**बावनकशी नाट्यकलाकृती ‘ संगीत संत तुकाराम ‘
मराठी साहित्यसृष्टीत संगीत नाटकाची सुरुवात अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्या ‘ संगीत सौभद्र ‘, ‘ सं . शाकुंतल ‘ पासून सुरू झाली ;आणि संगीत नाटकाचे एक पर्व मराठी नाट्यक्षेत्राला अनुभवायला मिळाले . संगीत नाटक हे मराठी रंगभूमीला पडलेले एक पहाटेचे सुखद स्वप्न आहे . असे म्हटले जाते ते यथार्थच आहे . मराठी नाट्यसृष्टीचा हा उत्कर्षाचा काळ होता . सं . शाकुंतल, सं .सौभद्र , सं . शारदा , मृच्छकटिक, सं . स्वयंवर , सं .मानपमान , सं . संशयकल्लोळ , सं .विद्याहरण , सं . ययाति आणि देवयानी , सं . देवबाभळी , सं . चंद्रप्रिया, सं . संत तुकाराम आदी नाटकामुळे मराठी रंगभूमीला ‘ सुवर्णयुग ‘ प्राप्त झाले .
संगीत नाटकाच्या याच परंपरेतील संगीत संत तुकाराम ह्या अक्षर नाट्यकलाकृतीचा प्रयोग छ . शिवाजी महाराज जयंतीनिमित्त ‘ नाथ प्रतिष्ठान ‘ , परळीच्या वतीने आयोजित करण्यात आला होता .परळीकर रसिक प्रेक्षकांसाठी ही एक अप्रतिम मेजवानी होती . ‘कसदार अभिनय दमदार अभंग , नाट्यगीतांचा देखणा नजराणा ‘, त्याचबरोबर भक्ती -शक्तीचा अनुपम आनंद सोहळा या कलाकृतीच्या माध्यमातून अनुभवता आला. त्यामुळे आयोजकांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे .
सं .संत तुकाराम मधील संविधानक सर्वपरिचित असले तरी त्यातील प्रभावी संवाद , कसदार अभिनय , वातावरण निर्मिती , संविधानकाला गतिमानता प्राप्त करून देणारे अभंग , नाट्यगीत व खुमासदार विनोद आदी बलस्थानामुळे हे नाटक रसिक प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवते . नाटकाची कथावस्तू व ज्ञानेश महाराव , लीना पाळेकर , मयुरेश कोटकर , प्रीती तोरणे , कुशल कोळी , देव कांगणे , विक्रांत आजगावकर आदी कलावंताचा कुशल अभिनय हे या प्रयोगाच्या यशाचे मुख्य गमक आहे . त्यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखा संत तुकाराम , छ . शिवाजी महाराज , जिजाई , मंभाजी , तुंभाजी ,रंभा व इतर ह्या अतिशय जिवंत पातळीवर उभ्या केलेल्या आहेत . संत तुकारामाचे व त्यांच्या सहवासातील इतर व्यक्तींचे व्यक्तिमत्त्व, संहितेतील मूळ पात्रं व प्रयोगातील पात्रं यांच्यातील तादात्म्याची अनुभूती देण्याचे सामर्थ्य त्यांच्या अभिनय कौशल्यात होते . म्हणून या नाटकातील व्यक्तिरेखा व नाटक कुठेच कृत्रिम वाटत नाही .
नाटकाचे संविधानक संत तुकारामांच्या जीवनावर आधारित असल्यामुळे त्यांच्या जीवनचरित्रातील सत्य घटनांचा आविष्कार करतानाच त्यास दिलेली कल्पनेची जोडही अप्रतिम आहे . कल्पनाशक्तीचा सुयोग्य वापर केला नसता तर नाटक शोकात्मिकेकडे झुकले असते . पाश्चात्त्य विचारधारेपेक्षा भारतीय विचारधारेचा आचार्य भरतमुनींच्या नाट्य विचारांचा प्रभाव या नाटकावर जास्त दिसतो . त्यात सत्पप्रवृत्ती व दुष्ट प्रवृत्ती दाखवतानाच सत्प्रवृत्तीचा दाखवलेला विजय वाखणण्यासारखा आहे . छ.शिवाजी महाराज व संत तुकाराम महाराज यांची भेट , वीरश्री छ . शिवाजी महाराजांनी वैराग्य पत्करून स्वराज्यातील भोंदुगिरीचा शोध घेणे , मातोश्री जिजाऊ यांच्या आज्ञेनुसार व संत तुकारामांच्या उपदेशानुसार स्वराज्य संरक्षणासाठी तत्पर होणे हे सर्व प्रसंग रसिक मनाला भावणारे आहेत .
प्रसंगाला अनुकूल वातावरण निर्मिती करण्यासाठी नेपथ्य , पार्श्वसंगीत , प्रकाशयोजना यांचा औचित्यपूर्ण वापर नाटकाची उंची वाढवण्यास मदत करणारा आहे . संत तुकाराम यांच्या प्रवेशांचे चित्र दाखवताना विठ्ठल व रुक्मिणी यांची मूर्ती नेपथ्यात महत्त्वपूर्ण ठरतेच ;पण त्याशिवाय खुंटीला अडकवलेला कासरा व दुपट्टा हे नेपथ्यातील भागही नाटकाची व प्रसंगाची लक्षवेधी परिणामकारकता वाढवतात . त्याचबरोबर भिंतीवर वापरलेली रंगसंगती, प्रसंगानुसार बजरंगबली हनुमानाचे वापरलेले रेखाचित्र हे घटकसुद्धा नाट्य प्रसंगानुकूल आहेत . इतकेच काय तर नेपथ्य व वेशभूषा यात विसंगती येणार नाही याची पुरेपुर काळजी येथे घेतली गेलेली दिसली . म्हणून हे नाटक दीर्घकाळ रसिक मनात कायमचे घर करून राहील असा सार्थ विश्वास !काही समकालीन जाणिवांचा संदर्भ सूचकतेने प्रत्यय देण्याचे सामर्थ्य या नाटकात आहे .परिणामस्वरूप माणसातील संवेदनशीलता जागी करण्यास उपयुक्त ठरणारे असे हे अस्सल बावनकशी नाटक आहे .
प्रा .डॉ . राजकुमार किशनराव यल्लावाड
कै . लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालय , परळी वै .
Comments
Post a Comment