वारीच्या वाटचालीतील समान दुवे

पंढरीचा पांडुरंग हे अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत. . . आषाढी - कार्तिकीनिमित्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक भक्तगण सखा पांडुरंगाला भेटण्यासाठी पंढरीला निघालेले असतात.श्वास विठ्ठल,ध्यास विठ्ठल हाच त्यांच्या जीवनाचा स्थायीभाव बनलेला असतो. "पंढरीशी जावे ऐसे माझे मनी। विठाई जननी भेटे केव्हा ॥ नलगे त्यावीण सुखाचा सोहळा लागे मज ज्वाळा अग्निचिया ॥ पांडुरंगाच्या भक्तीतून पांडुरंगाच्या भेटीची असीम ओढ या मनाला लागलेली असते.पांडुरंगाची भेट हाच सुख सोहळा ही मनोभूमिका बनते आणि त्याच मनोभूमिकेतून हे भाविक भक्त वारीला निघतात. आषाढी - कार्तिकी निमित्त महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून दिंड्या पताका घेऊन पंढरीच्या दिशेने आगेकुच सुरू होते.त्यात आळंदीहून संत ज्ञानेश्वरांची पालखी, देहूहून संत तुकारामांची पालखी ,पैठणहून संत एकनाथांची पालखी ,नरसी बामणीहून संत नामदेवांची पालखी ,गंगाखेडहून जनाबाईची पालखी ,शेगाव येथून संत गजानन महाराजांची पालखी अशा एक ना अनेक पालख्या काही विशिष्ट गावी मुक्काम करत पंढरीच्या दिशेने निघतात. दक्षिण काशी म्हणून पंढरपूरची ओळख . . .या दक्षिण काशीला अर्थातच पंढरपूरला निघालेल्या प्रत्येक वारी पालखी सोहळ्यामध्ये काही समान दुवे आढळतात.त्यातील सर्वात महत्त्वाचा दुवा म्हणजे विठ्ठल भक्ती हा होय. " विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी। विठ्ठल तोंडी उच्चारा ॥१॥ विठ्ठल अवघ्या भांडवला। विठ्ठल बोला विठ्ठल।।२॥ विठ्ठल नाद विठ्ठल भेद । विठ्ठल छंद विठ्ठल।।३॥ असे विठ्ठल नामात ते दंग झालेले असतात.विठ्ठल नामच आपल्या जीवनाची खरी संजीवनी आहे अशी त्यांची मनोभूमिका बनलेली असते.अगदी नितीन देशमुख यांच्या कवितेमध्ये सांगायचं म्हटलं तर - "विठ्ठलाचे नाम देहाच्या कणात... आषाढ मनात बरसला.....!! श्वासाचा मृदुंग पांडुरंग म्हणा.... भक्तीरूपी विणा झंकारली....!! " याप्रमाणे विठ्ठल भक्तीत तल्लीन झालेले भक्त फक्त वारीत आढळतात. 'राम कृष्ण हरी' हा मंत्र व 'विठ्ठल नामाचा गजर ' हा वारीचा अविभाज्य भाग बनून जातो. सर्व वारकरी विठ्ठल भक्तीत एकरूप होऊन जातात अर्थातच - "विठ्ठल हा चित्ती। गोड लागे गाता गीती॥१॥ आम्हा विठ्ठल जीवन। टाळ चिपुळिया धन॥२॥ विठ्ठल विठ्ठल वाणी। अमृत हे संजीवनी॥३॥ रंगला या रंगे । तुका विठ्ठल सर्वांगे ॥ ४॥ ही संत तुकारामांची मनस्थिती तीच सर्व वारकऱ्यांची मनस्थिती बनून जाते. वारीला जात असताना त्यांची दिनचर्या ठरलेली असते.वारीचे जे नियम असतात त्याचे तंतोतंत पालन हे सर्व वारकरी करतात.मुक्कामाच्या ठिकाणी मंदिरात सोय झाली तर ठीक अन्यथा पाल ठोकूनही तिथे मुक्काम केला जातो.सकाळी उठल्यानंतर वैयक्तिक उपासना करून वारीच्या नियमाप्रमाणे काकडा भजनाला सुरुवात होते.त्यानंतर हरिपाठ म्हटले जातात.पालखीचा विसावा झाल्याशिवाय वारकरी खाली बसत नाहीत.दुपारपर्यंत वेगवेगळ्या संतांच्या अभंगातील पत्रिका, कावडे , आंधळे ,पांगळे, जोगी ,बाळक्रीडा ,जोशी आदी अभंग प्रकाराचे गायन सामूहिकरित्या केले जाते.त्यानंतर दुपारचा विसावा दोन ते अडीच तासाचा प्रत्येक वारीमध्ये ठरलेला असतो.विसाव्याच्या कालावधीमध्ये भोजन करून अगदी दगडाच्या उशीवर निवांत वामकुक्षी ते घेतात. त्यानंतर मग सुरू होतो पुन्हा वारीचा प्रवास..दुपारच्या विसाव्यानंतर नाथाचे अभंग म्हटले जातात.त्याचबरोबर समाधीचे तीर्थावळीचे अभंग व हरिपाठही हे वारकरी म्हणतात.पालखी मुक्काम स्थळाला थांबल्यानंतर आरती होते. रात्री सात ते नऊच्या दरम्यान कीर्तन सोहळा पार पडतो.या कीर्तन सोहळ्यामध्ये फडकऱ्यांचे ठरलेले कीर्तन असतात. वारीचा हा प्रवास सुखकर व्हावा यासाठी दिंडीचे व्यवस्थापन करणारे काही व्यवस्थापक सोबत असतात.प्रत्येक वारीचे व्यवस्थापन हेच त्या वारीच्या यशाचे मुख्य गमक असते.दिंडी उतरायचे ठिकाण ठरलेले असते.त्या त्या दिंडीचे काही व्यवस्थापक पुढे जाऊन व्यवस्था करतात.त्यांच्यामुळे मुक्कामाच्या ठिकाणी समन्वय साधण्यास खूप मोठी मदत होते. या सर्व पालख्यांची भेट नवमीला पंढरपूरपासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या 'वाखरी ' या गावी होते.या गावी असलेला मुक्काम हा प्रत्येक पालखीचा वारी प्रवासातील अंतिम मुक्काम असतो.वारी दरम्यान प्रत्येक पालखीचे ठरलेले रिंगण सोहळे असतात त्या त्या विशिष्ट गावी ते रिंगण सोहळे संपन्न होतात; पण वाखरीचा रिंगण सोहळा हा तितकाच महत्त्वाचा असतो.दशमीच्या दिवशी सर्व पालख्या पंढरपूरमध्ये प्रवेश करतात.पंढरपूर मध्ये पोहोचल्यानंतर काही विधींना इथे अनन्यसाधारण महत्त्व आहे.त्यात प्रामुख्याने चंद्रभागेमध्ये स्नान व हरिकथा हे विधी महत्त्वाचे मानले जातात. शयनी एकादशीचे औचित्य साधून सर्व वारकरी चंद्रभागेमध्ये स्नान करतात व हरिकथा हा विधी पार पाडतात.त्यानंतरच पांडुरंगाचे दर्शन घेतले जाते.शिवाय दिवसभरात नगरप्रदर्शना हाही भाग वारकऱ्यांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे म्हणून ते नगरप्रदर्शना करतात. आषाढी - कार्तिकी निमित्त जमलेले वारकरी म्हणजे पंढरपुरामध्ये फुललेला आध्यात्माचा भक्तीचा मळा होय.विठ्ठल नामाच्या गजराने पंढरी नगरी दुमदुमून जाते;आणि मोठे हर्षोल्हासाने वारकरी मन भारावून जाते. वारीचा हा सोहळा केवळ भक्तीचा सोहळा राहत नसून तो सामाजिक समतेचाही सोहळा होतो.या सोहळ्यात जात,धर्म, वंश,पंथ यापेक्षा मानवता हाच मंत्र जोपासला जातो.अगदी माझ्याच कवितेत म्हटल्याप्रमाणे - "समतेचा मंत्र अनुभव दारी लोकशाही खरी पंढरीत " ही अनुभूती येते.आषाढी , कार्तिकी,चैत्री,माघी या सर्वच वाऱ्यामध्ये वारकऱ्यांनी हा अनुभव घेतलेला असतो. महाराष्ट्रातील या वारीची परंपरा शतकानुशतके चालू आहे आणि यापुढेही हा प्रवास असाच चालू राहील.याचे मुख्य कारण म्हणजे मराठी मातीतील मनावर विठ्ठल भक्तीचे असलेले गारुड हे होय.केवळ मराठी मनावरच हे गारुड आहे असं नाही तर महाराष्ट्राबाहेरील कर्नाटक ,तेलंगणा ,आंध्रप्रदेश या परिसरातील लोकांवरही आहे.या प्रांतातूनही मोठ्या प्रमाणामध्ये भाविक भक्त नित्यनेमाने पंढरीची वारी करत असतात.अर्थातच वारीमध्ये सीमावादाच्याही रेषा धुसर झालेल्या पाहायला मिळतात. सत् विचार , विवेकी आचरण व भक्तिमय वातावरण हाच इथला एकात्म अनुभव असतो.

Comments

Popular posts from this blog

नाट्यपरीक्षण तंत्र व स्वरूप

नाट्यपरीक्षण तंत्र व स्वरूप (भाग - २ ) - नाट्यघटक व अभिनय

नाट्यपरीक्षण तंत्र व स्वरूप(भाग - १ )