प्रिय अमुचा महाराष्ट्र देश हा

महाराष्ट्र ही साधुसंतांची समाजसुधारकांची भूमी ...या भूमीला शूर - वीरांची भूमी म्हणूनही ओळखले जाते.राकटपणा ,कणखरपणा , कोमलपणा , नाजूकपणा हा इथल्या माणसाचा स्थायीभाव.मराठी प्रदेशाचा विशेष हा येथील माणसाचाही स्वभावविशेष. . . "राकट देशा, कणखर देशा दगडांच्या देशा, नाजुक देशा कोमल देशा, फुलांच्याही देशा आंजन कांजन करवंदीच्या काटेरी देशा बकुल फुलांच्या प्राजक्तींच्या दळदारी देशा " कवी गोविंदाग्रजांनी महाराष्ट्राचे केलेले हे वर्णन मराठी मनाला मोहविणारे आहे. 'मंगल देशा पवित्र देशा।' अशीही या प्रांताची महती गायलेली आहे.ती केवळ या प्रांताला मांगल्यरूप प्राप्त करून देणाऱ्या माणसामुळेच ... महाराष्ट्राला स्वतंत्रतेचं, पावित्र्याचं, विकासाचं रूप प्राप्त करून देण्यात अनेकांचा त्याग, बलिदान या गोष्टी महत्त्वपूर्ण आहेत त्या नजरेआड करुन चालत नाहीत. आज आनंदोत्साहात १ मे हा 'महाराष्ट्र दिन' म्हणून साजरा करतो. तो साजरा करताना योगदान दिलेल्या महान विभुतींचे स्मरण करणे आमचे आद्यकर्तव्य ठरते. “इतिहासाची पाने चाळताना १०६ आंदोलकांनी 'संयुक्त महाराष्ट्राचा लढा लढत असताना आपल्या प्राणाचे बलिदान दिल्याचे निदर्शनास येते.त्याचबरोबर एस. एम. जोशी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर,आचार्य अत्रे,सेनापती बापट,श्रीपाद डांगे, शाहीर अमर शेख,भाई उद्धवराव पाटील,प्रबोधनकार ठाकरे यांचे कार्ये व योगदानही संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकार होण्यास महत्त्वपूर्ण ठरले आहे.मराठी भाषकांचे एक राज्य स्थापन करण्यासाठी 'संयुक्त महाराष्ट्र चळवळ' अस्तित्त्वात आली या चळवळीने लढा उभा केला. 'मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे'.हे या आंदोलनाचे, चळवळीचे प्रमुख ब्रिदवाक्य होते. या चळवळीच्या योगदानामुळे त्रिराज्य, द्वैभाषिकांचे राज्य या संकल्पनांना छेद बसला. जवाहरलाल नेहरू, मोरारजी देसाई यासारख्या काँग्रेस नेत्यांना या चळवळीपुढे नमते घ्यावे लागले.त्याचेच परिणत स्वरूप म्हणजे १ मे १९६० ला महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली व स्वतंत्र महाराष्ट्राचा कलश यशवंतराव चव्हाण यांच्या हाती सोपवला. यशवंतराव चव्हाण ते विद्यमान मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस या सर्व मुख्यमंत्री महोदयांनी महाराष्ट्राला प्रगतीपथावर घेऊन जाण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. तरी पण काही सुधारणा महाराष्ट्राला अभिप्रेत आहेत. त्यासाठी विकासात्मक भूमिका घ्यावीच लागेल. संघर्ष हा मराठी मातीतील मराठी मनाचा स्थायीभाव आहे. शूर वीरांची ही भूमी कठीण प्रसंगात संघर्षाला प्राधान्य देत आली आहे. संत ज्ञानेश्वर संत तुकारामादी संतांचा विकृत प्रवृत्तीविरूध्दचा संघर्ष, छ. शिवरायांचा हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठीचा संघर्ष ,म. फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ,महर्षी धोंडो केशव कर्वे आदी महान विभूतींचा सामाजिक आरोग्य निकोप ठेवण्यासाठीचा संघर्ष हा सर्वांनाच परिचित आहे. त्यांच्या संघर्षशील व कृतिशील भूमिकेमुळे महाराष्ट्राची एक पृथगात्म ओळख भारतवर्षातच नव्हे तर जागतिक पातळीवर निर्माण झाली होती.ऐतिहासिक,सांस्कृतिक व वैचारिक वारसा मराठी माणसाला या पूर्वजांच्या त्याग, बलिदान, संघर्ष व विचारातूनच मिळाला. असा संघर्ष मराठी माणसाने 'संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळी'तही केला; आणि मराठी भाषिकांचे एक स्वतंत्र राज्य निर्माण झाले. त्या संघर्षाचा वारसा घेऊन आम्ही सर्व मराठी माणसाने महाराष्ट्राचे नंदनवन करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. "बदलवून टाकू अपुला महाराष्ट्र सारा वर्षवू इथे घामाच्या अहोरात्र धारा ह्याच कातळांना आणू कळा सोनियाची ह्याच माळरानी काढू पिके मोतियांची भुकेल्यास भाकर देऊ, अनाथा निवारा चालवून गिरणीमधला एक एक साचा आम्ही पुन्हा हाती घेऊ हात भविष्याचा ... " अगदी सुप्रसिद्ध गझलकार व कवी सुरेश भट म्हणतात त्याप्रमाणे आम्हाला महाराष्ट्र घडविण्यासाठी पूर्वजांच्या संघर्षाचा वारसा पुढे चालवावा लागेल. महाराष्ट्र राज्याची निर्मिती होऊन आज सहा दशकापेक्षा जास्त कालावधी झाला. या सहा दशकापेक्षा जास्त काळात आम्ही काय कमावले व काय गमावले हा चिंतनाचा स्वतंत्र विषय होऊ शकतो. निश्चितच या त्रेसष्ट वर्षात आम्ही काही क्षेत्रात देदिप्यमान प्रगती केली आहे; पण आणखीनही बरेच काही करता येण्यासारखे शिल्लक आहे. शिक्षण, कृषी, उद्योग, आरोग्य अशा विविध क्षेत्रात आम्ही मोठी प्रगती करण्याचा प्रयत्न केला. त्यात काही प्रमाणात यशही मिळाले; पण आज या क्षेत्रात आणखी बऱ्याच सुधारणा करण्यास वाव आहे.साठ वर्षे हे माणसाच्या निवृत्तीचे वय असले तरी आमच्या महाराष्ट्रासाठी ते खऱ्या अर्थाने प्रेरणेचे वय म्हणून लक्षात घेणे ही संपूर्ण मराठी माणसाची जबाबदारी ठरते. शिक्षण कृषी, आरोग्य, उद्योग यासारख्या क्षेत्रात वर्तमानाशी संवादी राहण्याकरिता खूप मोठे बदल करणे आज अगत्याचे बनले आहे. शिक्षण क्षेत्रात व्यावसायिक शिक्षणाबरोबरच मूल्यशिक्षणाला प्राधान्य द्यावे,जेणेकरून प्रत्येक व्यक्तीला रोजगार मिळेल व त्याच्या ठिकाणी नैतिक अधिष्ठान असेल! नीतिमूल्य हरवलेला व असंवेदनशील माणूस महाराष्ट्रासाठीच नव्हे तर अखिल मानवजातीसाठी एक प्रकारचा कॅन्सर ठरेल !म्हणून संवेदनशील अशा माणसांची आज खरी गरज आहे. शिक्षणाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याबरोबरच संवेदनशील व संस्कारसंपन्न माणसांची पिढी घडवता येईल. त्याग, समर्पण, ऋजुता, सहकार्य व उद्यमशीलता आदी गुणांनीयुक्त माणसे मराठी मातीतून उगवतील ही आशावादी भूमिका बाळगायला काही हरकत नाही. खरे तर, 'हिमालयाच्या मदतीला सह्याद्री नेहमी धावून गेलेला आहे.'अगदी हे सर्व संस्कार शिक्षणातून केले जावेत. बेकारी ही आमच्यासमोरची सद्यःस्थितीतील सर्वात मोठी समस्या आहे. उत्कृष्ट शिक्षणाच्या माध्यमातून ती थांबवून व्यक्तीचा वैयक्तिक विकास त्याचबरोबर महाराष्ट्राचा आणि पर्यायाने देशाचा आर्थिक विकास साधता येईल.नव्या शैक्षणिक धोरणातील आव्हाने स्वीकारून व्यावसायाभिमुख शिक्षण देण्याकडे आपला विशेष भर असला पाहिजे. कृषीक्षेत्र तर समस्यांचे माहेरघर बनलेले आहे. त्या क्षेत्राचा विकास करण्यासाठी 'याची आडवा, त्याची जिरवा' पेक्षा 'पाणी आडवा, पाणी जिरवा' हा मूलमंत्र महाराष्ट्रासाठी काळाची गरज आहे. कृषी क्षेत्राचा विकास झाला तर देशाचे आर्थिक उत्पन्न व विकासदर वाढेल हे सांगण्यासाठी कुण्या अर्थतज्ज्ञाची गरज लागणार नाही. औद्योगिकदृष्ट्या विकास करत असताना प्रादेशिक समतोल साधला पाहिजे.केवळ पुणे, मुंबई व मेट्रोपॉलिन सिटीपुरते उद्योग सीमित न ठेवता त्याच्या कक्षा ग्रामीण भागापर्यंत विस्तारल्या गेल्या पाहिजेत. त्याचबरोबर औद्योगिक विकास साधत असताना कर्ब उत्सर्जन कमी करून पर्यावरण संतुलनाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. आरोग्य क्षेत्रात आम्ही गेल्या सहा दशकात प्रगतीची अनेक टप्पे गाठली. तरीही 'कोरोना' सारख्या महामारीने आमच्या आरोग्य क्षेत्रातील .... मर्यादा अधोरेखित केलेल्या आहेत.यापुढे येणाऱ्या अशा अनेक महामारीला सक्षमपणे सामोरे जाणारी आरोग्य यंत्रणा आम्हाला उभी करता येईल काय ? याकडे लक्ष देणे आज तितकेच महत्त्वाचे ठरत आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त आरोग्य यंत्रणेत परिपूर्ण असलेला महाराष्ट्र असं स्वप्न पाहायला काहीच हरकत नाही. फक्त ते दिवास्वप्न न ठरता सत्यात उतरावे हीच अपेक्षा !..... ह्या सर्व बाबीकडे पासष्टाव्या महाराष्ट्र दिनानिमित्त प्रेरणा घेऊन सकारात्मक दृष्टीने पाहिले आणि तसे बदल करण्याचा प्रयत्न केला तर "बहु असोत सुंदर संपन्न की महा, प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा "श्रीपाद कृष्ण कोल्हटकर म्हणतात त्याप्रमाणे मराठी मनाला अगोदरच प्रिय असलेला महाराष्ट्र अधिक प्रिय वाटेल!" माझ्या या प्रिय असलेल्या मराठी मातीचा गंध सातत्याने दरवळत राहो ... परिणामस्वरूप 'प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा ' अशाच गीताचे सूर अभिमानाने मराठी मनातून निघत राहो.अशी एका मराठी मनाची महाराष्ट्र दिना निमित्त अपेक्षा ... ! प्रा.डॉ. राजकुमार यल्लावाड परळी वैजनाथ

Comments

Popular posts from this blog

नाट्यपरीक्षण तंत्र व स्वरूप

नाट्यपरीक्षण तंत्र व स्वरूप (भाग - २ ) - नाट्यघटक व अभिनय

नाट्यपरीक्षण तंत्र व स्वरूप(भाग - १ )