मराठी भाषा व अर्थार्जन

*भाषा संचालनालय ,महाराष्ट्र शासन* व *वसंतदादा पाटील महाविद्यालय, पाटोदा जि.बीड* यांच्या संयुक्त विद्यमाने *मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा* निमित्त विशेष व्याख्यान विषय - *मराठी भाषा :रोजगार संधी* वक्ते - प्रा.डॉ.राजकुमार यल्लावाड कै.लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालय,परळी वैजनाथ आदरणीय व्यासपीठ ,व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर व व्यासपीठासमोरील बंधू भगिनी ... ...... . . . . . ...... ...... "दोन दिवस वाट पाहण्यात गेले दोन दुःखात गेले हिशोब करतो आहे आता किती राहिलेत डोईवर उन्हाळे शेकडो वेळा चंद्र आला , तारे फुलले , रात्र धुंद झाली भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बरबाद झाली . " कवीवर्य नारायण सुर्वे म्हणतात त्याप्रमाणे आम्ही भाकरीचं वर्तुळ सांधण्यामध्ये उभं आयुष्य खर्च करत असू तर आयुष्य सजवायचं कधी आणि फुलवायचं कधी हा प्रश्न तरुणांना पडल्याशिवाय राहणार नाही. अलीकडच्या शिक्षण पद्धतीमध्ये पदव्याची भेंडोळी घेऊन बेकारीचा शिक्का माथी मारला जातोय.कविवर्य अर्जुन डांगळे यांच्या शब्दात सांगायचे म्हटले तर - "जगत आहोत हे जिणे जगावे लागत आहे म्हणून असे हे जिणे जगत असताना ही महानगरी आमच्यावर खुश झाली आणि तिची बेकार नावाची प्रियतम पदवी आम्हाला बहाल केली. " अशी तरुणांची अवस्था होताना दिसते मग - To be or not to be that is the question - 'जगावं की मरावं या दुनियेच्या उकिरड्यावर हा 'नटसम्राट ' मधील अप्पासाहेब बेलवलकरांना पडलेला प्रश्न बेकारांनाही पडतो ;खरंच पदवी घेऊन किंवा एखादी भाषा घेऊन बेकारीचा प्रश्न सुटत नसेल तर असा प्रश्न का पडू नये ;आणि तो पडणे स्वाभाविक आहे कारण अमेरिकन गणिततज्ज्ञ डॅनियल अब्राहम म्हणतात , " एखादी विशिष्ट भाषा ही ती भाषा बोलणाऱ्या समाजास व्यवसाय देऊ शकत नसेल तर ती भाषा तो भाषिक समाज सोडून देण्याचा प्रयत्न करतो. " पण आमच्या मराठी भाषेच्या संदर्भात हा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी तिच्या लेकरांनी घेतली पाहिजे उलट मराठी भाषेच्या अनुषंगाने बोलताना असं आपल्याला म्हणता येईल . 'तुज आहे तुजपासी ,पण तू जागा चुकलासी ' , ' काखेत कळसा गावाला वळसा' अशी आमची अवस्था झालेली आहे.आमच्या मराठी भाषेमध्ये सुंदर जीवन जगण्यासाठी लागणारी आवश्यक कौशल्य जर आत्मसात केली तर निश्चितच रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत आणि ह्या रोजगाराच्या संधीसाठी आवाश्यक कौशल्य प्राप्त करून आम्ही आमचं आयुष्य सजवू शकतो,बहरू शकतो , फुलवू शकतो आणि भविष्य उज्ज्वल करू शकतो.म्हणून मी आपल्या पुढ्यात ठेवतोय मराठी भाषेमध्ये कोणत्या कोणत्या क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत आणि त्यासाठीची आवश्यक कौशल्य - मराठी माणसाचे आपल्या भाषेवर प्रभुत्व असेल ,भाषेतील लेखनविषयक नियम , विरामचिन्हे , मुद्रितशोधनांच्या खुणा यांचा व्यवस्थित परिचय असेल तर मुद्रितशोधनाच्या माध्यमातून मराठी माणसाला रोजगार मिळवणे सोपे जाते.प्रकाशन क्षेत्र,वृत्तपत्र,नियतकालिक, संशोधन ,जाहिरात अशा विविध क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट मुद्रितशोधकांची आवश्यकता असते.साधारणतः प्रकाशन विश्वात आजच्या दराप्रमाणे दहा रुपये १/८ साईजच्या प्रती पेजकरिता हेही मुद्रितशोधकांना दिले जातात. दररोज १०० प्रती मुद्रित शोधकांने तपासल्या तर प्रत्येक दिवशी हजार रुपये तो सहजपणाने कमवू शकतो.प्रबंधाच्या आकाराची प्रत तपासायला एका पृष्ठाच्या प्रतीला १२ रुपये मुद्रितशोधकाला मिळतात.अर्थातच नोकरी मिळाली नाही म्हणून नैराश्येच्या गर्तेत जाऊन जगण्यापेक्षा मुद्रितशोधकांची भूमिका घेऊन मुद्रण तपासणीचे काम केले तर निश्चितच ती व्यक्ती आनंदाने जीवन जगेल हा सार्थ विश्वास आहे . मुद्रित शोधनाप्रमाणे उत्कृष्ट अनुवादक होऊनही अनुवादाच्या क्षेत्रातील रोजगारप्राप्ती आपल्याला करता येते. आज भाषा अनुवादाच्या क्षेत्रात जगभरात रोजगाराच्या इतक्या संधी निर्माण झालेल्या आहेत की एकवेळ नोकरी नसतानाही अनुवादाच्या संदर्भात व्यवस्थित मार्गदर्शन करून उदरनिर्वाह करता येईल.शासकीय अनुवाद , चित्रपट मालिकांचे अनुवाद , उद्योग , व्यवसाय , सहकार , शेअर्स , विमा ,इक्विटी , बँक , जाहिरात ,भाषा संचालनालय, हॉटेलिंग , हॉस्पिटल इतकेच काय तर महाजालामध्ये आता नव्याने येऊ घातलेल्या आर्टिफिशियल इंटेलिजिन्सपर्यंत उत्तम अनुवादकांची आवश्यकता आहे.बॉम्बे हायकोर्टात ज्युनियर ट्रान्सलेटरला ४९ हजार १०० ते एक लाख पंचावन्न हजार प्रतिमहिना वेतन दिले जाते.महाराष्ट्र शासनाच्या भाषा संचालनालयामध्ये ३५४०० ते ११ लाख २४ हजार रुपये पर्यंत प्रतिवर्ष वेतन दिले जाते.जाहिरात , हॉटेल ,हॉस्पिटल या क्षेत्रात तर अनुवादकाला सोनेरी दिवस आहेत.जाहिरात क्षेत्रात जनरल , टेक्निकल ,क्रिएटिव्ह अशा स्वरूपाच्या जाहिराती असतात. जनरल (सामान्य) क्षेत्रातील अनुवाद करण्यासाठी ५० पैसे ते दोन रुपये प्रतिशब्द , टेक्निकल (तांत्रिक) क्षेत्रातील अनुवाद करण्यासाठी एक रुपया ते पाच रुपये प्रतिशब्द तर क्रिएटिव्ह (सर्जनशील ) जाहिरात अनुवादित करण्यासाठी दोन रुपये ते दहा रुपये प्रतिशब्द असे मानधन दिले जाते.त्यातल्या त्यात इंटरप्रिटेशन सर्व्हिस अर्थातच द्वैभाषकाची भूमिका पार पाडणाऱ्या अनुवादकाला हॉटेल ,हॉस्पिटल या क्षेत्रात प्रतितास ५०० ते २००० रुपये मानधन दिले जाते.ग्राहकांना अथवा पेशंटला त्याच्या भाषेत संवाद साधल्यामुळे एक आपुलकीची भावना निर्माण होते म्हणून अशा द्वैभाषकांना अनुवाद क्षेत्रात अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.अनुवाद क्षेत्रामध्ये करिअर करण्यासाठी अनुवादकाला आपल्या मातृभाषेशिवाय दुसरी एखादी भाषा येणे गरजेचं असतं ; आणि हा अनुवाद करत असताना स्रोत भाषा व लक्ष्य भाषा या दोन्हीही भाषेचे ज्ञान त्याला असणे गरजेचे आहे शिवाय लक्ष भाषेमध्ये अनुवाद करत असताना स्रोत भाषेतील मूळ सौंदर्य कायम ठेवण्याचे सामर्थ्य त्याच्या अनुवादामध्ये असलं पाहिजे आणि हा अनुवाद करत असताना शब्दानुवादापेक्षा अर्थानुवाद महत्त्वाचा असतो. उदा. "मै आम आदमी हूँ 'या वाक्याचा अनुवाद 'आय एम अ मॅंगो मॅन' असा शब्दानुवादाने करून चालणार नाही तर 'आय ॲम अ कॉमन पर्सन' असा अर्थानुवादाने करावा लागेल. त्याचबरोबर यावेळी अनुवादकाने अनुप्रस्तुतीपेक्षा अनुप्रेषण याला महत्त्व देणे गरजेचे आहे.अशी कौशल्य प्राप्त असणाऱ्या अनुवादकाला गुगल ट्रान्सलेट , मायक्रोसॉफ्ट ट्रान्सलेट , लिंग्वा , फ्रिलान्स प्लॅटफॉर्म आदी ठिकाणीही नोकरीच्या प्रचंड संधी उपलब्ध आहेत. मराठी भाषेतून पटकथा व गीतलेखन या क्षेत्रातही रोजगाराच्या विपुल अशा संधी उपलब्ध आहेत. पटकथा लिहीत असताना चित्रपटाचे सिद्धांत , चित्रपटमूल्य ,नाट्यमूल्य व वाङ्‌मयीनमूल्य याची जाण पटकथाकाराला असणं आवश्यक असतं.साधारणतः नवीन स्क्रिप्ट रायटरला चाळीस हजारापर्यंत वेतन दिले जाते. शिवाय ऍडिशनल नऊ हजार रुपये त्या पटकथा लेखकाला मिळतात. इतकेच काय तर सीनियर पटकथा लेखक जे आहेत त्यांचे वार्षिक उत्पन्न जवळपास २७ लाख असे आहे काही काही पटकथाकार तर बॉक्स ऑफिसवर चित्रपट चांगला चालला तर त्या चित्रपटाच्या उत्पन्नाच्या प्रमाणात कमिशन घेतात.सुप्रसिद्ध पटकथाकार दिग्दर्शक नागराज मंजुळे यांची तर या क्षेत्रातली प्रगती नेत्रदीपक अशा स्वरूपाची आहे. वॉचमॅन ,पोलीस हवालदार, इस्त्रीवाला ते मास कम्युनिकेशन (Mass communication ) मध्ये असताना ' पिस्तुल्या' (२००५) नावाची 'शॉर्ट फिल्म ' पर्यंतचा प्रवास तर थक्क करणारा आहे.कारण त्यांच्या या पहिल्याच 'शॉर्ट फिल्म 'ला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. 'फॅन्ड्री' , ' सैराट' , ' घर बंदूक बिर्याणी ' , ' झुंड 'यासारख्या चित्रपटांनी नागराज मंजुळे कमालीच्या यशस्वी शिखरावर पोहोचलेले आहेत. २०१६ मध्ये त्यांनी 'सैराट'ची निर्मिती चार कोटीमध्ये केली होती तर उत्पन्न ११० कोटीचे झाले होते ; आणि याचा प्रीमियर बर्लिनच्या ६६ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात झाला होता.अर्थातच चित्रपटसृष्टीमधील प्रवेश हा त्यांच्यासाठी यशप्राप्तीबरोबरच अर्थप्राप्तीच्यादृष्टीनेही फायद्याचा ठरलेला आहे. ज्या व्यक्तीला कविता लिहिणे सहज शक्य होते त्यांना गीतलेखन लिहिणे फारसे अवघड जात नाही.गीत लेखनाचा तंत्रशुद्ध अभ्यास केला आणि चित्रपट , मालिकांकरिता पूरक असे गीत दिले तर गीतलेखनाच्या माध्यमातूनही खूप अर्थप्राप्ती आपल्याला करता येते.अगदी अलीकडच्या काळातील उदाहरणे द्यायची म्हटली तर कवी विष्णू थोरे यांनी 'जैतर' या चित्रपटासाठी ' देव मल्हारी ' नावाचं गीत लिहिलं; आणि या गीतासाठी त्यांना पंधरा हजार रुपये मानधन मिळाले. कवी विनायक पवार यांनी 'ख्वाडा ' चित्रपटासाठी 'तुझ्या रूपाचं चांदणं पडलंय , गाणं वाजू दे ' हे गीत अगदी फुकट लिहून दिलं होतं ; पण त्यानंतर 'रौंदळ 'साठी त्यांनी चित्रपटगीत लिहिले आणि एका गीतासाठी ३५ हजार रुपये त्यांना मानधन मिळालं.अगदी अलीकडच्या काळात नव्यानेच येत असलेल्या 'ये रे ये रे पैसा३' हा जो संजय जाधव निर्मित चित्रपट येतो आहे , त्यामध्ये त्यांनी तीन गाणी दिलेली आहेत. 'ढगांनं आभाळ दाटलंय ' अशासारखी सुंदर सुंदर गाणी त्यामध्ये त्यांनी लिहिलेली आहेत. एका गाण्याला चाळीस हजार असे एकूण तीन गाण्याचे एक लाख वीस हजार रुपये मानधन त्यांना गीतलेखनाच्या माध्यमातून मिळाले आहे.सुप्रसिद्ध गीतकार गुरु ठाकूर तर पन्नास हजार , एक लाख किंबहुना बॉक्स ऑफिसवर चित्रपट किती कमाई करतो त्याच्या प्रमाणात कमिशन ठरवून कमिशनसुद्धा गीतलेखनाच्या माध्यमातून घेतात. 'माध्यमांतर 'हा एक रोजगार प्राप्तीचा एक उत्तम मार्ग आहे.एक माध्यम सोडून दुसऱ्या माध्यमांमध्ये आशय परावर्तित करणे आणि त्या माध्यमाचे स्वरूप प्राप्त करून देणे म्हणजे माध्यमांतर होय. अलिकडच्या काळात कथा , कादंबरी , नाटक याचे चित्रपट, मालिका यामध्ये माध्यमांतर करण्याची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे.माध्यमांत्राची प्रक्रिया करण्यासाठी सुद्धा माध्यमांतर पटकथा लिहिणाऱ्या पटकथाकाराला चित्रपटमूल्य , नाट्यमूल्य , वाङ्‌मयीनमूल्य याची जाण असणे गरजेचे असते.अत्रे पिक्चर्सने काढलेला साने गुरुजी यांच्या 'श्यामच्या आई 'वर आधारित ' श्यामची आई ' हा चित्रपट ; रवी जाधव यांनी आनंद यादवांच्या 'नटरंग ' कादंबरीवर काढलेला 'नटरंग' हा चित्रपट ; संजय जाधव यांनी सुहास शिरवाळकर यांच्या 'दुनियादारी'या कादंबरीवर काढलेला 'दुनियादारी 'हा चित्रपट सुजय डहाके यांनी मिलिंद बोकील यांच्या 'शाळा'या कादंबरीवर काढलेला 'शाळा' हा चित्रपट किंवा अलीकडच्या काळातील प्राजक्ता माळी यांनी इतिहासकार बाबासाहेब पुरंदरे यांच्या ' फुलवंती ' या कादंबरीवर काढलेला 'फुलवंती' हा चित्रपट किंवा नव्यानेच येऊ घातलेला भाऊसाहेब कऱ्हाडे निर्मित अण्णाभाऊ साठे यांच्या 'फकिरा' कादंबरीवरील 'फकिरा'हा चित्रपट अशी कितीतरी चित्रपटांची मालिका या माध्यमांतरामध्ये आपल्याला समाविष्ट करता येते. अर्थकारणाच्या दृष्टिकोनातून विचार करताना प्राजक्ता माळी यांनी ११ ऑक्टोबर २०२४ मध्ये बाबासाहेब पुरंदरे यांच्या 'फुलवंती ' या कादंबरीवर जो चित्रपट काढला त्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी आठ लाखाची कमाई केली. दुसऱ्या दिवशी ३५ लाखाची तर तिसऱ्या दिवशी अर्थातच दसऱ्याच्या दिवशी तब्बल ७६ लाखाची कमाई केली.असे एकूण फक्त तीन दिवसात एक कोटी एकोणीस लाख रुपये उत्पन्न ' फुलवंती'च्या माध्यमातून प्राजक्ता माळी यांच्या चित्रपटाला मिळाले.अर्थातच या क्षेत्रातही सृजनशील विचाराच्या मराठी अभ्यासकांना,जिज्ञासूंना व या क्षेत्रात करिअर करू पाहणाऱ्या तरुणांना रोजगार प्राप्तीची संधी आहे. 'नाट्यपरीक्षण'या माध्यमातूनही काही प्रमाणामध्ये आपल्याला अर्थप्राप्ती करता येते.सांस्कृतिक कार्य संचालनालय,मुंबईच्या वतीने राज्य नाट्य स्पर्धा घेण्यात येतात; आणि त्या नाट्य स्पर्धांचे परीक्षण करण्यासाठी एका एकांकिकेकरिता परीक्षकाला ९०० रुपये मानधन दिले जाते.हे परीक्षण करण्यासाठी नाटकाचे संविधानक , संवाद ,पात्राची वेशभूषा,नेपथ्य, प्रकाशयोजना नाटकातील पार्श्वसंगीत रसपरिपोष करणारे आहे किंवा नाही , पात्राचा अभिनय प्रसंगानुरूप आहे किंवा नाही किंवा अभिनय करणारा नट विंगेत प्रवेश करत असताना कोणत्या पद्धतीने करतो यासारखे बारकावे परीक्षकाला लक्षात ठेवावे लागतात.या तंत्रानुसार परीक्षण केले तर ते परीक्षण तंत्रशुद्ध अशा स्वरूपाचे होते. सध्याचे युग हे जाहिरातीचे युग आहे.जाहिरातीला ६५ वी कला म्हणून ओळखले जाते. मुद्रित माध्यमे पाहिली काय किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया लक्षात घेतला काय जाहिरातीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाल्याची प्रचिती आपल्याला वारंवार येते.जाहिरातीच्या माध्यमातून उत्पादक कंपन्या प्रचंड खर्च करतात.माध्यमांमध्ये जाहिरात प्रसारित करण्यासाठी मोठा खर्च होतो तर मग ती जाहिरात परिणामकारक करून घेण्यासाठी अर्थातच तिचा मसुदा परिणामकारक करून घेण्यासाठी जाहिरात लेखन करणाऱ्या जाहिरात लेखकालाही मोठे मानधन दिलं जातं.मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या घोषवाक्यांनी युक्त जाहिरात असेल तर अशा जाहिरातीची मागणी प्रचंड मोठ्या प्रमाणात असते. मुलाखत लेखनामध्येही करिअर करण्याची संधी आहे अगदी ८० च्या दशकातील सुधीर गाडगीळ यांनी महाराष्ट्र बँकेत नोकरी मिळाली असतानाही त्यापेक्षा आपली आवड म्हणून निवेदन व मुलाखत हे करिअरसाठी क्षेत्र निवडलं आणि एक उत्तम जीवनशैलीने ते जीवन जगले.अलीकडच्या काळातील विलास बडे , प्रसाद काथे हेसुद्धा वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यावर मुलाखती घेताना दिसतात.अर्थातच निवेदनाबरोबर मुलाखत हे क्षेत्र निवडूनही आपल्याला करिअर करता येतं. पत्रकारितेतील संपादकांना ५०००० ते २ ,००० ०० तर उपसंपादकांना ३५००० ते १,५०० ०० वेतन देऊन नोकरी दिली जाते.पत्रकारितेतील कौशल्य आत्मसात करतानाच मराठी भाषेवर त्यांचे प्रभुत्व असणं आवश्यक असतं तरच या लोकांना या क्षेत्रात संधी दिली जाते. कोणत्याही कार्यक्रमात रंगत भरायची असेल तर ती जबाबदारी सूत्रसंचालकाची आहे.सूत्रसंचालन हीसुद्धा एक कला आहे. शालेय - महाविद्यालयीन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ,शासकीय कार्यक्रम, व्यावसायिक कार्यक्रम, कौटुंबिक व खाजगी कार्यक्रम , संगीत मैफिलीचे सूत्रसंचालन , कविसंमेलन , राजकीय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन असे सूत्रसंचालनाचे वेगवेगळे प्रकार पडतात.या क्षेत्रातही रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात आहेत प्रकाश मेदककर ,सुधीर गाडगीळ , निलेश साबळे ,भरत दौंडकर , ज्ञानेश वाकुडकर, निलेश चव्हाण , गोपाल मापारी , महेश अचिंतलवार ,जयप्रकाश दगडे , डॉ. विश्वाधार देशमुख अशा कितीतरी महाराष्ट्रातील सूत्रसंचालकाची यादी आपल्याला सांगता येईल.ज्ञानेश वाकुडकर कविसंमेलनाचे सूत्रसंचालन करण्यासाठी पंधरा हजार रुपये मानधन घेतात.महेश अचिंतलवार सांकेतिक मैफिलीचे सूत्रसंचालन करण्यासाठी दहा ते पंधरा हजार रुपये मानधन घेऊन कार्यक्रम करतात.आमच्या परळीचे बालाजी कांबळे लग्न सोहळ्यातील सूत्रसंचालनासाठी पाच हजार रुपये मानधन घेतात.सूत्रसंचालनासाठी आवश्यक तंत्रे आत्मसात करून भाषेवर प्रभुत्व मिळवले तर निश्चितच या क्षेत्रातसुद्धा करिअर करण्याची संधी आहे . सूत्रसंचालनाप्रमाणे भाषण करून वक्ता होणे हीसुद्धा अर्थप्राप्तीची एक मोठी संधी आहे.त्यासाठी वक्त्याचे चौफेर वाचन , बहुभाषिकत्व ,भाषेवर प्रभुत्व , आवाज , आरोह अवरोह ,हजरजबाबीपणा, सभाधीटपणा , देहबोली ,प्रबळ इच्छाशक्ती व पोशाख याकडे वक्त्याला विशेष लक्ष द्यावे लागते.प्राचार्य शिवाजीराव भोसले,निर्मलकुमार फडकुले, नितीन बानगुडे , यजुवेंद्र महाजन, धनश्री लेले ,इंद्रजित देशमुख , गणेश शिंदे ,प्रणिती शिंदे ,अरविंद जगताप ,अविनाश भारती अशा कितीतरी वक्त्यांची मांदियाळी सांगता येईल.अविनाश भारती एका व्याख्यानासाठी २५ हजार रुपये मानधन घेतात.गणेश शिंदे यांच्या व्याख्यानाचा दर जवळपास ४० हजार रुपये आहे.उपनिर्देशित काही वक्त्यांच्या तारखा मिळवण्यासाठी सहा सहा महिने प्रतीक्षा करावी लागते.भाषेवर प्रभुत्व असेल आणि तुमचं भाषण प्रभावीपणाने रसिक श्रोत्यांच्या मनामध्ये उतरत असेल तर निश्चितच या क्षेत्रातसुद्धा प्रचंड अर्थप्राप्ती करता येते. सध्याचे युग हे माहिती तंत्रज्ञानाचे युग आहे.माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये मराठी माणसाने त्यात अनभिज्ञ असणे म्हणजे कर्म दरिद्रीपणाच होय.आम्हाला आमचं जगणं सुंदर करावसं वाटतं;आणि ते सुंदर करायचं असेल तर आमचं आयुष्य आम्हाला सजवावं लागेल.हे आयुष्य सुंदर करण्यासाठी निश्चितच माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग आपल्याला झाल्याशिवाय राहणार नाही.विशेषता मराठी माणसाने या माहिती तंत्रज्ञानाशी मैत्री केली पाहिजे ;आणि आमच्या आयुष्यातील ओसाडपणा बाजूला सारून त्यास नंदनवनाचं रूप कसं प्राप्त होईल याकडे लक्ष दिले पाहिजे. जागतिक स्तरावरील यशवंतांची यादी पाहिली तर त्यात बहुतांश लोक माहिती तंत्रज्ञानाशी मैत्री केलेले दिसतात;आणि त्या मैत्रीच्या जोरावरच त्यांनी यशाची अनेक शिखरे गाठलेली आहेत.ॲमेझॉन,फ्लिपकार्ट ,ओला, उबेर ,पेटीएम , फोन पे , झोमॅटो, स्विगी यासारख्या कंपन्यांनी जी नेत्रदीपक प्रगती केलेली आहे त्यात माहिती तंत्रज्ञानाचा मोलाचा वाटा आहे. ॲमेझॉन , फ्लिपकार्ट यांचं स्वतःचं कुठलंही प्रॉडक्ट नाही तरी ते रिटेलक्षेत्रात सर्वात मोठा उद्योग करतात.ओला ,उबेर यांची कुठलीही गाडी नाही ;परंतु ग्राहकाला गाडी पुरविण्याचं सर्वात मोठं कार्य ते करतात. फोन पे, पेटीएम यांची कुठलीही बँक नाही ; परंतु ट्रान्सफर व्यवस्थेमध्ये त्यांचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. स्विगी , झोमॅटो यांचं कुठलंही हॉटेल नाही पण खवय्यांना रुचकर अन्न पुरवण्याचं काम ते करतात. याला कारण फक्त त्यांनी माहिती तंत्रज्ञानाशी केलेली मैत्री हे होय. एकाचा माल घ्यायचा आणि दुसऱ्याला द्यायचा त्यात फक्त माहिती तंत्रज्ञानाचं साह्य घ्यायचं एवढंच काम या कंपन्यांनी केलं; आणि आज यशाची अनेक शिखर गाठली. माहिती तंत्रज्ञानाची ही किमया पाहता मराठी माणसानेही या क्षेत्रात मागे राहू नये.मराठी भाषेची सेवा करता करता ,त्या साहित्याची सेवा करता करता आम्हाला अर्थकारण साधता येतं.रोजगाराच्या संधी मिळवता येतात आणि आमचं जगणं समृद्ध करता येतं.गरज आहे ती फक्त सकारात्मक मानसिकतेची. . .ही सकारात्मक मानसिकता स्वीकारून मराठी माणूस भाषेची ,साहित्याची सेवा करेल आणि माहिती तंत्रज्ञानाशी मैत्री करून आपलं जगणं समृद्ध करेल हा विश्वास. ब्लॉग लेखन म्हणजेच 'अनुदिनी ' या क्षेत्रातही प्रचंड पैसा मिळवता येतो.भारतात अमित अग्रवाल यांनी सर्वप्रथम ब्लॉगचा वापर केला. त्यांचे Labnol नावाचे अकाउंट आहे.या ब्लॉगच्या माध्यमातून ते ८० ते ९० लाख मासिक उत्पन्न मिळवतात.तर श्रद्धा शर्मा नावाच्या लेखिका त्यांच्या 'Yourstory ' या ब्लॉगच्या माध्यमातून मासिक ७० ते ८० लाख उत्पन्न मिळवतात हे वास्तव आहे. अशा प्रकारचे उत्पन्न मिळविण्याचा मार्ग मराठी माणसासाठी सहज उपलब्ध आहे.www.bloger.com अथवा wordpress वर आपले खाते उघडून त्यावर पॉवरफुल कंटेंट, मराठी कविता ,कथा ,लेख अपलोड केले तर आपल्यालाही उत्पन्न मिळेल.ब्लॉग लेखनास सुरुवात केल्यापासून तीन महिन्यात आपल्याला Adsense बटन मिळते. त्यावर क्लिक केल्यानंतर ब्लॉगवर दाखवल्या जाणाऱ्या जाहिरातीच्या महसुलातला काही भाग ब्लॉग लेखन करणाऱ्या लेखकाला मिळतो.वर उल्लेख केलेल्या अमित अग्रवाल,श्रद्धा शर्मा यांनाही उत्पन्न अशाच स्वरूपातून मिळते.हे उत्पन्न पॅसिव स्वरूपाचे आहे.म्हणजे आपण झोपल्यानंतरही कोणीतरी आपल्या ब्लॉगला व्हिजिट देत असेल . . . त्या ब्लॉगचे व्ह्यूज वाढत असतील ; आणि ते जाहिराती पाहत असतील तर आपला रिव्हेन्यू वाढतो. म्हणजेच आपण झोपेत असतानाही आपल्याला उत्पन्न मिळतं. अशा प्रकारच्या उत्पन्नाला ' पॅसिव ' इन्कम असे म्हणतात.मराठी माणसाने ब्लॉग लेखनाच्या माध्यमातून पॅसिव इन्कम वाढवण्यासाठी ब्लॉग लेखनवरचा भाग हा पॉवरफुल कसा होईल आणि त्यात सातत्य कसं राहील याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. निश्चितच हे तंत्र त्यांनी पाळले तर चांगली कमाई ब्लॉग लेखनच्या माध्यमातून होते. माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील youtube हे एक सर्वपरिचित असे व्यासपीठ.यूट्यूबच्या माध्यमातून सातत्यपूर्ण आणि गुणवत्तापूर्ण व्हिडिओ अपलोड करत राहिले तर इथेसुद्धा आपल्याला कमाईची उत्तम संधी आहे. अगदी सुरुवातीला एका वर्षात एक हजार सबस्क्रायबर आणि ४००० तास व्ह्युज टाईम झाला असेल तर आपल्याला ॲडसेन्स बटन मिळते.त्यानंतर पुढे जितके व्ह्युज वाढतील आणि व्ह्युज टाईम वाढेल व प्रत्यक्ष व्हिडिओ पाहत असताना त्यावर ज्या जाहिराती दाखवल्या जातात .त्या जाहिरातीतील महसुलाच्या उत्पन्नाच्या प्रमाणात काही वाटा व्हिडिओ चॅनलधारकाला दिला जातो.ॲडसेन्स नंतर सिल्वर बटन ,गोल्डन बटन , डायमंड बटन ,रुबी बटन , रेड डायमंड बटन या उंचीपर्यंत आपल्याला पोहोचता येते. दहा कोटी सब्सक्रायबर करून रेड डायमंड बटन प्राप्त झाल्यानंतर त्यापुढील प्रती १००० ह्युजला एक लाख ते पाच लाख रू. चॅनलधारकाला मिळतात. ऑडिओ बुक्स हे पैसे कमावण्याचं एक उत्तम माध्यम आहे. ' weheare ' , ' storytel ' , 'आयपुस्तक 'असे काही महत्त्वपूर्ण ॲप्लिकेशन्स या व्यासपीठावर उपलब्ध आहेत. weheare या ॲप्लिकेशनची सुरुवात २०२० मध्ये झाली.या व्यासपीठावर कथा, कविता वाचन करणाऱ्या व्यक्तीसोबत करार केला जातो. हे ॲप्लिकेशन पुस्तकही पुरवते आणि ॲपही पुरवते शिवाय करार करत असताना तासाला ५० डॉलर ते पुढच्या ऑडिओ तयार करून देणाऱ्या व्यक्तीला देतात.इथे कथा, कविता तुमचीच असावी असे काही बंधनकारक नाही.आपण आपल्याला आवडणाऱ्या मराठीतील कोणत्याही लेखकाची कथा अथवा कवीची कविता ऑडिओ स्वरूपात रेकॉर्ड करू शकतो.म्हणजेच कविता,कथा आपली नाही ॲप्लिकेशनही आपलं नाही ;आणि वाचणारे वाचकही त्या त्या व्यासपीठावर जाऊन वाचन करतात.म्हणजेच ॲमेझॉन, फ्लिपकार्ट , फोन पे , पेटीएम , ओला , उबेर ,स्विगी ,झोमॅटो सारखे आपले उत्पन्न याप्रमाणे चालू होईल. ऑडिओ बुक्स रेकॉर्ड करत असताना आरोह ,अवरोह व्यवस्थित आले पाहिजेत. शिवाय नॉईस कट करण्याचे तंत्र मात्र रेकॉर्ड करणाऱ्या व्यक्तीने अवगत केले पाहिजे.आज-काल पुस्तक वाचण्यासाठी ऑडिओ बुक्सवर ज्ञानजिज्ञासूंची झुंबड उडत आहे.म्हणूनच सचिन खेडकर या संदर्भात - " वाचनसंस्कृती कमी होते, वाचकांना चांगलं पुस्तक वाचायला मिळत नाही किंवा वेळ मिळत नाही हे जे कारण आहे त्याला 'ऑडिओ बुक्स'हा उत्तम पर्याय आहे " असे म्हणतात आणि ऑडिओ बुक्सची महती गातात .अर्थातच ऑडिओ बुक्स माध्यमातून तीन प्रकारचे फायदे आपल्याला होतात.वाचन संस्कृती लोप पावत असताना ती वाढविण्याचं काम आपण करतो हा एक फायदा तर दुसरा फायदा मराठीतील उत्कृष्ट कथा ,कविता , कादंबरी , काही महत्त्वपूर्ण लेख ,वैचारिक लेख आपण ऑडिओ बुक्सच्या माध्यमातून देतो आणि साहित्याचं 'सौंदर्यमूल्य' हे जे प्राणतत्त्व आहे त्याची जोपासना करण्यातही महत्त्वाची भूमिका पार पाडतो. याशिवाय तिसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे ऑडिओ बुक्सच्या माध्यमातून आपलं उत्पन्न सुरू होतं.गुणवत्तापूर्ण ऑडिओ रेकॉर्डिंग करणाऱ्या व्यक्तीला प्रती कथा ३०० डॉलर पर्यंतचा करार करण्याची तयारी Weheare ची आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या विश्वातील वरील व्यासपीठाबरोबरच प्रतिलिपी, जर्नल्स , ई-बुक्स असे कितीतरी माध्यमं आहेत. ज्या माध्यमाच्या सहकार्याने आम्ही आमची उपजीविका सहजतेने चालवून उदरनिर्वाह भागवू शकू . . . असं उत्पन्न मिळवू शकतो. म्हणून मराठी भाषिकांनी रडत बसण्यापेक्षा परिस्थितीशी लढलं पाहिजे संघर्ष केलं पाहिजे आणि मराठी भाषेवर प्रभुत्व मिळवून रोजगाराच्या संधी उपलब्ध केल्या पाहिजे त्याचबरोबर माहिती तंत्रज्ञानाच्या युगात माहिती तंत्रज्ञानाची मैत्री करून एक सकारात्मकतेने सक्षम जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. " लहरों से डरकर , नौका पार नही होती कोशिश करनेवालों की कभी हार नही होती " याप्रमाणे मराठी माणसाने भूमिका घेऊन सतत प्रयत्न करत राहिले तर मराठी भाषकांनाही खूप मोठ्या रोजगार संधी आहेत. त्याचा पुरेपूर वापर करून मराठी माणसं सुखी समृद्ध व संपन्न जीवन जगतील आणि आपल्या आयुष्याची बाग फुलवतील हा सार्थ विश्वास व्यक्त करून मी माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. धन्यवाद . . . ! Copyright#Yellawad R.K.

Comments

Popular posts from this blog

नाट्यपरीक्षण तंत्र व स्वरूप

नाट्यपरीक्षण तंत्र व स्वरूप (भाग - २ ) - नाट्यघटक व अभिनय

नाट्यपरीक्षण तंत्र व स्वरूप(भाग - १ )