सुंदर व सुबक आणि मूल्यात्मक गुणांनी युक्त असलेली 'शब्दवेली '

साहित्याचा संसार भावनेवर आधारित असतो.शब्द हे त्याचे माध्यम असतात.ते माध्यम आशयाला प्रभावीपणाने पुढे घेऊन जात असतील तर निश्चितच साहित्य हे 'सौंदर्य'मूल्याने विणटलेलं असते.प्रभावी शाब्दाविष्काराने बहरलेली 'शब्दवेली' रसिकमनाला मोहित करते. त्या शब्दवेलींचे आकर्षण प्रत्येकालाच वाटते.अगदी अलीकडेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाने संपादित केलेले व आदित्य प्रकाशन औरंगाबाद यांनी प्रकाशित केलेले 'शब्दवेली ' हे पुस्तक असेच सर्वांच्या आकर्षणाचा विषय ठरताना दिसत आहे. त्यास शब्दवेलीतील विविध प्रवृत्तीचे वेचे ,वैविध्यपूर्ण कविता व मुखपृष्ठापासून मलपृष्ठापर्यंत केलेली आखीव- रेखीव संरचना आणि बांधणी हे घटक कारणीभूत आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादच्या बी.ए./बी.एस्सी./ बी.कॉम./बी.एस.डब्ल्यू व बी.एफ.ए.द्वितीय वर्षाच्या तृतीय व चतुर्थ सत्रातील अभ्यासक्रमाकरिता संपादित केलेले हे पुस्तक.त्यात जुन्या व नवीन लेखक कवींच्या रचनांचा सुंदर समन्वय साधलेला आहे.श्रममूल्य,लोकशाही मूल्य,वैज्ञानिक जाणिवा याबरोबरच अन्य जाणिवांचा समावेश यात आहे.अगदी संपादकीयमध्ये आपली भूमिका मांडत असताना मराठी अभ्यास मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष डॉ.सर्जेराव जिगे यांनी म्हटल्याप्रमाणे , "विद्यार्थ्यांच्या वैचारिक जडणघडणीबरोबरच त्यांची साहित्य अभिरुची संपन्न होईल तसेच विद्यार्थ्यांमध्ये समाजभान, राष्ट्रभानाची चेतना जागृत होऊन तो प्रागतिक दृष्टी अंगीकारेल, विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागेल आणि मूल्यात्मकदृष्ट्या विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व बहरेल या दृष्टिकोनातून ही 'शब्दवेली ' आपल्यासमोर देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. " त्यांचे हे विधान 'शब्दवेली 'वर नजर फिरवल्यानंतर सार्थ वाटते. मानवी जीवन मूल्यांनी युक्त असेल तर ते जीवन सुंदर होते. या जीवनाला सौंदर्यरूप प्राप्त करून देण्यासाठी शिक्षण व्यवस्थेमध्ये मूल्यात्मकतेचे असणे तितकेच महत्त्वाचे आहे.पदवीच्या द्वितीय वर्षासाठी ठेवलेले 'शब्दवेली' हे पुस्तक या मूल्यात्मक कसोटीवर श्रेष्ठ दर्जाचे आहे. " मी रक्ताचे चार नमुने मिसळून घेतो आता हिंदू,मुस्लिम,शीख,ईसाई शोधा ज्याचे त्याने " असा मानवतावादाचा संदेश देणारी ही शब्दवेली 'आकाशी झेप घेण्याची ' प्रेरणा देते. त्याचबरोबर ' पाय असावे जमिनीवरती , कवेत अंबर घेताना' हा मूलमंत्र देते. अगदी हे सर्व त्या त्या लेखक कवींचे शब्द ... ज्यात जीवनमूल्यांबरोबरच कलामूल्यांचे सुंदर आविष्करण झाले आहे. असे हे वैविध्यपूर्ण,विविध स्तरीय व सर्वस्पर्शी पुस्तक साकारले गेलेले आहे. कोणत्याही पुस्तकाचे अंतरंग जसे गुणात्मकदृष्ट्या महत्त्वाचे असते तसेच त्या पुस्तकाचे बाह्यांग व इतर घटकही तितकेच महत्त्वाचे ठरतात. 'शब्दवेली' च्या निर्मितीत मराठी अभ्यास मंडळाच्या इतर सन्माननीय सदस्यासोबत माझाही समावेश होता.त्यामुळे कमी कालावधीत हे पुस्तक तयार करत असताना किती आव्हाने होती याचा मी प्रत्यक्ष साक्षीदार आहे ;पण सकारात्मक भूमिका घेऊन निर्मिती करण्याचा प्रयत्न केला तर ती निर्मिती उच्च दर्जाचीच होते.याचेच उत्तम उदाहरण म्हणजे 'शब्दवेली ' हे होय.त्यात प्रकाशक म्हणून श्री. विलास फुटाणे व त्यांच्या सौभाग्यवती सौ.वर्षाताई यांची भूमिका अतिशय महत्त्वाची राहिलेली आहे.आपल्याला हे पुस्तक कमी कालावधीत काढायचे आहे ; पण कमी कालावधीत काढत असताना त्याची गुणवत्ता ढासळणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.ही त्यांची तळमळ निश्चितच कौतुकास्पद अशी होती.त्यामुळेच 'शब्दवेली'सारखे पुस्तक विद्यार्थ्यांना वेळेत उपलब्ध करून देणे सहज शक्य होत आहे. विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू प्रा.डॉ.प्रमोद येवले , प्र. कुलगुरू मा.प्रा.डॉ.श्याम शिरसाट, कुलसचिव मा.प्रा.डॉ. भगवान साखळे, मानव्यविद्या शाखेचे अधिष्ठाता मा.प्रा.डॉ. प्रशांत अमृतकर ,मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ.सर्जेराव जिगे व त्यांचे सर्व सहकारी सदस्य यांच्या मार्गदर्शनानुसार आदित्य प्रकाशनाच्या श्री.विलास फुटाणे यांनी अतिशय जबाबदारीने , भान ठेवून ,काळजीपूर्वक असे हे पुस्तक साकारलेले आहे. तत्परतेने हे पुस्तक साकारण्यात त्यांचे मौलिक योगदान आहे.सरदार जाधव यांनी या पुस्तकाचे सुंदर मुखपृष्ठ रेखाटन केलेले दिसते. काही अल्प त्रुटी वगळता हे पुस्तक उत्तम झालेले आहे.एकंदरीत सुंदर व सुबक आणि मूल्यात्मक गुणांनी युक्त असलेल्या या 'शब्दवेली 'चे विद्यार्थी,प्राध्यापक व रसिक वाचक स्वागत करतील. हे पुस्तक त्यांच्या निश्चितच पसंतीस उतरेल हा सार्थ विश्वास ... ! प्रा.डॉ.राजकुमार यल्लावाड कै.ल.दे.म.महाविद्यालय,परळी वै.

Comments

Popular posts from this blog

नाट्यपरीक्षण तंत्र व स्वरूप

नाट्यपरीक्षण तंत्र व स्वरूप (भाग - २ ) - नाट्यघटक व अभिनय

नाट्यपरीक्षण तंत्र व स्वरूप(भाग - १ )