आदर्श व्यक्तिमत्त्व असलेले पिताजी - किशनराव यल्लावाड

"एक धागा सुखाचा शंभर धागे दुःखाचे जरतारी हे वस्त्र मानवा तुझिया आयुष्याचे " असं सुप्रसिद्ध कवी गदिमांनी मानवी जीवनाचे वर्णन केले.अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये माणसं आयुष्याची नाव पुढे वल्लवत ठेवण्यापेक्षा रडगाणं गात बसतात;पण संघर्ष करणारी माणसं त्या प्रतिकूल परिस्थितीवर स्वार होण्याचा प्रयत्न करतात हेही तितकेच सत्य आहे.याचे उत्तम उदाहरण म्हणजे आमचे वडील स्व. किशनराव यल्लावाड हे होत.हलाखीच्या परिस्थितीमुळे स्वतःला शिक्षण घेता आलं नाही.निरक्षरतेचा शाप घेऊन उभं आयुष्य काढत असताना अनेक संकटं आली;पण त्या संकटाला न घाबरता पुढे जात परिस्थितीशी दोन हात करणारे आणि आपल्याबरोबर इतरांनाही पुढे घेऊन जात जात मदत करणारे असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. "आम्ही शिकलो नाही म्हणून आमच्या वाट्याला दुःख आलं;पण तुमच्या वाट्याला दुःख येऊ नये यासाठी तुम्ही शिका रे बाबांनो ...शिकलात तर तुमच्या जीवनाचं कल्याण होईल."अशी भूमिका घेऊन ते सदैव आम्हाला शिक्षणासाठी उद्युक्त करत असत.अंगावर पुरेशी वस्त्र नाहीत ... धोतराला बांधलेल्या गाठी ,दारिद्र्य पाचवीला पुंजलेलं ... तरीही त्यांची लढावूवृत्ती आम्हाला जगण्याचं बळ द्यायची ...त्याचबरोबर शिकण्याचंही ...आज आम्ही जी यशाची शिखरे गाठलेली आहेत ती शिखरे सर करण्यापाठीमागे केवळ आणि केवळ त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण होती.आम्हाला शिकवण्यासाठी रस्त्यावरील खडी फोडण्याचं काम , तळे खोदण्याचे काम , प्रसंगी हमाली करण्याचं कामही त्यांनी केलं.कारण शेतीतील उत्पन्नावर घरातील १४ माणसांचा उदरनिर्वाह चालवणंही शक्य नव्हतं.म्हणून त्यांनी अनेक अपमान पचवत अशी कामेही केली;पण आमच्या शिक्षणाला त्यांनी कधी पैसा कमी पडू दिला नाही.त्यांच्या सहकार्यशील वृत्तीमुळे गरिबीत जीवन जगणारा माझा गावही त्यांच्या मदतीला धावून यायचा ...त्यांच्या स्वभावामुळे गावातील लोकांनी केलेली उदार मदत हीसुद्धा आमच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देण्यात तितकीच महत्त्वपूर्ण ठरलेली आहे. प्रा.डॉ.राजकुमार यल्लावाड प्राध्यापक व मराठी विभागप्रमुख, कै.ल.दे.महिला महाविद्यालय, परळी वै मो.क्र.9881294195

Comments

Popular posts from this blog

नाट्यपरीक्षण तंत्र व स्वरूप

नाट्यपरीक्षण तंत्र व स्वरूप (भाग - २ ) - नाट्यघटक व अभिनय

नाट्यपरीक्षण तंत्र व स्वरूप(भाग - १ )