नव्वद नंतरचे मराठवाड्यातील कथा साहित्य
*प्रास्ताविक* : -
१९९०-९१नंतर मराठी ग्रामीण साहित्यात पृथगात्म जाणिवा येऊ लागल्या . कारण १९९१ला 'गॅट ' करारानुसार भारताने जागतिकीकरण स्वीकारले. ' खाऊजा ' संस्कृती येथे उदयाला आली . त्याचा परिणाम ग्रामीण जीवनावरही झाला . या संस्कृतीमुळे ग्रामीण जीवनात चांगले कमी व वाईट परिणाम जास्त झाले . देशी -विदेशी बहुराष्ट्रीय कंपन्यांनी शेतकऱ्याच्या जमिनी काबीज केल्या , शेतकरी भूमीहीन होऊ लागला ,दलालाकडून शेतकऱ्याची फसवणूक झाली, शेतीमालाला मिळणारा अल्प भाव , वाढती महागाई ;खत, बी -बियाणे, फवारण्या यामुळे शेतीतील वाढलेला खर्च व उत्पादन यातील तफावत , वाढती बेकारी, लोडशेडिंग , गावातील बदलते राजकारण , नीतिमूल्याचा घसरलेला दर्जा , भूक अशा विविध पातळ्यावर ग्रामीण माणसाला संघर्ष करावा लागू लागला . 'खाऊजा ' संस्कृतीने निर्माण केलेल्या समस्या व काही समकालीन जाणिवा १९९१नंतरच्या ग्रामीण साहित्यातून आविष्कृत केल्या जाऊ लागल्या. ग्रामीण कथा, कविता , कादंबरी व अन्य वाङ्मयप्रकारातही याचे प्रतिबिंब दिसते .१९९१नंतर जुन्या पिढीतील लेखक कवी बरोबरच नव्या पिढीतील कवी लेखकांनी समकालीन वास्तवाचे चित्र रेखाटणारे साहित्य लिहिलेले आहे .
जागतिकीकरणाच्या काळातही स्त्रियांचे सनातन प्रश्न फारसे बदलले नाहीत. पुरुषी मानसिकतेत बदल झालेला जाणवत असला तरी तो काही प्रमाणात बेगडीही वाटतो. म्हणून स्त्रियांचे प्रश्न आजही काही प्रमाणात दिसतात. तिची वेदना ही तिचीच आहे.अगदी या सर्वांचा आविष्कार स्त्रीवादी कथेतून झालेला पाहायला मिळतो.
आधुनिक काळात आम्ही पुरोगामीत्वाच्या गप्पा मारत असलो तरीही आमची मने किती विशाल झाली?हा प्रश्न प्रश्नच राहतो. कारण संकुचित मनाचे दर्शन समाजात नेहमी घडताना दिसते.लोकशाहीने समता , स्वातंत्र्य , बंधुता ही मूल्ये आम्हाला दिलेली असली तरीही आणखीही माणसाच्या मनातून जात ही गेलेली नाही हे वास्तव सत्य नाकारता येत नाही . जातीयतेची चटके आजही दलितांना बसताना दिसतात त्याचेही चित्रं१९९०नंतरच्या मराठवाड्यातील दलित कथेमध्ये पाहायला मिळतं.
*⃣ *नव्वद नंतरची मराठवाड्यातील ग्रामीण कथा एक दृष्टिक्षेप : -*
मराठवाड्यातील मराठी ग्रामीण कथेच्या क्षेत्रात रा . रं . बोराडे , भास्कर चंदनशिव, नागनाथ कोत्तापल्ले ,जगदीश कदम , सोपान हाळमकर ,भीमराव वाघचौरे हे नव्वद पूर्वीचे कथाकार नव्वदनंतरही कथेच्या क्षेत्रात दमदार पदन्यास करताना प्रत्ययाला येतात .नव्वद नंतर त्यांच्या बरोबरीने येथील प्रदेश वैशिष्ट्यासह वर्तमान ग्रामीण जीवनाला कथेच्या माध्यमातून श्रीराम गुंदेकर , ललिता गादगे , ग .पि .मनुरकर , गणेश आवटे , नागनाथ पाटील , मथु सावंत , भारत काळे , विलास सिंदगीकर , अंबादास केदार , आसाराम लोमटे , राजेंद्र गहाळ आदी कथा लेखकांनी वास्तवरूपात दृग्गोचर केले आहे . प्रा . वासुदेव मुलाटे म्हणतात -" बदलत चाललेल्या ग्रामीण जीवनाचे प्रश्नही बदलत चालले आहेत . नवनवीन समस्या निर्माण होत आहेत . या सर्वच प्रश्नांना भिडण्याचा आजचा ग्रामीण लेखक प्रयत्न करतो आहे . " अगदी मुलाटे सरांच्या विधानाप्रमाणे नव्वद नंतर कथालेखन करणारे लेखकही आजच्या समकालीन प्रश्नांना भिडताना दिसतात .
१९९o-९१नंतरची कथा शेतकरी, शेतमजूर यांच्या जीवनातील ताण -तणाव , त्यांची केविलवाणी स्थिती , सावकारी शोषण , कर्जबाजारीपणा , दुष्काळ , नापिकी , शासनाचा नाकर्तेपणा , शेतकरी आत्महत्या , शेतीमालाला भाव मिळावा यासाठी उभारल्या गेलेल्या विविध चळवळी , सहकाराच्या नावाखाली स्थापन झालेल्या संस्था व त्यांचा गैरकारभार , ग्रामीण भागात उच्चशिक्षित तरुणांची वाढलेली बेकारी व त्यांची घुसमट ,आधुनिक तंत्रज्ञान ,खेड्यात आलेले मोबाईल , त्यामुळे जीवनात झालेला बदल ; खाजगीकरण , उदारीकरण, जागतिकीकरण याचा ग्रामजीवनावर झालेला परिणाम .ह्या सर्व प्रश्न व जाणिवांना कवेत घेताना दिसते .
रा.रं . बोराडे यांची कथा शेती , शेतकरी , कष्टकरी , मजूर ,आलुतेदार , बलुतेदार यांच्या भावभावना शब्दबध्द करणारी आहे . तिला मराठवाडी मातीचा गंध आहे . भास्कर चंदनशिव यांचे नव्वद नंतर लिहिलेले ' अंगारमाती ' , ' नवी वारूळं ' , ' बिरडं ' , ' मरणकळा ' हे महत्त्वपूर्ण कथासंग्रह .त्यात ग्रामीण भागातील राजकारण , माणसांची दांभिकता , लफडेबाजी, असह्य दुर्बल मनाची होणारी कुचंबना, खेड्यातील गरीब , भोळ्याभाबड्या माणसाची व त्यांच्या जीवनात आड येणाऱ्या नराधमांची रेखाचित्रे मराठवाडी बोलीतून मोठ्या ताकदीने रेखाटले आहे .
श्रीराम गुंदेकर यांचे ' उचल ' व ' लगाम ' हे नव्वदोत्तरी कालखंडातील दोन महत्त्वाचे कथासंग्रह . ग्रामीण भागात असलेली सावकारी , सावकारी पाशात अडकणारा श्रमिक - कष्टकरी वर्ग ; सहकारी संस्था , त्यांचा गैरकारभार , शिक्षण संस्था व त्यांचे गैरव्यवहार परिणाम स्वरूप उच्चशिक्षित गरीब तरूणांची होणारी घुसमट अतिशय वस्तुनिष्ठपणे ' उचल ' कथासंग्रहातून मांडलेली आहे . ग .पि. मनुरकर यांनी ' मेण्यातील चंद्रकोर ' या कथासंग्रहातून जुनी नष्ट होत जाणारी ग्रामीण संस्कृती यावर नेमकेपणाने प्रकाश टाकलेला आहे .
भीमराव वाघचौरे यांच्या दहा कथा असलेल्या ' मूठमाती ' कथासंग्रहात शेतकऱ्याची अलिकडच्या काळात बदलत असलेली मनःस्थिती , नवशिक्षित तरूण शेतीपासून दूर जाऊन अन्य मार्गाने आर्थिक कमाईचा घेत असलेला शोध याचं चित्रं रेखाटते ; भारताची कृषिव्यवस्था , शेतकऱ्याचे दुःख , दुष्काळ , कर्ज , उपासमार , अनास्था , वाईट सवयी , आर्थिक विपन्नावस्था या घटकांनी पीडित शेतकऱ्यांची संघर्षाची लढाई असफल कशी होते ?याचे वास्तव पातळीवर जाऊन चित्रण त्यांनी आपल्या कथेतून केले आहे .
ललिता गादगे यांचे ' आयुष्याच्या काठाकाठाने ' , ' दुःख आणि अश्रू ' , ' प्राजक्ताची फुलं आणि दाह ' हे कथासंग्रह स्त्रीवादी भूमिका घेऊन लिहिलेले असले तरी ग्रामीण जीवनातील स्त्रीची स्थिती , तिची अवस्था वर्णन करणारे असल्यामुळे ग्रामजीवनाचा , तेथील रूढी - परंपराचा, आचार -विचाराचा नेमकेपणाने वेध घेणारे आहेत . ग्रामीण भागातील स्त्री आजही स्वतःला आबला समजते . नवरा , सासू , सासरा , दीर , नणंद , इतर नातेवाईकाकडून तिचा सातत्याने छळ होतो . ग्रामजीवनातील स्त्रियांची कुचंबना करणाऱ्या या बाबी त्या आपल्या कथेतून निदर्शनास आणून देतात . मथु सावंत यांनी ' पाणबळी ' या कथासंग्रहातून ग्रामीण भागात असलेळा पाणीप्रश्न ग्रामीण भागातील लोकांना कसा भेडसावणारा आहे ?याचे चित्रं रेखाटताना ' पाणबळी ' कथेतील नागम्मा घोटभर पाण्यासाठी बळी ठरते . याचे मन सुन्न करणारे वर्णन केले आहे .
भास्कर बढे यांच्या ' पांढर' , 'चिकाळा ' , ' खिलाऱ्या ' या कथासंग्राहातील विविध कथांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील लोकात असलेली भावनिक गुंतागुंत व्यक्त झाली आहे . दऱ्याखोऱ्यात राहणारी माणसं , ऊसतोड मजूर , त्यांची होणारी लुटमार, फसवणूक हे भास्कर बडे यांच्या बहुतांश कथांचे कथाविषय आहेत .
आबासाहेब वाघमारे ( आनभाव ) ;उमेश मोहिते ( जागरण , वळख , बांधणूक , निवद , मुकं जनावर ) ;जगदीश कदम ( मुडदे , लिव्हन , अखर ) ;जगदीश कदम ( रानभूल ) ;भारत काळे ( दिशा );नारायण पाळेकर (पोळा ) ;विठ्ठल जाधव ( तिवढा ) ;छाया बेले ( चकवा , वैशाख वणवा ) आदी मराठवाड्यातील कथाकारांचे ग्रामीण कथासंग्रह कृषीजीवनाचे व त्यांच्या समस्याचे वास्तवदर्शी व प्रत्ययकारी चित्रण करणारे आहेत .
आसाराम लोमटे हे 'साहित्य अकादमी पुरस्कार 'प्राप्त एक महत्त्वपूर्ण कथालेखक . 'त्यांचे इडापिडा टळो ' व ' आलोक ' हे प्रत्येकी सहा कथा असलेले ग्रामजीवनाचं, तेथील वस्तुस्थितीचे चित्रण करणारे महत्त्वपूर्ण कथासंग्रह . त्यांच्या कथा मानवी मनाचा तळ शोधणाऱ्या व वाचक मनाला अस्वस्थ करणाऱ्या आहेत . 'ओझं ' या कथेत थोरला भाऊ शेती करणारा व धाकटा प्राध्यापक . शेती करणारा भाऊ नैराश्याच्या गर्तेत अडकलेला . पावसाअभावी शेतीतून काहीच उत्पन्न निघत नाही . उलट मातीत घातलेलं मातीतच जाण्याची स्थिती त्यामुळे आत्महत्या करणारा थोरला भाऊ. अशी अस्वस्थतेचा भयान अनुभव त्यांची कथा देते . 'आलोक ' विषयी भाष्य करताना म .द. हातकणंगलेकर म्हणतात -" आलोक या कथासंग्रहातले नव्या वास्तवाचे चित्रण , निसर्ग - पाऊस पाण्याचे वर्णन , खेड्यापाड्यापर्यंत पोहोचलेले वेडेवाकडे , भ्रष्ट , बेमुर्वत राजकारण आणि ग्रामीण बोली -शैलीचा नवा , अचूक साज याचे अभिनव रसायन वाचकाला गुंग करून टाकते . "
विलास सिंदगीकर , अंकुश सिंदगीकर ( गंधरव), अंबादास केदार , अनिता यलमट्टे यांचे कथालेखन अलिकडच्या काळात समृध्द स्वरूपात पुढे येत आहे .विलास सिंदगीकर यांचे ' भूकबळी ' ,' गारपीट ' , ' उतरंड ' आदी कथासंग्रह प्रकाशित आहेत . 'भूकबळी ' या कथेत दुष्काळात जगणाऱ्या गरिबांचे वास्तव चित्रण केले आहे . तर ' उतरंड ' या कथेत शेतकऱ्यांचा मोर्चा , त्या मोर्चात झालेला गोंधळ , मारामारी अशा घटनांचे चित्रण करून शेतकऱ्याच्या जीवनातील संघर्ष दाखवलेला आहे . गारपीट , शेतकऱ्यांचे शोषण , अन्याय , चिकनगुण्यामुळे शेतकऱ्यांची झालेली वाईट स्थिती , त्यांच्या आत्महत्या असे कथाविषय त्यांच्या कथेत आहेत . रामदास केदार यांच्या ' पोखरून पडलेली माणसं ' या कथासंग्रहातील कथा ग्रामीण माणसांच्या मनाचा तळ शोधणाऱ्या आहेत . ग्रामजीवनातील सामान्य माणूस व त्या सामान्य माणसाच्या जीवनातील समस्या , त्यांचे पोखरलेपण या केंद्रबिंदू भोवती त्यांची कथा फिरते .
राजेंद्र गहाळ यांचे ' कोंडी ' , ' दोन एकर ' , ' पोशिंदा ' हे कथासंग्रह ग्रामीण परिसर , शेतकरी -शेतमजूर आणि कष्टकरी वर्गाचे बोलीभाषेतून वास्तव चित्रण करणारे आहेत . 'पोशिंदा ' कथेत जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्यावर येणाऱ्या उपासमारीच्या विदारक परिस्थितीचे गांभीर्य मांडलेले आहे . त्यांच्या बहुतांश कथा वाचक मनाला अस्वस्थ करणाऱ्या आहेत .
मराठवाड्यात नामोल्लेख करता येतील असे आणखी बरेच कथाकार कथा लेखन करत आहेत .
थोडक्यात बहुविध जाणिवांचा आविष्कार विशेषतः वास्तवाच्या पातळीवर शाब्दाविष्कार नव्वदोत्तरी मराठवाड्यातील ग्रामीण कथेतून झालेला प्रत्ययाला येतो .
*नव्वद नंतरची मराठवाड्यातील दलित कथा* : -
मराठी साहित्यात विपुल अशी दलित कथा लिहिली गेली आहे. त्या पाठीमागची मुख्य प्रेरणा फुले , शाहू ,आंबेडकर यांची आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी हजारो अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने दलित साहित्याला मोठी चालना मिळाली.दलित साहित्यातील कथा क्षेत्रात अण्णाभाऊ साठे,शंकरराव खरात,बाबुराव बागुल,योगीराज वाघमारे ,भीमराव शिरवाळे , योगेंद्र मेश्राम,अशोक लोखंडे , अर्जुन डांगळे ,दया पवार ,माधव कोंडविलकर आदी लेखकांनी समृद्ध अशी दलित कथा लिहिली.दारिद्र्य ,भूक , अस्पृश्यता ,अन्याय ,अत्याचार आदीवर भाष्य करणारी ही दलित कथा होती.वेदना ,चीड ,नकार , विद्रोह याबरोबरच ईश्वरवादापेक्षा माणूस हा त्या कथेत महत्त्वाचा व केंद्रबिंदू होता.
१९९० नंतरच्या एकंदरीत साहित्यावर जागतिकीकरणाचा , खाजगीकरणाचा व उदारीकरणाचा प्रभाव झाल्याचा प्रत्यय येतो. जागतिकीकरणाच्या रेट्यात व्यापाराला व व्यवहाराला महत्त्व प्राप्त झाले. माणसाचे सामाजिक जीवन मात्र दुर्लक्षित झाले. दलित चळवळी ज्या सक्रीय होत्या त्या ९० च्या दशकानंतर थोड्याशा थंडावलेल्या दिसतात. दलित समाजातच या काळात नवीन कंपू वर्ग अस्तित्वात आलेला दिसतो. सुशिक्षित दलित व अशिक्षित दलित असे दोन नवीन वर्ग या समाजात निर्माण झाल्याचे चित्र पाहावयाला मिळते.शिकलेल्या लोकांनीच राखीव जागांचा फायदा घेतला; आणि अशिक्षित मागास ते मागासच राहिले.खरे तर मागासलेल्या दलितांना पुढे घेऊन जाण्यासाठी शिकलेल्या दलित तरुणांनी प्रयत्न करणे गरजेचे होते ; पण तसे झाले नाही. फक्त त्यांनी पाहिला तो आपला स्वार्थ ... ! थोडक्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा पराभव त्यांच्याच अनुयायांनी केला.असे म्हटले तर मुळीच वावगे ठरणार नाही. या सर्व बाबींचं चित्रण नव्वदोत्तरी दलित कथेमधून आविष्कृत होताना दिसते.त्याचबरोबर दलितांना आजही गावगाड्यात म्हणावे तसे मानाचे स्थान नाही. त्यामुळे त्यांच्या जीवनातील संघर्ष पूर्णपणे संपलेला नाही. याचीही प्रचिती या काळातील दलित कथेतून येते.
१९९० नंतर लेखन करणाऱ्या मराठवाड्यातील दलित कथाकारामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातील येरमाळा या गावचे योगीराज वाघमारे ( होरपळ - २००८ , बहिष्कार - २००८ , नियत - २०१९ ) यांचे स्थान महत्त्वपूर्ण आहे. नव्वदच्या पूर्वीच ' उद्रेक, बेगड , गुडदाणी 'या कथासंग्रहामुळे योगिराज वाघमारे यांची पृथगात्म ओळख मराठी साहित्यात निर्माण झाली होती ; पण नव्वदनंतरच्या काळात त्यांनी 'होरपळ ' मधून आंबेडकरी चळवळीतील दलित कार्यकर्त्याची शोकात्म वेदना मांडून आपल्याकडे विशेष लक्ष वेधून घेतले. ' बहिष्कार ' व ' नियत ' या कथासंग्रहातून दलित समाजावरील अन्याय - अत्याचाराचे प्रभावी चित्रण त्यांनी केले आहे. प्रकाश मोगले यांनी 'कावस' (१९९९)या कथासंग्रहातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर कसे भरडले जात आहेत हे समाजातील वास्तव अत्यंत आत्मपीडेने,धैर्याने व ताकदीने मांडलेले आहे.ते मराठी दलित कथेतील एक प्रयोगशील कथाकार म्हणून ओळखले जातात. परभणी येथील प्रभाकर ढगे यांचा 'बापाची शाळा 'हा कथासंग्रह दलितामधील आत्मभान जागृत करणारा एक महत्त्वपूर्ण कथासंग्रह म्हणून ओळखला जातो .त्यांची कथा उठावदार अशा स्वरूपाची आहे. सिंदगी ता.जळकोट येथील विलास सिंदगीकर यांनी 'भूकबळी ' , 'गारपीट ' , 'उतरंड ' , ' रक्त आणि भाकर ' हे कथासंग्रह लिहून दलित साहित्यात मोलाची भर घातली आहे. न्याय , स्वातंत्र , समता , सर्वधर्मसमभाव हे शब्द घटनेतच शोभून दिसतात , प्रत्यक्षात मात्र दलितांना अजूनही रोषाला सामोरं जावं लागतं. अजूनही गावगाड्यात दलितांना मानाचे स्थान दिले जात नाही याचे वास्तववादी चित्र त्यांच्या ' जातीचा वाडा चिरेबंदी ' यासाख्या कथांमधून पाहायला मिळते. विषमता संपली पाहिजे हा भाव त्यांच्या कथेतून व्यक्त होतो. मानवमुक्तीचा समतामूलक संघर्ष हा त्यांच्या कथेचा आत्मा आहे. बीड जिल्ह्यातील कुमार खरात यांनी 'मला माणसात यायचंय ' (२००८) या कथासंग्रहातून दलित समाजाचे प्रश्न आणि त्यांच्या समस्या मोठ्या ताकदीने मांडलेल्या आहेत. विषमताग्रस्त समाजमानस यावर त्यांनी खूप सुंदर लेखन केले आहे.
नांदेडचे रविचंद्र हडसनकर ( दावण , दरी , सरणझळा ), लातूरचे तु.लिं.कांबळे (जळ , गावठाण , जिणं वादळाचं , मांजराकाठची माणसं ),जयराज खुणे (आगडोंब - २००१ , विध्वंस -२००९ ), कांबळे नानासाहेब ( सावखेडचा धनाजी नायक - २००५ ), औरंगाबाद येथील एकनाथ खिल्लारे (मरणाला स्पर्श करून आलो - २००५ , काहिली -२००७ , तगमग - २०२२ ),यादव गायकवाड (अस्वस्थ किनारा - १९९९ ) , गोडबोले आत्माराम (संगर -२००६ ) , जालना येथील घोरपडे किशोर (घुसमटणी -२००६ ) , हटकर मिलिंद (सुगावा -२००५ ) ,एकनाथ सोनवणे (खद्रावळ , भंगलेल्या दिशा ) , नांदेड येथील आनंद गायकवाड (असूड - २००९ ) अंकुश सिंदगीकर (गंधरव ) , रवींद्र शिंदे (तिवडा , पाणकणीस ) , आत्माराम गोडबोले( संगर ) के.व्ही.सरवदे( काळोखगर्भ , तुंबलेले पाणी , उद्धवस्तलेली गढी ) यासारख्या कथाकारांचे या कालखंडातील दलित कथा लेखनाच्या प्रांतात असलेले योगदान महत्त्वपूर्ण आहे. या कथाकारांनी आपल्या कथेत दलितांच्या जीवनातील दाहकता अत्यंत प्रत्ययकारीपणे मांडली आहे.
*नव्वद नंतरची मराठवाड्यातील स्त्रीवादी कथा* : -
जागतिकीकरण ,खाजगीकरण आणि उदारीकरण यानंतर अर्थव्यवस्थेत बदल झाले तसे त्याचे परिणाम साहित्यावरही झाले. या धोरणाचा परिणाम विशेषतः ग्रामीण साहित्यावर मोठ्या प्रमाणात झालेला पाहायला मिळतो.ग्रामीण साहित्याइतका जागतिकीकरणाचा परिणाम स्त्रीवादी साहित्यावर निश्चित झालेला नाही ; पण ह्या सर्व घटना जागतिक पटलावर घडत असल्या तरी स्त्रियांचं आपलं असं एक वैश्विक दुः ख आहे.'स्त्री' म्हणून वाट्याला आलेलं दुःख ; त्यातून होणारी पिळवणूक कमी व्हावी व तिला 'माणूस' म्हणून जगता यावे.याचं चित्रं स्त्रीवादी साहित्यातून प्रकट झालेलं पाहायला मिळतं. ते ९० नंतरच्या स्त्रीवादी साहित्यातूनही प्रकटपणे अभिव्यक्त होताना दिसते . विधवा , परित्यक्ता , दुःखाने गांजलेल्या , कुचंबना सहन करणाऱ्या अशा स्त्रियांची चित्रे रेखाटतानाच ग्रामीण भागात राजकारणाचा शिरकाव मोठ्या प्रमाणात झाला स्त्रियांसाठी काही आरक्षित जागा ठेवण्यात आल्या;परंतु त्या आरक्षित जागेवर निवडून आल्यानंतरही येथील पुरुषप्रधान संस्कृतीने सत्तेची सूत्रे मात्र त्यांच्या हाती दिली नाहीत ; अर्थातच इथे सुद्धा तिला दुय्यमत्व प्राप्त झालं.ह्या सर्व जाणिवांचा आविष्कार ९० नंतरच्या स्त्रीवादी साहित्यातून झालेला पाहायला मिळतो.
१९९० नंतरमराठवाड्यातील कथाकार लेखिकामध्ये अनुराधा वैद्य,छाया महाजन,ललिता गादगे,शैला लोहिया,मथु सावंत, सुनंदा गोरे,इंदुमती जोंधळे, वृंदा दिवाण,सुजाता महाजन,रेखा बैजल,अनिता येलमट्टे,अर्चना डावरे,सरोज देशपांडे यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल.
अनुराधा वैद्य यांनी 'अजून एक खुळा हा ' या विनोदी कथासंग्रापासून आपल्या कथा लेखनाची सुरुवात केली होती. त्यांचे 'अंतर ' , 'अस्तित्वरेषा ' 'काजळ 'बाकीक्षेम ' , 'मनुष्यहाट ' , ' विसर्जन 'आदी कथासंग्रह आहेत.या कथासंग्रहातून स्त्रीविषयक जाणिवा आणि त्यांच्या वेदना त्यांनी मांडलेल्या आहेत.
अंबाजोगाई येथील डॉ.शैला लोहिया हे एक साहित्य क्षेत्रातील महत्त्वपूर्ण नाव.शिक्षण क्षेत्रातील प्रशासकीय भूमिकेबरोबरच सामाजिक क्षेत्रातील त्यांचं कार्यही तितकच महत्त्वपूर्ण आहे. 'मनस्विनी'च्या माध्यमातून विधवा,परित्यक्ता , पीडित महिलांना आधार देण्याचे काम आपल्या पतीच्या साह्याने त्यांनी केलं. त्यांचे हे सामाजिक कार्य साहित्यात शब्दांच्या रूपातूनही अभिव्यक्त झालेले आहे. साहित्यातील विविध प्रांत हाताळणाऱ्या शैला लोहिया यांनी 'स्वरांत'(१९९०) 'आपले आभाळ पेलताना '( १९९७) 'तिच्या डायरीची पाने ' , ' कथाली'(२०११) आदी कथासंग्रह लिहिले. 'स्वरांत ' हा ९०पूर्वीचा कथासंग्रह असला तरी 'तिच्या डायरीची पाने ' , ' आपले आभाळ पेलताना ' 'कथाली' हे कथासंग्रह ९० नंतरचे आहेत. ज्यामध्ये दुःखाने गांजलेल्या , दीनदुबळ्या आणि अत्याचारग्रस्त स्त्रियांची व्यथा प्रभावीपणाने मांडलेली आहे.विधवा,परित्यक्ता स्त्रियांची आर्त कहाणी त्यातून पाहायला मिळते.केवळ समस्या मांडणे हा हेतू येथे नाही तर तिला माणूस म्हणून जगता येईल आणि त्यासाठी अवकाश कसा प्राप्त करून देता येईल या दृष्टिकोनातूनही त्यांचे लेखन महत्त्वपूर्ण आहे.
मराठवाड्यातील कथा लेखिकांमध्ये अहमदपूर येथील ललिता गादगे हे एक आश्वासक नाव. 'आयुष्याच्या काठाकठाने '(१९९१) ' दुःख आणि अश्रू '(१९९५) ' प्राजक्ताची फुले आणि दाह '(२००२)हे त्यांचे गाजलेले कथासंग्रह. ललिता गादगे यांच्या कथेतील स्त्री ग्रामीण परिसरातील आहे. तिचं अभागी चित्र त्यांनी रेखाटलं. त्यांच्या कथेतील नायिका 'स्व'च्या अस्तित्वाचा शोध घेणारी आहे.
औरंगाबाद येथील छाया महाजन यांनी 'एकादश कथा ' , 'ओढ' , 'धुळीच्या चमकत्या पडद्याआड ' , 'राहिलो उपकाराइतुका ' , ' नकळत ' , ' वळणावर ' आदी कथासंग्रह लिहून कथा क्षेत्रामध्ये मोलाची भर त्यांनी टाकलेली आहे. त्यांच्या कथेतील नायिका भारतीय समाज व्यवस्थेच्या पाईक म्हणून वावरतात. ती सहनशील आहे .मूकपणे अन्याय सहन करणे हा तिचा स्वभावधर्म. फारशी बंडखोरी ती करत नाही. स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व शोधणाऱ्या काही नायिका त्यांच्या कथेत नगण्य प्रमाणात आहेत ; पण भारतीय अवकाशात स्त्रियांच्या वाट्याला येणाऱ्या दुःख भोगाची अनेविध रूपे त्यांच्या लेखनात उजागर होतात.
नांदेड येथील पीपल्स महाविद्यालयात मराठीच्या प्राध्यापिका असलेल्या डॉ.मथु सावंत यांचे 'पाण्यातील पायवाट '(१९९१ ) ' तिची वाटच वेगळी ' (२०००) ' पानबळी ' (२००६) हे कथासंग्रह लक्षवेधी आहेत. ग्रामीण राजकीय जाणीव अभिव्यक्त करतानाच स्त्रीवादी भूमिकेतून लेखन हा त्यांच्या लेखनाचा विशेष. स्त्रीचा राजकारणातील प्रवेश आणि त्यातून निर्माण झालेल्या बऱ्या वाईट परिस्थितीची वास्तवदर्शी अभिव्यक्ती त्यांच्या कथालेखनातून प्रत्ययाला येते.आपल्या कथेतून मराठवाड्याचे दुःख त्यांनी समर्थपणे अभिव्यक्त केले आहे. मराठवाड्यातील माणसे त्यांचे जीवन हे मुळी अभावग्रस्त आणि कष्टप्रद असेच आहे. त्यात मराठवाडी स्त्री आणि तिचे जीवन हे तर आणखीनच खोल अभावग्रस्त ,कष्टप्रद आणि यातनामय आहे याचा आलेखच डॉ.मधु सावंत यांच्या एकूण कथा मधून दिसून येतो.
परभणी येथील सुनंदा गोरे यांचे 'उन्हातले चांदणे' , 'मोकळे आकाश' , 'कोरांटीची फुले' आदी कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. मराठवाड्यातील स्त्री जीवनाचे प्रश्न काही प्रसंगाच्या माध्यमातून त्यांनी उलगडलेली आहेत. स्त्रियांच्या जीवनात निर्माण होणाऱ्या विविध पातळीवरील समस्या , मनाची होणारी अवहेलना , कुचंबना , मानसिक छळ हा त्यांच्या कथेतून अतिशय संवेदनशीलपणाने प्रकट होताना दिसतो.
वृंदा दिवाण यांचे 'अंतराय ' , 'अनुभवाचे वर्तुळ ' , 'किनारे किनारे ' , ' जन्ममरणाचा फेरा ' , 'तळ्यात मळ्यात ' , ' मनाची साक्ष ' , 'संदर्भ ' , ' ले ऑफ ' , 'हृदयाची हाक ' ; इंदुमती जोंधळे यांचे 'पाषाणनिद्रा ' , 'बेदखल ' जालना येथील रेखा बैजल यांचे 'मानस ' 'अशब्द' 'आदिम' 'स्वप्नस्थ ' 'तपस्या' 'दुष्काळ ' , 'निसटते किनारे ' , ' पक्षी जाय दिगंतरा ' , ' शिवार ' , 'स्पंदन ' , 'ज्ञातापलीकडे 'हे कथासंग्रह ही लक्षवेधी स्वरूपाची आहेत.यातील काही कथासंग्रह हे ९०पूर्वीचे तर बरेच कथासंग्रह हे ९०नंतरचे आहेत.त्यातून स्त्री जीवनातील समस्या वास्तव स्वरूपामध्ये मांडलेल्या आहेत.
अलीकडच्या काळात मराठवाड्यात सुजाता महाजन ,अनिता येलमट्टे , अर्चना डावरे, सरोज देशपांडे ह्या कथा लेखिका स्त्रीविषयक जाणिवा घेऊन दमदार व कसदार लेखन करताना दिसत आहेत.एकूणच 'स्त्रियांचे स्वतःच्या वेगळेपणाची जाणीव प्रकर्षाने व्यक्त करणारे व स्वतःचा शोध घेऊ पाहणारे साहित्य म्हणजे स्त्रीवादी साहित्य होय.' या कसोटीवर वरील सर्व लेखिकांचे साहित्य स्त्रीवादी भूमिका घेऊन अभिव्यक्त होताना दिसते.हे लेखन स्त्रियांसाठी स्वतंत्र अवकाश शोधून देणारे आहे.
*समारोप*
१९९०-९१नंतरचे मराठवाड्यातील ग्रामीण साहित्यात शेतकरी कुटुंबाची होत असलेली फरफट , खाऊजा धोरणाचा शेतकरी जीवनावर झालेला परिणाम , शेतकऱ्यांच्या आत्महत्या , खेड्यात आलेले राजकारण , आधुनिक तंत्रज्ञानाचा वाढता वापर , बदलत चाललेले ग्राम जीवन, संकुचित बनत चाललेली मने अशा विविध जाणिवांचा वास्तववादी आविष्कार मराठवाडी बोलीतून अभिव्यक्त होताना दिसतो.
प्रा .डॉ . राजकुमार किशनराव यल्लावाड
मराठी विभागप्रमुख ,
कै . लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालय , परळी वै . जि. बीड
Comments
Post a Comment