेक्षक भावनिकदृष्ट्या गुंततात, त्यांना आपलेपणाची जाणीव होते.नाटकातील कथानक, संवाद, अभिनय, नेपथ्य, प्रकाशयोजना, संगीत, रंगभूषा इ. घटक प्रेक्षकांवर थेट परिणाम करतात आणि त्यांना विचार करायला भाग पाडतात. नाट्यप्रयोगाच्यावेळी नाटकाचे संविधानक ,त्या संविधानातून अभिव्यक्त होणारा विषय ,विषयानुरूप केला जाणारा प्रभावी अभिनय आणि या सर्वांना पूरक घटकांचं साह्य यावर नाट्यकलाकृतीची परिणामकारकता अवलंबून असते.म्हणून नाट्यप्रयोगाच्या वेळी नाट्यदिग्दर्शकाने या सर्व घटकाकडे गांभीर्याने लक्ष देऊन प्रयोग किती परिणामकारक करण्याचा प्रयत्न केला आहे. याचाही विचार नाट्यपरीक्षण करणाऱ्या नाट्यपरीक्षकाला करावा लागतो. नाट्यपरीक्षणात नाट्यप्रयोग किती परिणामकारक झालेला आहे हे पाहण्यासाठी पुढील काही मुद्द्यांचा विचार करावा लागतो. त्यात - १.नाटक ही दृकश्राव्य कला असल्यामुळे तिथे विशेषत: प्रयोगाच्यावेळी प्रेक्षकाला अनन्यसाधारण महत्त्व असते.नाट्य कलाकृतीचे आकलन प्रेक्षकाला किती प्रमाणात झाले आहे.हे तपासणे उचित ठरते. तज्ज्ञ नाट्यपरीक्षकाला याचा अंदाज लावणे फारसे अवघड जात नाही.त्यामुळे नाटकाचे आकलन होईल असे सादरीकरण करणे महत्त्वाचे असते.सहजतेने साकार होणारे नाटक प्रभावी आणि परिणामकारक ठरते. २.नाट्यप्रयोगाचा आस्वाद घेताना अनेक अडथळे येण्याची शक्यता असते.काही काही नाट्यप्रयोग इतके वेगवान असतात की रसिक - प्रेक्षक त्या नाटकाशी भावनिकदृष्ट्या समरस होण्याअगोदरच नाट्यप्रयोग संपतो .परिणामस्वरूप रसिक प्रेक्षकाला त्या नाटकातील भावनिक व बौद्धिक पातळीवर समरस होता येत नाही.अर्थातच नाट्यप्रयोगाची लांबी आणि बांधणी हासुद्धा घटक नाटकाच्या परिणामकारकतेवर प्रभाव टाकत असतो. ३.रंगभूमीवर अनेक गोष्टी गृहीत धराव्या लागतात उदा. अदृश्य पात्रे.अर्थात वास्तव आणि आभास याचा नेमका ताळमेळ प्रयोगाच्यावेळी बसला आहे की नाही.हेही तितकेच महत्त्वाचे ठरते. ४.तांत्रिक आणि सादरीकरणातील मर्यादा या बाबीसुद्धा नाट्यप्रयोगाच्या परिणामकारकतेवर प्रभाव गाजवत असतात.प्रकाश, ध्वनी, रंगमंच यातील त्रुटी किंवा कलाकारांची तयारी अपुरी असणे, संवाद स्पष्ट न पोहोचणे अशा तांत्रिक अडचणींमुळे आस्वादात अडथळे येतात.परिणामस्वरूप नाट्य प्रयोग फसला जाण्याची शक्यता असते.तो भाग टाळायचा असेल तर या घटकाकडे दुर्लक्ष करून चालत नाही.म्हणून प्रयोगाच्या वेळी प्रकाश योजनेचा ,नेपथ्याचा डोळ्यावर ताण पडणार नाही याची काळजी घ्यावी लागते.त्याचबरोबर नाट्यगत संवाद व भाषा ,नटाचा आवाज हा रसिक प्रेक्षकापर्यंत सहजतेने पोहोचेल यासाठी वापरली जाणारी माईक सिस्टीम हीसुद्धा दोषास्पद राहणार नाही याची काळजी घ्यावी लागते. ५.कोणत्याही नाट्य कलाकृतीचा मूळ गाभा हा त्या कलाकृतीच्या संहितारूपाचा भाग असतो.म्हणून प्रयोगसुद्धा संहितेतील शब्दांच्या अंगानेच आकार घेत पुढे गेला पाहिजे.नाट्यप्रयोग व संहिता यांचा स्रोत समान पातळीवरून पुढे सरकत असेल तर ते नाटक निश्चितच परिणामकारक ठरते. ६.नाट्यप्रयोगातून रसिक प्रेक्षकाला निर्भेळ आनंद मिळत असेल ;आणि नाटक रसिकांच्या मनाची पकड घेत असेल तर ते नाटक प्रभावी ठरते. ७.अभिनय करणारा नट हा प्रयोगाच्या वेळी अतिशय महत्त्वाचा भाग.नाटकाच्या परिणामकारकतेसाठी त्याचा आंगिक,वाचिक अभिनय हा प्रभावी ठरतो. ८.भाषिक अंगाने विचार करत असताना नाट्यसंहितेतील नाट्यभाषेचा मूळ स्वभाव व अभिनय करणाऱ्या नटाच्या तोंडातून व्यक्त होणारी भाषा याचा समतोल साधावा लागतो. उदा.शेतकऱ्याच्या तोंडून शोभणारी भाषा ,वकिलाची भाषा,प्राध्यापकाची भाषा,शहरी भागातील लोकांची भाषा यात वेगळेपण असते.याचा विचार करून संहिता लेखनाच्या वेळी नाटककार योग्य अशा भाषेचे उपयोजन करत असतो.अर्थातच पात्राला शोभेल अशी भाषा नाट्यगत पात्राच्या ठिकाणी असेल तर नाटक परिणामकारक ठरते. केवळ नाटक पाहून अथवा ऐकून त्याचे परीक्षण केले जात नाही. तर परीक्षक नाट्य परीक्षणाच्यावेळी प्रत्यक्ष रंगभूमी ,नाटकाचे संहितारूप ,त्या संहितेतील संवाद व आशय ,नाटकाची भाषा ,नटाचा अभिनय , त्याची वेशभूषा व रंगभूषा याबरोबरच तांत्रिक बाबी अगदी प्रकाशयोजनेपासून ते पार्श्वसंगीतापर्यंतचा एकात्म भाग लक्षात घेऊन परीक्षण करत असतो. हे सर्व घटक नाट्यप्रयोगाच्या परिणामकारकतेत महत्त्वाचे ठरतात. *नाट्यपरीक्षण व नाटकाचे पुरक घटक - संहिता आणि प्रयोग* नाट्यपरीक्षण करत असताना नाटकाच्या संहितेचा वेगळ्याने विचार करावा लागतो.नाट्यसंहितेत शब्दरूप असते तर प्रयोगात प्रत्यक्ष सादरीकरणाला महत्त्व दिले जाते.नाट्यसंहितेच्या दृष्टीने विचार करू जाता नाट्यसंहितेचे केंद्रबिंदू म्हणजे सशक्त, गुंतागुंतीचे आणि आकर्षक कथानक आहे का ? त्यात कार्यकारणभाव, गुंतागुंत, निरगाठ, उकल या अवस्था स्पष्टपणे दिसतात का याचा प्रामुख्याने विचार केला जातो. नाट्यसंहितेत पात्रांची रचना वैशिष्ट्यपूर्ण, परस्परविरोधी स्वभावांची आणि संघर्ष निर्माण करणारी असावी लागते.पात्रांचे मनोव्यापार, वृत्ती-प्रवृत्ती आणि भावनिक उतार-चढाव यांचा समावेश असावा लागतो.परीक्षणाच्या वेळी या गोष्टीकडेही विशेष लक्ष दिले जाते. कथा, कादंबरी व अन्य साहित्य प्रकारात निवेदनाला भरपूर वाव असतो ; परंतु नाटकात संवाद महत्त्वाचे असतात. संवाद हे नाट्यसंहितेचे अत्यंत महत्त्वाचे अंग आहे. ते चुरचुरीत, भावपूर्ण, प्रसंगानुरूप आणि नाटकाच्या शैलीशी सुसंगत असावेत.ते तसे आहेत किंवा नाही हेही नाट्य परीक्षणाच्या वेळी तपासले जाते. नाटकाची रचना सुसंगत, एकात्म आणि नाट्यतंत्रानुसार असावी. शैलीत नाविन्य, प्रवाहीपणा आणि नाट्यरस असावा.ते निर्माण करण्याचे सामर्थ्य हे परीक्षक ठरवत असतो. नाट्यसंहितेत अंक ,प्रवेश ,दृश्य यांच्या माध्यमातून घटनांचे स्थळ, काळ आणि कृती यांचा स्पष्ट उल्लेख केलेला असावा लागतो. तसेच रंगसूचना व नेपथ्याच्या सूचना दिलेल्या असाव्या लागतात.याचाही विचार नाट्यसंहितेच्या परीक्षणावेळी केला जातो. नाटकाच्या कथानकात संघर्षाचा समावेश असावा, कारण तो नाटकाला रंगतदार बनवतो आणि प्रेक्षकांची उत्कंठा वाढवतो. त्याचबरोबर नाटकातील विषय, घटना आणि पात्रांची मांडणी समाजातील विविध स्तरांतील प्रेक्षकांना भावणारी असावी लागते.तरच ते नाटक उठावदार वाटते.म्हणून या सर्व बाबींचा विचार नाट्यपरीक्षक करत असतो. नाट्यप्रयोगाच्या वेळी केले जाणारे परीक्षण हे नाट्यसंहितेच्या परीक्षणासारखेच असले तरी त्यात थोडीफार पृथगात्मकता आढळते.प्रयोगाच्या वेळी नाट्यसंहितेत असलेल्या शब्दरूपाला त्यातील कार्यकारणभावाला ,संघर्षाला मूर्त रूप देण्यात नट किती यशस्वी ठरलेला आहे.त्याच्या अभिनयातील जिवंतपणा व प्रेक्षकांना होणारी रसनिष्पत्ती याचा विचार प्रयोगाच्यावेळी केला जातो.संहितेतील रंगसूचनेचा भाग प्रत्यक्ष कृतीतून उत्तमरीत्या साकार झाला आहे का ?याचाही विचार परीक्षकाला करावा लागतो. या सर्व घटकांचा परिचय सविस्तरपणाने आपल्याला पुढील प्रकरणात करून घ्यावयाचा आहे.नाट्यसंहितेचे परीक्षण व प्रयोगाचे परीक्षण हे अतिशय सूक्ष्म पातळीवर जाऊन तपासावे लागते मगच त्याचे मूल्यमापन व्यवस्थित पद्धतीने करता येते.

Comments

Popular posts from this blog

नाट्यपरीक्षण तंत्र व स्वरूप (भाग - २ ) - नाट्यघटक व अभिनय

नाट्यपरीक्षण तंत्र व स्वरूप(भाग - १ )